शिवसेनेतील भूकंप सत्ता वाचवणार का ?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

शिवसेनेतील भूकंप सत्ता वाचवणार का ?

राज्यात विधानपरिषदेच्या 10 जागासाठी मतदान झाल्यानंतर रंगलेले नाटय आणि त्यानंतर हाती आलेल्या निकालात शिवसेनेने आपल्या दोन्ही जागा जिंकल्या असल्या तरी

विकेंद्रीकरण की एकाधिकारशाही
दहशतवादाच्या घटना चिंताजनक
इंडियाविरुद्ध एनडीएचा सामना रंगणार

राज्यात विधानपरिषदेच्या 10 जागासाठी मतदान झाल्यानंतर रंगलेले नाटय आणि त्यानंतर हाती आलेल्या निकालात शिवसेनेने आपल्या दोन्ही जागा जिंकल्या असल्या तरी काँग्रसच्या उमेदवाराचा पराभव झाला. यात विशेष म्हणजे भाजपचे 104 आमदार आणि अपक्षांना धरून 112 मतसंख्या असलेल्या भाजपला जवळपास 133 मते पहिल्या पंसतीचे मिळाल्याचे समोर आले. यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची शंका महाराष्ट्रातील जनतेच्या मनात चुकचुकली. आणि काही तासांतच शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि काही आमदार नॉट रिचेबल असल्याचे समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील हा नाराजीचा दुसरा अंक असल्याचे समोर आले.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत 12 आमदार असून, त्यांनी रात्रीच सुरत गाठल्याचे समोर आले. ते मुक्कामी असलेल्या हॉटेलच्या बाहेर गुजरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असून, गुजरातचे मुख्यमंत्री या घटनेवर नियंत्रण ठेवून असल्याचे समोर आले आहे. एकीकडे विधानपरिषदेच्या निवडणुकीचा आनंद व्यक्त होत असतांना, महाराष्ट्रातील राजकारण सत्ताबदलाच्या दिशेने निघाल्याचे यानिमित्ताने समोर आले. विशेष म्हणजे देवेेंद्र फडणवीस देखील आपला नाशिक दौरा सोडून दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत. शिवाय एकनाथ शिंदे यांच्यासोबत 12 आणि आमदार असून, आणखी काही आमदार बंडांच्या तयारीत असल्यामुळे, महाविकास आघाडीतील सरकार कोसळण्याच्या स्थितीत आहे. आघाडी सरकारला वाचवण्यासाठी सध्यातरी कोणता चमत्कार होईल, अशी कोणतीही शक्यता दिसून येत नाही. राष्ट्रवादी कॉगे्रसमधील बंड असते, तर कदाचित शरद पवारांनी ते थोपवले असते. मात्र शिवसेनेतील बंड आता शांत होण्याची शक्यता नाही. खरं पाहिले पाहिजे, शिवसेना वाढवण्यात आणि मोठी करण्यात एकनाथ शिंदे यांचा मोठा हात आहे. मात्र अलीकडच्या काही वर्षांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हातात घेतल्यानंतर शिंदे यांचे पंख छाटण्याचेच काम केले. परिणामी गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे नाराज असल्याचे बोलले जात होते. उद्धव ठाकरे एकतरा महत्वाच्या जबाबदार्‍या आदित्य ठाकरेंवर सोपवतांना दिसून येत आहेत, किंवा पक्षातील इतरांवर. त्यामुळे एकनाथ शिंदे मंत्रीमंडळात असून देखील त्यांच्यावर एकप्रकारे विश्‍वास नसल्याचे शिवसेना सूचित करत होती. त्यामुळे दुखावलेल्या शिंदे यांनी बंड करत पक्षाला पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. शिवसेनेचा एक गट शिंदे यांच्यासोबत असल्यामुळे त्यांची आमदारकी जाणार नाही. कारण राज्यपालांकडे ते स्वतंत्र गटाची नोंदणी करून, ते भाजपला पाठिंबा देऊ शकतात. आणि शिवसेनेचा बंडखोर गट आणि भाजप पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात. जर असे झाले तर, एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद मिळू शकते. शिंदे हे महत्वाकांक्षी नेते असल्यामुळे, त्यांची पक्षात होणारी कोंडी त्यांच्या बंडाला कारणीभूत ठरतांना दिसून येत आहे. महाविकास आघाडीतील सरकार जर पायउतार झाले तर त्याला शिवसेनाच कारणीभूत ठरणार आहे. कारण मुख्यमंत्री शिवसेनेचा असून, देखील त्यांना आपला पक्ष सांभाळता आला नाही, त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले तर त्याला शिवसेनाच जबाबदार असणार आहे. एकीकडे शिवसेना नेत्यांच्या मागे लागलेल्या ईडी, सीबीआय चौकश्या यामुळे शिवसेनेत मोठी नाराजी होती. शिवसेनेने भाजपशी जुळवून घ्यावे असा देखील मतप्रवाह होता. त्यातच शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेतील नाराज आमदार बाहेर पडू शकतात, आणि हा आकडा वाढू शकतो. त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी शिवसेना काय निर्णय घेते, याकडे राज्याचे लक्ष आहे. शिंदे यांच्यासोबतच काँगे्रसमध्ये देखील नाराज आमदारांचा मोठा गट आहे. कारण सत्तेत असूनही त्याची फळे चाखता येत नाही, शिवाय केंद्रीय तपास यंत्रणांची भीती असल्यामुळे आमदार शिंदे गटासोबत किंवा भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.

COMMENTS