काल सायंकाळी तालुक्यातील काही गावात स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी फिरत होतो. सोबत सरपंच, ग्रामसेवक व इतर सहकारी देखील होते. सांडपाण्याचा निचरा होत नाही
काल सायंकाळी तालुक्यातील काही गावात स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी फिरत होतो. सोबत सरपंच, ग्रामसेवक व इतर सहकारी देखील होते. सांडपाण्याचा निचरा होत नाही अशा ठिकाणी शोषखड्डे घेण्याचे ग्रामपंचायतींचे नियोजन आहे. मात्र शोषखड्डे केल्याने त्यात मुरणा-या पाण्यामुळे घरातील भिंतींना ‘ओल’ लागेल अशी भीती पाहणी दरम्यान एका आजीने व्यक्त केली. बरीच समजूत घालून शेवटी आजीला माझ्या मोबाईल मधील शोषखड्ड्याचे फोटो दाखविले. शोषखड्डे केल्याने होणाऱ्या फायद्यांची माहिती दिली. मग आजीबाईचा विरोध मावळला.
आजीला शोषखड्डयाची महती पटवून देत असताना तिथे बऱ्याच आया-बाया गोळा झाल्या होत्या. प्रत्येकीच्या घरासमोर शौचालयाचे बांधकाम झाल्याचे दिसत होते. समोरच असणाऱ्या शौचालयाच्या दाराची कडी उघडून मी आत डोकावून पाहीलं. त्यातील घाणीचा उग्र वास येईल इतकंही काही ते घाण नव्हतं. तरिही शेजारी उभ्या असणाऱ्या महिला भगिनींनी तोंड बाजुला फिरवत नाकाला पदर लावला. त्यांच्या या कृतीमुळे त्यापैकी किती जणी शौचालयाचा नियमित वापर करत असतील याची शंका मला आली. मी उपस्थित महिलांना तसा प्रश्नही केला. एरवी चोवीस तास व्हाॅट्सअॅपवर पडीक असणारा मित्र नेमका आपण मेसेज पाठवला की लगेच चारदोन तास ऑफलाईन व्हावा, अगदी तसंच एवढा वेळ अखंड बडबड करणाऱ्या माता भगिनी माझ्या त्या प्रश्नावर एकदम शांत झाल्या. मात्र एका आजीने सत्यस्थिती कथन केली. “खड्डा भरल्यावर मग काय करायचं ?” या तिच्या प्रश्नाने मला सगळी उत्तरे मिळाली. तुम्ही शौचालय वापरा, खड्डा भरला तर आम्ही उपसून देऊ. आम्ही तेच काम करतो, असे मी आजीला सांगीतले. आजीच्या चेहऱ्यावर आश्चर्यमिश्रीत आनंद झळकला. तिने मला लगेच माझा मोबाईल नंबर लिहून मागीतला.
मी विचारमग्न झालो. कारण, शौचालयाचा वापर न करण्यामागे शौचालयाचा खड्डा भरण्याची भिती होती. मला वाईट वाटले. दोन वर्षापुर्वी तालुका हागणदारी मुक्त करण्यासाठी केलेली धावपळ आठवली. त्यावेळी एकेका कुटूंबाला शौचालय बांधकामासाठी तयार करताना केलेल्या मिणतवाऱ्या आठवल्या. टाॅयलेट-एक प्रेमकथा या चित्रपटाप्रमाणे ग्रामीण भागात अभियानाच्या शेवटच्या टप्प्यात समाविष्ट केलेले प्रत्येक कुटुंब ही एका स्वतंत्र चित्रपटाची स्क्रिप्ट ठरू शकेल इतक्या वैविध्यपूर्ण आव्हानांचा त्यावेळी सामना करावा लागला होता. शास्त्रशुद्ध पद्धतीने दोन (शोष) खड्ड्यांचे शौचालय उभारल्यास ते वर्षानुवर्ष भरत नाही हे कितीतरी वेळा सोदाहरण पटवून दिले आहे. मात्र प्रशासनाच्या प्रामाणिक प्रयत्नांपेक्षा लोकांना प्रतिष्ठेची खोटी संकल्पना अधिक ‘खरी’ वाटली. खोट्या प्रतिष्ठेपायी अनेकांनी त्यावेळी सेप्टीक टॅन्क शौचालये उभारली. त्यातील पाण्याचा निचरा अपेक्षित वेगाने होत नसल्याने त्याचा खड्डा भरण्याची भिती (शौचालयात) स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे शौचालयातच न जाणे किंवा अगदी अपवादात्मक परिस्थितीत रात्री अपरात्री जाणे किंवा घरी पाहुणे आल्यास त्यांना दाखवण्यापुरते शौचालयात जाणे, अशी लिमिटेड एडिशन टाॅयलेटस प्रत्येक गावात किमान डझनभर तरी आढळतात. अनेक ठिकाणी एखादा दुर्मिळ फोटो “फ्रेम” करून जतन करावा तशी शौचालये कुलूपबंद केलेली दिसतात. अशी कुलूपबंद शौचालये बघितली की मला अमिताभची “दरवाजा बंद” ही जाहीरात आठवते. शौचालयात(च) बसण्याची सवय व्हावी यासाठी आतुन दरवाजा बंद करण्याची गरज असताना आम्ही तो बाहेरून बंद केला. अशी कुलूपबंद शौचालये मुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.
शौचालय बांधकाम करतेवेळी लाभार्थी दोन गोष्टींचा विशेष आग्रह धरत. एक म्हणजे शहरी भागाच्या धर्तीवर (शौषखड्डे न करता) सिमेंट काॅन्क्रीटने बंदिस्त सेप्टीक टॅन्क बांधकाम करणे व दुसरे म्हणजे शौचालयाच्या मागील भागात एक सुमारे दहा फुट उंचीचा प्लॅस्टिक (व्हेंट/गॅस) पाईप उभा करणे. हे दोन Status Symbol असल्या शिवाय शौचालयाचा “फिल” येत नाही. दुर्दैव असे की एवढे करूनही एखाद्या कुटूंबाकडून शौचालयाचा नियमित वापर होईलच याची आजिबात खात्री नाही. गंमत म्हणजे या दोन्ही गोष्टी शाश्वत ग्रामस्वच्छतेच्या मार्गात एकदम निरुपयोगी आहेत. कारण, सेप्टीक टॅन्क मध्ये मैल्याचे अवातीय पाचन होते. या प्रक्रियेस पाणी जास्त लागते. याउलट, द्विकूप शौचालयामध्ये पाणी कमी लागते. कारण, याच्या निचरा टाकीत जी जीवाणूंची प्रक्रिया होते त्याला केवळ ओलावा गरजेचा असतो. प्रत्येक वेळी अगदी दिड ते दोन लिटर पाणी देखील पुरेसे ठरते. द्विकूप शौचालयात दुर्गंधीयुक्त वायूंचे प्रमाण कमी असल्याने व्हेंट पाईपची आवश्यकता भासत नाही. शिवाय अशा द्विकूप शौचालयापासून उत्तम असे सोनखत मिळते ज्यामध्ये पिकांना आवश्यक असणारी पोषक द्रव्ये भरपुर प्रमाणात (नत्र-1.5%, स्फुरद-1.07% आणि पालाश- 0.5%) असतात. ज्या कुटुंबांनी आधीच सेप्टीक टॅन्क शौचालय उभारले आहे त्यांच्या मनात खड्डा भरण्याची भीती जरा जास्तच दिसून येते. या भीतीपोटी अनेकजण सेप्टीक टॅन्क मधील मलद्रव उघड्यावर किंवा उघड्या गटारीत सोडतात. मात्र, यामुळे पाणी प्रदुषणाबरोबरच रोगराईच्या प्रसाराचा धोका देखील संभवतो. याऐवजी एक योग्य मापाचा शोषखड्डा किंवा निचरा टाकी बांधुन त्यात हा मलद्रव सोडणे अधिक चांगले. सेप्टीक टॅन्क मध्ये तयार होणाऱ्या वायुंना जायला जागा नसल्याने अशा शौचालयांना तीन इंच व्यासाचा, जवळच्या इमारतीपेक्षा अधिक उंचीचा आणि त्यावर मच्छरदाणीची जाळी असणारा व्हेंट पाईप लावणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात सुमारे दोन दशकांपासून शौचालयाची शास्त्रोक्त उभारणी व नियमित वापर याविषयी मोठा प्रचार-प्रसार करण्यात येत आहे. परिणामी उघड्यावर शौच करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. स्वच्छ भारत मिशनने शौचालयाच्या वापराला मिळवून दिलेली प्रतिष्ठा नक्कीच दखलपात्र आहे. स्वच्छ भारत मिशन हा अलिकडच्या काळातील लोकांच्या स्वच्छता विषयक सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम ठरला आहे. मात्र अद्यापही काही व्यक्ती, विशेषतः वृद्ध (पुरूष आणि महिला) ‘अवघडल्या’ सारखे वाटते म्हणून शौचालयात बसत नाहीत. अनेक तंबाखू-प्रेमी तरूण ‘किक’ बसत नाही म्हणून शौचालयाऐवजी उघड्यावर बसतात. दोन किंवा अधिक व्यक्ती उघड्यावर शौचाला बसल्यानंतर त्यांच्यात होणारी ‘मोक्कार’ वैचारिक देवाणघेवाण हा देखील एक जिव्हाळ्याचा विषय आहे. ज्यामध्ये, गावातील socio-economic and political aspects (भावकीचं, जातीपातीचं राजकारण) तसेच interpersonal relations (लफडी) यावर (दबक्या आवाजात) महाचर्चा घडून येते…!!! (मॅनेजमेंट सायन्सने देखील नतमस्तक व्हावे असा हा गट चर्चेचा पुरातन प्रकार) बंदिस्त शौचालयात अशी सोय उपलब्ध नसल्याने अनेकजण खुले मैदान जवळ करतात.
शौचालय बांधायचे तर ते सरकारी पैशातुनच, या गैरसमजापायी अनेक सधन कुटुंबे अजूनही सरकारच्या बारा हजार रूपयांची वाट पाहताना दिसतात. गेली सुमारे दोन दशके सरकारकडून शौचालयासाठी प्रोत्साहन अनुदान दिले जात आहे. पुर्वी केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम (सीआरएसपी: 1986 ते 1999) होता. नंतर संपूर्ण स्वच्छता अभियान (टीएससी: 1999 ते 2012) होते. त्याची जागा निर्मल भारत अभियानाने (एनबीए:2012 ते 2014) घेतली. तर सध्या स्वच्छ भारत अभियान (एसबीएम: ऑक्टोबर 2014 पासून) सुरू आहे. योजना बदलत गेल्या. मात्र निव्वळ लाभ लाटण्यासाठी अन् पुरस्कार लुटण्यासाठी उभारलेल्या यातील जुन्या दिखाऊ शौचालयांची अवस्था जावेद अख्तर साहेबांच्या ‘जरा देख तो लो..’ या गझलेतील ओसाड शहरासारखी झाली आहे. (ये नया शहर तो है तुमने क्या खूब बना लिया…. मगर, क्यूं पुराना हूआ विरान जरा देख तो लो…!!!) सरकारी जाहिराती, स्वयंसेवी संस्था व सेवाभावी कार्यकर्ते यांच्याकडून महिलांचे आरोग्य व सन्मान यांची सांगड शौचालयाच्या वापराशी घातल्याने ग्रामीण भागातील महीलांमध्ये शौचालयाच्या वापराचे प्रमाण पुरूषांच्या तुलनेत अधिक आहे. पुरूष मात्र अजूनही ‘मोकाट’ दिसतात. नक्षलवाद, दहशतवाद यासारख्या समाजविघातक कृत्यामुळे जेवढ्या लोकांचा जीव जातो त्यापेक्षा कितीतरी अधिक लोक (विशेषतः बालके) उघड्यावरील हागणदारीपायी उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांची शिकार होतात. म्हणुनच लोटा बहाद्दरांच्या ‘डोक्यातील हागणदारी’ साफ करण्यासाठी ‘कारवाईचा खराटा’ फिरवण्याची नितांत गरज आहे. केवळ बारा हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देऊन आपल्याला नामानिराळे होता येणार नाही. अन्यथा पायाभूत सर्वेक्षणात नमूद संख्येएवढी शौचालये उभारून आकड्यांचा मेळ जमवून मिळविलेले समाधान अल्पकालीन ठरेल. हागणदारीमुक्तीची मोहोर उमटलेल्या गावांनी अधिक गांभीर्याने प्रयत्न करण्याची गरज आहे. अनेक ‘नामवंत’ ग्रामपंचायतींच्या भिंतीवर आता हागणदारीमुक्तीच्या पुरस्कारांची ‘फ्रेम’ लावण्याएवढी देखील जागा शिल्लक नाही. मात्र गावातील हागणदारीची जागा काही केल्या हाटत नाही. ग्रामविकास विभागातील ग्रामसेवक, बीडीओंच्या दोन पिढ्या आतापर्यंत याच कामात अक्षरशः खपल्या आहेत.
शौचालयाचा शंभर टक्के वापर करणारी अनेक गावे महाराष्ट्रात आहेत. देशातील कोणत्याही स्मार्ट सिटीपेक्षा ती अधिक निर्मल आहेत. संपुर्ण हागणदारी मुक्ती साध्य केलेल्या या गावांनी आता पाणी गुणवत्ता तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या पैलूंवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांची यशोगाथा इतर ठिकाणी मिरविली पाहीजे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचा संस्कार रूजविण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न अधिक दूरगामी परिणाम करणारे आहेत. स्वच्छता ही जोपर्यंत नागरिकांच्या सवयीचा भाग होत नाही तोपर्यंत ती शाश्वत होणार नाही. ज्या राष्ट्राला स्वातंत्र मिळून पंच्याहत्तर वर्षे लोटली आहेत, त्या राष्ट्राच्या विकास अजेंड्यावर हागणदारीमुक्ती सारखा विषय असणे आपल्यासाठी भूषणावह नाही. स्वच्छ भारताच्या सरकारच्या प्रयत्नांना जबाबदार नागरीकांचे सक्रिय पाठबळ मिळाल्यास शाश्वत स्वच्छतेच्या दिशेने सुरू असलेली आपली वाटचाल अधिक व्यापक व वेगवान होईल. यावर्षीच्या जागतिक शौचालय दिनी संपुर्ण स्वच्छतेसाठी आपण वचनबद्ध होऊ या…
-सचिन सुर्यवंशी
गटविकास अधिकारी,
कोपरगाव (अहमदनगर)
9423464348
[email protected]
COMMENTS