Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टेंभूच्या पाणी योजनातून हजारो हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार; आगामी काळात प्रभाकर देशमुखांच्या नेतृत्वाखाली माण-खटावचे प्रश्‍न मार्गी लावणार : ना. अजित पवार

वरकुटे-मलवडी : कृतज्ञता मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार व उपस्थित जनसमुदाय. (छाया : विजय भागवत, म्हसवड) गोंदवले / वार्ताहर : देशातील शेत

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 82 हजार 435 शेतकर्‍यांना मिळणार लाभ
शाळांमध्ये हेल्थ क्लिनिक सुरू करुन कोरोना प्रतिबंधक साधनसुविधा पुरविण्याची शिक्षक परिषदेची मागणी
बोगस बि-बियाण्यांसह खतांची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी : पालकमंत्री

गोंदवले / वार्ताहर : देशातील शेतकर्‍यांचे लाडके नेते असलेल्या शरद पवार यांची नेहमीच माण-खटावच्या जनतेने पाठराखण केली आहे. त्यामुळे येथील जनतेशी आमचे जिव्हाळ्याचे नाते असून हेच नाते अधिक दृड करण्यासाठी माण-खटावच्या हजारो हेक्टर क्षेत्रात हरितक्रांती घडवण्यासाठीच महाविकास आघाडीच्या माध्यमातून टेंभू योजनेतून अडीच टिएमसी पाणी देण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अर्थसंकल्पीय वर्ष संपण्यापुर्वी हे पाणी माण-खटावच्या शिवारात फिरताना दिसेल तर उर्वरीत माणच्या सर्व गावांनाही पाणी देण्यासाठी सर्वेक्षणाचे काम जलद गतीने सुरु आहे. फक्त राष्ट्रवादी पक्षच माण-खटावचे प्रश्‍न मार्गी लावत असून येथील प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रभाकर देशमुख हे सतत मंत्रायलयात हेलपाटे मारताना दिसतात. त्यामुळे यापुढे देशमुख सांगतील ते प्रश्‍न प्राधान्याने सोडवले जातील अशी स्पष्टोक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
टेंभू योजनेतून माण-खटावमधील 57 गावांचा समावेश केल्याबद्दल वरकुटे-मलवडी येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आयोजित कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, प्रभाकर देशमुख, आ. दिपक चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, प्रा. कविता म्हेत्रे, सुभाष शिंदे, संदीप मांडवे, अभय जगताप, अनुराधा देशमुख, नंदकुमार मोरे, वडुज नगराध्यक्षा मनिषा काळे दहिवडी नगराध्यक्ष सागर पोळ, बाळासाहेब सावंत, सरपंच बाळासाहेब जगताप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, माण-खटावमध्ये आमच्या विचाराचा लोकप्रतिनिधी नाही तरीही येथील जनता आमची आहे. अन या जनतेची गेली अनेक वर्षाची पाण्याची मागणी प्राधान्याने सोडवण्याचे काम राज्यातील आमच्या सरकारने हाती घेतले आहे. यासाठी या तालुक्यांना वरदान ठरणार्‍या टेंभू योजनेचा अतिरिक्त पाण्याचा कोटा वाढवुन ते वाढीव अडीच टिएमसी पाणी या तालुक्याला देण्याचा धाडसी निर्णय आम्ही घेतला आहे. त्यासाठी जलसंपदा खात्याला लागेल तेवढा निधी उपलब्ध करुन देण्याचे काम मी उपमुख्यमंत्री या नात्याने करत आहे. यामुळे सध्या या दोन्ही तालुक्यातील 57 गावांना लाभ होणार आहे. तरीही उर्वरीत गावांनाही याचा लाभ कसा देता येईल, यासाठी सर्व्हेक्षणाचे काम जलद गतीने सुरु आहे. टेंभू योजनेबरोबरच उरमोडी, जिहे-कठापूर या योजनांचा लाभ माण-खटावच्या जनतेला देण्याचा आमचा प्रयत्न असून त्या योजनानांही निधी उपलब्ध करुन दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष हा शब्द देणारा पक्ष नसून तो वचनपुर्ती करणारा पक्ष आहे. येथील लोकप्रतिनिधी आमच्या विचाराचा नसला तरी येथील लोकं आमच्या विचाराची आहेत कोण काय म्हणतय, कोण काय करतय याकडे मी लक्ष देत नाही तर आम्हाला सामान्य जनतेसाठी काय करता येईल याचा आम्ही सतत विचार करत असतो. माण-खटावच्या जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी येथील राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख हे नेहमीच आग्रही राहिले आहेत. त्यांनी यापुढे सर्वांना सोबत घेवून एकत्रीत काम करावे. येथील सर्व कार्यकर्त्यांनीही देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करताना येथील प्रश्‍न मार्गी लावावेत. प्रभाकर देशमुख यांच्या संकल्पनेतुनच माण-खटावच्या भूमीत औद्योगिक प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी काही उद्योजक येथे गुंतवणुक करण्यास तयार आहे. लोकप्रतिनिधींनी आपल्या भागात जी काही विकासकामे सुरु आहेत. त्याच्या आड न येता ठेकेदाराकडून काही चुकीचे होत असेल तर सुधारणा करावी काम थांबवू नये. काम थांबले तर त्या कामाची किंमत भविष्यात वाढते हे होऊ नये यासाठी प्रत्येकाने कामे दर्जेदार होण्याकडे लक्ष द्यावे. विकास कामात जर कोणी आडवे आले तर त्याच्यावर थेट कारवाई करा, असे स्पष्ट आदेश ना. पवार यांनी भरसभेत जिल्हा पोलीस प्रमुखांना दिले.
ना. जयंत पाटील म्हणाले, दुष्काळी माण खटाव भागातील जनतेने व नेत्यांनी या भागाला पाणी कधीच मिळणार नाही. अशी मानसिकता आजवर करुन घेतली होती. पण राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख खा. शरद पवार यांनी दुष्काळी जनतेला पाणी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागाने पाणी आरक्षित करुन टेंभूचे पाणी, जिहे कटापूरचे तसेच उरमोडीचे उर्वरित कामांना वित्तविभागाने मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केल्याने येत्या काळात हि सर्व पाणी योजनांची कामे पूर्णत्वास जाऊन जिथे कुसळे उगवत होती. तिथे बागायत शेती होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त करुन हे स्वप्न थोड्याच दिवसात पूर्ण होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. ज्या ठिकाणी कोणत्याही योजनेचे पाणी पोहचू शकत नाही त्याठिकाणी पाणी देवून धाडसी निर्णय घेतला आहे. माण-खटावच्या शेतीला नवसंजीवनी देण्यासाठी टेंभूचे पाणी महाविकास आघाडी सरकारने आरक्षित करुन अशक्य ते शक्य करुन दाखवले आहे.
यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व खा. श्रीनिवास पाटील यांनी माण-खटावची जनता ही स्वाभिमानी असल्याचे सांगत खा. पवार यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवणारी आहे. पवार साहेबांनीच येथील पाणी प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन येथील जनतेला दिले होते. त्या आश्‍वासनाची पुर्ती आज होताना दिसत असल्याचे सांगत लवकरच या भूमीत टेंभूचे पाणी खळाळताना दिसणार असून त्याचे पुजन करण्यासाठी स्वत: पवार साहेब उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.
प्रभाकर देशमुख म्हणाले, माण व खटाव मधील सर्वात उंचीवरील गावांना पाणी देण्याचा धाडसी निर्णय राष्ट्रवादी पक्षाने घेत त्यासाठी टेंभू योजनेचे अडीच टिएमसी पाणी आरक्षित केले आहे. दुष्काळी माणच्या भूमीत पाणी आडवा-पाणी जिरवा ही संकल्पना घेवुन आपण गावोगावी फिरुन पाणी फौंडेशनच्या माध्यमातून एक चळवळ उभी केली. त्यासाठी हजारो लोकांनी श्रमदान केले तर नोकरवर्गाने आर्थिक मदत केली. यामुळे मोठे काम उभे करता आले. या कामासाठी ज्यावेळी निधीची गरज निर्माण झाली. त्यावेळी खा. पवार यांनी पुढे होवुन यासाठी साडे 6 हजार कोटी रुपये उपलब्ध करुन दिले. त्यामुळेच आज माण-खटावमधील शेकडो गावे ही टँकरमुक्त झाली आहेत. टेंभू योजनेतून खटाव तालुक्यातील डांबेवाडी ते कलेढोण तर माणमधील किरकसाल ते कुकुडवाड या परिसरातील 57 गावांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये माणमधील 30 गावे तर खटावमधील 27 गावांना याचा लाभ मिळणार आहे. लवकरच उर्वरीत गावांनाही पाण्याचा लाभ दिला जाणार आहे.

माझ्याकडे राज्याचे अर्थ खाते असल्याने मी वाढप्याच्या भूमिकेत असून पंगतीला जेवन करताना वाढपी ओळखीचा असला तर जेवन जास्त मिळते. तसा मी तुमच्या ओळखीचा वाढपी असल्याने माण खटावला जास्त निधी देवून येथील कोणत्याही विकासकामांना निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
दहिवडी वडूज म्हसवड या तिन्ही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे सध्या दुर्भीक्ष असून त्यापैकी वडूज व दहिवडी याठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून पाणी प्रश्‍न सोडवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच म्हसवड शहरासाठी सुधारित पाणी योजनेसाठी 86 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

COMMENTS