रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन पद गेली तीस वर्षे पेक्षा अधिक काळ कल्पकतेने आणि नवनव्या शैक्षणिक प्रयोगांनी हाताळणारे प्रा. एन. डी. पाटील यांचे वयाच्या ९३
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन पद गेली तीस वर्षे पेक्षा अधिक काळ कल्पकतेने आणि नवनव्या शैक्षणिक प्रयोगांनी हाताळणारे प्रा. एन. डी. पाटील यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. आजिवन प्रयोगशील नेते म्हणून त्यांची ओळख राहीली. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आपले राजकीय आणि सामाजिक जीवनाची सुरूवात करणारे प्रा. एन. डी. पाटील यांना रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीत १९५९ साली म्हणजे त्यांच्या वयाच्या तिसाव्या वर्षी सामावण्यात आले. राज्यव्यापी कारभार असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेत १९९० साली त्यांना चेअरमन पद मिळाले. एकंदरीत एकतीस वर्षे चेअरमन पद आणि संस्थेच्या कौन्सिल मध्ये सलग ६३ वर्षे कार्यरत राहणे ही काही साधी बाब नव्हे. एवढा दीर्घकाळ एवढ्या मोठ्या संस्थेत कार्यरत राहणे म्हणजे साधनशुचिता किती उच्च दर्जाची आहे, याची साक्ष मिळते. रयत शिक्षण संस्थेचे समाजाप्रती असणारे कर्तव्य जराही नजरेआड न करता सातत्याने संस्थेच्या कार्याचा लौकिक टिकवून ठेवणे हे आव्हानात्मक असतानाही ते एनडी साहेबांनी आजिवन टिकवून ठेवले. शेतकरी कामगार पक्षाचे कार्य करताना त्यांनी सत्तेची जवळीक कधी साधली नाही. त्यांच्या राजकीय सत्तेचा एकमेव अपवाद म्हणजे १९७८ चे शरद पवार यांचे नेतृत्वाखालील पुलोद सरकार. याच सरकार मध्ये त्यांनी सहकार मंत्रीपद सांभाळले होते. अर्थात, मंत्रीपदाव्यकतिरिक्त ते महाराष्ट्र विधानसभेवर सलग १८ वर्षे सदस्य होते. तर दोन टर्म त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचे कोल्हापूर चे प्रतिनिधित्व केले. वैचारिक मांडणीचा त्यांचा दबदबा महाराष्ट्रात कायम राहीला. शेतकरी कामगार पक्ष हा लहान असला तरी त्यांच्या वैचारिक भूमिकेमुळे या पक्षाचा महाराष्ट्रात दबदबा कायम राहीला. अर्थात, शेकाप चे नेतृत्व कोकणपट्ट्यात देखील राहिले. परंतु, दि.बा. पाटील यांच्यानंतर यापक्षाचे कोकण प्रतिनिधित्व हे नामधारी राहिले आहे. शेकाप च्या या स्थितीविषयी एनडी पाटील परिचित होते. परंतु, राजकारणात सगळ्याच बाबी बोलून दाखवता येत नाही. शेकापचे अठरा वर्षे विधान परिषदेचे प्रतिनिधित्व करणारे एनडीए पाटील यांना राजकीय व्यवहार जपता आला. त्यामुळे ते दीर्घकाळ प्रतिनिधित्व करू शकले. रयत संस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्यानंतर त्यांनी काही प्रयोगशील शिक्षणाला प्रारंभ केला. पश्चिम महाराष्ट्र सहकार चळवळीमुळे उद्योगप्रधान बनल्याने त्याठिकाणी औद्योगिक कामगारांची गरज आहे, हे ओळखून त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण शाळा म्हणजे आयटीआयच्या शिक्षणाला प्रारंभ केला, जेणेकरून प्रशिक्षित कामगार वर्ग स्थानिक पातळीवर उपलब्ध होवू शकेल, ही त्यामागची धारणा. ज्यात ते चांगल्याप्रकारे यशस्वी झाले, असे म्हणता येईल. त्याचप्रमाणे साखरशाळा, श्रमिक शाळा, संगणक प्रशिक्षण, नापासांची शाळा, दत्तक पालक योजना आदी बऱ्याच गोष्टींचा एका कल्पकतेने त्यांनी प्रारंभ केला. जागतिकीकरणाच्या रेट्याला त्यांचा विरोध राहिला. एनडी पाटील म्हणजे रयतेच्या प्रश्नांचे मांडणी आणि सोडवणूक करणारी एक संस्था बनले होते. निस्पृह आणि स्वच्छ नेतृत्व असणारे एनडी पाटील रयत शिक्षण संस्थेच्या दर्जा आणि गुणवत्तेशी कधी तडजोड केली नाही. मात्र, वयपरत्वे सर्वच बाबी थेट लक्ष ठेवून करता येत नाही. त्यामुळे कामाचे नियोजन करताना काही कामे इतरांकडे सोपवावी लागतात. हा एक लोकशाहीत सत्ता विकेंद्रीकरणाचाही भाग असतो. परंतु, बऱ्याच वेळा चांगल काम केले असतानाही हस्तकांचा शिरकाव झाल्यावर काही गोष्टी घडतात. अलिकडे रयत शिक्षण संस्थेतही प्राध्यापक पदासाठी आकडेमोड करावी लागत असल्याच्या बाबी कानावर पडत. परंतु, अशा बाबींचा एनडी पाटील यांच्याशी थेट कधीही संबंध नव्हता याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आजिवन झटणारे एनडी पाटील यांच्यानंतर मराठे तर शेतकरी नेत्याकडे रयत ची धुरा यावी, अशी एनडी पाटील यांची अपेक्षा होती. त्यांच्यानंतर संस्थेचे वारस ही बाब प्रामुख्याने करतील ही अपेक्षा व्यक्त करतानाच तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आम्हाला वाटते. रयत शिक्षण संस्था आणि शेतकरी कामगार पक्ष या दोन्हींच्या नेतृत्वाला महाराष्ट्र एकाचवेळी मुकला. त्यांच्या दीर्घायुष्य काळातील त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा इतिहास सत्तर वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यांचे सार्वजनिक आयुष्य जेवढं राहीलं तेव्हढं अजून आमचं वय देखील नाही. शेतकरी, श्रमिकांसाठी झटणाऱ्या या नेतृत्वाला विनम्र अभिवादन.
COMMENTS