स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंतच्या प्रवासात भारताची भूमिका नेहमीच शांततेची राहिलेली आहे.जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा या तत्वाने भारताने नेहमीच इतर
स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंतच्या प्रवासात भारताची भूमिका नेहमीच शांततेची राहिलेली आहे.जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा या तत्वाने भारताने नेहमीच इतर देशांवर अंकुश लादणे, आणि युद्ध करणे या तत्वांना नापसंती दर्शवली आहे. रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू असतांनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच या दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांची भेट घेतली. या भेटीला विशेष महत्व असून, यातून मोदीजी यांनी शांततेचा संदेशच जणू दिला असल्याचे दिसून येत आहे. खरंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी देखील युद्धासाठी कोणत्याही देशाची बाजू घेण्याऐवजी अलिप्ततावादी धोरण राबवले होते. दोन देशांच्या अंतर्गत मुद्दयात आपण कोणत्याही देशाला पाठिंबा न देता अलिप्त राहण्याचे ते धोरण होते. कारण नुकताच भारत स्वातंत्र्य झाला होता, अशावेळी भारताला युद्ध परवडणारे नव्हते. शिवाय देशातील तत्कालीन समस्या वेगळ्या होत्या. देशातील लोकांना दोन वेळेचे पोटभर जेवण मिळवण्याची भ्रांत होती. अशावेळी भारताला अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणे, देशात पायाभूत सोयी-सुविधांचे जाळे निर्माण करण्याचे मोठे आव्हान होते. आणि नेहरू यांनी तेच केले. मात्र 1962 मध्ये चीनने केलेले युद्ध, त्यात भारताची पुरती झालेली वाताहात, 1965 मध्ये परत पाकिस्तानसोबत झालेले युद्ध, बांगलादेशची निर्मिती या संपूर्ण प्रकरणाचा विचार केल्यास भारताला कधीही युद्ध नको होते. आणि तेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. मोदी यांनी युक्रेनला भेट देण्याआधी रशियाला भेट दिली होती. या भेटीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी गळाभेट घेतली होती. यावेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेनस्की यांनी एका हुकूमशहाला भारत साथ देत असल्याची टीका केली होती. त्यानंतर काही दिवसांनी नरेंद मोदी यांनी झेलेन्सकी यांची गळा भेट घेतली. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्ध समाप्तीच्या दिशेने जातांना दिसून येत आहे, आणि यात भारताची भूमिका महत्वाची दिसून येत आहे.
आजमितीस जगासमोर वेगळ्या समस्या आहेत. अशावेळी युद्ध कोणत्याही देशाला परवडणारे नाही. रशिया हा देश अमेरिकेसोबत टक्कर देवू शकतो, इतका शक्तीशाली देश असतांना, या देशाने आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे. महत्वाकांक्षी स्वभावामुळे इतर छोट्या-छोट्या देशांवर आपली हुकूमत असावी, आपण सांगू तेच या देशांनी करावे अशी रशियाची भूमिका दिसून येते. मात्र रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना खडे बोल कोणत्याही नेत्यांनी सुनावले नसले तरी, पंतप्रधान मोदी यांनी जगाला युद्धाची नव्हे तर शांततेची गरज असल्याचे यापूर्वीच प्रतिपादन केले होते. आणि त्यांनी या दौर्यात देखील तेच स्पष्ट केले. असे असले तरी दोन्ही देशांचे युद्ध केव्हा संपेल हा यक्षप्रश्न आहे. युद्धापायी तसेच जागतिक कारणांमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोलमोडतांना दिसून येत आहे. श्रीलंका, पाकिस्तान, इंग्लंड, जर्मनीसारख्या देशांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे दोन्ही देशांचे प्रचंड नुकसान होतांना दिसून येत आहे. हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. असे असतांना देखील युद्ध लढले जात आहे. त्यामुळे युद्धाला कुठेतरी लगाम घालण्याची गरज आहे. इस्त्रायल आणि लेबनॉनमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही देश युद्धाच्या उंबरट्यावर दिसून येत आहे. अशा वेळी जगातील सर्व देशांनी शांततेच्या दिशेने चालण्याची खरी गरज आहे. जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा, त्यांचा शांततेचा संदेश हवा आहे. कारण युद्धातून केवळ नरसंहार होणार, त्यातून अनेक दशके, अनेक शतके विकासाचा आलेख पुसून टाकला जाईल. याउलट या संहाराऐवजी विकासाला हातभार लावण्याची खरी गरज आहे. आणि तीच पंतप्रधान मोदी यांनी आपल्या दौर्यांतून दाखवून दिली आहे. त्यामुळे शांततेचा पुरस्कार करणारा, अलिप्ततावादी धोरणाचा पुरस्कार करणारा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते.
COMMENTS