पुणे ः पुण्यात सर्वाधिक ऑनलाईन फसवणुकीच्या घटना घडत असल्याचे समोर येत आहे. सायबर चोरट्यांकडून नव-नवे फंडे शोधून त्या मार्गाने फसवणूक करण्यात येत
पुणे ः पुण्यात सर्वाधिक ऑनलाईन फसवणुकीच्या घटना घडत असल्याचे समोर येत आहे. सायबर चोरट्यांकडून नव-नवे फंडे शोधून त्या मार्गाने फसवणूक करण्यात येत आहे. पुणे शहरातील तीन जणांची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोंढवा, सिंहगड, उत्तमनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंद पॉलिसीमधील पैसे काढून देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांने एकाची 5 लाख 50 हजार 499 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवदास शालिकराम मोरे (वय-42, रा. कोंढवे धावडे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 4 ते 9 मे 2024 या दरम्यानच्या काळात घडली आहे. सायबर चोरट्याने फिर्यादी मोरे यांना संपर्क करून तुम्ही 2013 मध्ये काढलेली मॅक्स लाईफ पॉलिसी बंद झाली असून त्यात 1 लाख 84 हजार रुपये असून ते कढायचे असल्यास तुम्हाला वरिष्ठांशी बोलावं लागेल असे सांगितले. यानंतर फोन संदर्भातील माहिती घेऊन तो हॅक केला. यानंतर फिर्यादि यांच्या नावावर 4 लाख 92 हजार 997 रुपये कर्ज घेतले. ही रक्कम फिर्यादी यांच्या बँक खात्यात जमा झाली. यानंतर सायबर चोरट्याने फिर्यादी यांच्या बँक खात्यातून 5 लाख 50 हजार 499 रुपये काढून घेत फसवणूक केल्याचे फिर्यादेत नमूद केले आहे. पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत. तर दुसर्या एका घटनेत टास्क पूर्ण केल्यानंतर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने 33 वर्षीय तरुणीची 3 लाख 70 हजार 460 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी कोंढवा खुर्द येथे राहणार्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्याने फिर्यादी महिलेला टास्क पूर्ण करायला लावून काही रक्कम कमिशन म्हणून पाठवली. यानंतर विश्वास संपादन करून गुंतवणूक करायला लावून 3 लाख 70 हजार 460 रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादेत नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरवसे तपास करत आहेत. तर तिसर्या घटनेत कमी किंमतीत मोबाईल मिळवून देण्याच्या आमिषाने एका तरुणीची 70 हजार 999 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी नर्हे येथे राहणार्या 24 वर्षीय तरुणीने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.सायबर चोरट्याने फिर्यादी तरुणीला इंस्टाग्राम वर एक लिंक पाठवून नवीन मोबाईल कमी किंमतीत मिळेल असे सांगून वेगवेगळ्या चार्जेसच्या नावाखाली 70 हजार 999 रुपये पाठवायला लावून फसवणूक केल्याचे फिर्यादेत नमूद केले आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) एस जगताप पुढील तपास करत आहेत.
COMMENTS