शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांना पुन्हा निवडून येऊ देणार नाही

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांना पुन्हा निवडून येऊ देणार नाही

नगरचे नवे संपर्क प्रमुख आ. शिंदेंचा विश्‍वास

अहमदनगर/प्रतिनिधी : उत्तर नगर जिल्ह्याचा संपर्क प्रमुख असताना शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेतून मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केला असला

सत्ता आणि खुर्चीसाठी उद्या शिवसेना एमआयएम सोबत सुद्धा युती करेल
ठाकरे गटाची उच्च न्यायालयात धाव
माथाडी कामगारांसाठी विविध उपक्रम राबवावेत – संभाजी कदम

अहमदनगर/प्रतिनिधी : उत्तर नगर जिल्ह्याचा संपर्क प्रमुख असताना शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेतून मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केला असला तरी ते कोणाचे अपयश म्हणता येणार नाही. ते एकटेच गेलेले नाहीत तर 12जणांनी त्यांची तशी भूमिका जाहीर केली आहे. पण जे तिकडे गेले, ते परत येथून निवडून येणार नाही व त्यासाठी आम्ही सक्रिय राहू, असा विश्‍वास नगर दक्षिणेचे शिवसेनेचे नवे संपर्क प्रमुख आ. सुनील शिंदे यांनी बुधवारी येथे व्यक्त केला. दरम्यान, नगर उत्तर जिल्ह्याचे नवे संपर्क प्रमुख व माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिर्डीतून स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली नाही तर फक्त उमेदवारीची इच्छा प्रदर्शित केली आहे व त्यासाठी ते पात्रही आहेत. त्यामुळे त्यांनी लढण्याची इच्छा मनात ठेवली तर ते गैर नाही, असेही आ. शिंदे यांनी आवर्जून स्पष्ट केले.
नगर दक्षिणचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्याविषयी नगर शहर व दक्षिणेतील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या तक्रारी असल्याने पक्षाने त्यांची उचलबांगडी केली आहे. त्यांच्या जागी विधान परिषदेतील मुंबईचे आमदार सुनील शिंदे यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी बुधवारी येथे येऊन दक्षिण नगर जिल्ह्यातील नगर शहर, श्रीगोंदे, पारनेर, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव व नगर तालुक्यातील पदाधिकारी, नगरसेवक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांशी संवाद साधला.
दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे व राजेंद्र दळवी, उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, शहर प्रमुख संभाजी कदम यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महापौर रोहिणीताई शेंडगे, मनपा महिला व बालकल्याण समिती सभापती पुष्पा बोरुडे, ज्येष्ठ नेते श्रीराम येंडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर व अभिषेक कळमकर, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, माजी विरोधी पक्ष नेते संजय शेंडगे, उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, श्याम नळकांडे, सचिन शिंदे, विजय पठारे आदींसह सुरेश क्षीरसागर, हषवर्धन कोतकर, संग्राम कोतकर, परेश लोखंडे, दीपक कावळे, सुरेश तिवारी, शिरीष जानवे, रावजी नांगरे, गौरव ढोणे, राजू देठे, अमोल येवले, योगिराज गाडे, महिला आघाडीच्या सुजाता कदम, अरुणा गोयल, युवा सेनेचे रवि वाकळे, अशोक दहिफळे, आनंद लहामगे, संदेश कार्ले आदी उपस्थित होते.

त्यांची बंडखोरी आहे की नाही बघू
नगर शहरातून काही नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला समर्थन दिले आहे. यावर मत व्यक्त करताना आ. शिंदे म्हणाले, राज्यभरात गोंधळ सुरू आहे. त्यामुळे त्यांची बंडखोरी आहे की नाही, हे आता सांगता येणार नाही. एखाद्याला भेटणे व त्याच्याशी सक्रियता-क्रीयाशीलता यात फरक असतो. शिवाय कारवाईचा अधिकार पक्ष प्रमुखांना असतो, त्यामुळे खात्री केल्याशिवाय यावर बोलणार नाही. महिनाभरात मी सक्रिय राहून सारे पाहीन. त्यांच्याशी बोलून ते शिवसेनेत थांबतात काय, याबाबत प्रयत्न करीन, असे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले, शिवसेनेत गट-तट आहेत व ते अपेक्षितही आहेत. पण निर्णायक क्षणी सारे एक होतात व हे आता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला तसेच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुरू असलेल्या भेटीगाठींना मिळत असलेला प्रतिसाद पाहून स्पष्ट होत आहे. लोकप्रतिनिधी जरी तिकडे गेले असले तरी त्यांना मोठे करणारे शिवसैनिक जागेवरच आहेत व त्यांचे लाखो हात आमच्या समवेत असल्याने आम्ही बदला घेतलाशिवाय राहणार नाही, असेही आ. शिंदे यांनी आवर्जून स्पष्ट केले.

आमची ताकदही सक्षम
राज्यातील महाविकास आघाडी सरकार लोकांना आवडले होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून उतरायचे की स्वतंत्र, याचा निर्णय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत. त्या-त्या वेळच्या राजकीय व स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय होऊ शकतो, पण आम्ही शिवसैनिकांच्या ताकदीवर स्वबळावर लढण्यासही सक्षम आहोत, असे स्पष्ट करून आ. शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील शिवसेना दमदार व मजबूत आहे. त्यामुळे येथे यश प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. संघर्षाच्या काळात प्रत्येकाच्या खांद्यावर भगवा आहे. त्यामुळे प्रभागांतून व गट-गणांच्या कार्यक्षेत्रात शाखांच्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे व स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्यावर भर देणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्या पराभवाचे सदभाग्य लाभले
पदाधिकारी बैठकीत बोलताना आ. शिंदे यांनी स्वतःच्या राजकीय वाटचालीची माहिती दिली. वयाच्या 15 वर्षापासून सेनेत सक्रिय आहे. शाळेत जाताना व येताना सेना शाखेत जाऊन तेथील खुर्च्या व सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची तसबीर पुसून घ्यायचो. पुढे मुंबईत 18 वर्षे शाखा प्रमुख राहिलो, विक्रमी मताने नगरसेवक झालो व आमदारही झालो. त्यावेळी 2014मध्ये वरळी मतदार संघात राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याचा पराभव करण्याचे सदभाग्य मला लाभले. त्यानंतरच्या 2019 निवडणुकीत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंसाठी वरळी विधानसभा मतदार संघ सोडल्याने मी आता विधान परिषदेचा आमदार आहे, असे सांगून ते म्हणाले, आक्रमकता हे शिवसैनिकाचे वैशिष्ट्य आहे. पण त्याबरोबर संयम व शिस्त असेल तर नेतृत्वाला यश मिळत असते. नगरचे माजी आमदार (स्व.) अनिलभय्या राठोड नेहमी माझ्या शाखेत यायचे. उत्तर नगर जिल्ह्यात मी संपर्क प्रमुख म्हणून काम केले असल्याने हा जिल्हा नवीन नाही. मात्र, कार्यकर्त्यांनी पक्षातील विविध पदाधिकार्‍यांचा मान राखला पाहिजे व जनतेशी संवाद ठेवला पाहिजे. तसेच वागण्या-बोलण्यातून शिवसेना किती चांगली आहे, हे सांगितले पाहिजे. पक्षाचे येथे आमदार-महापौर होते. त्यामुळे येथील मजबूत संघटन अधिक प्रभावी होण्यासाठी येत्या 8-10 दिवसात शाखानिहाय बैठका घेऊन व तेथील उपक्रमांचा आढावा घेऊन त्याचा अहवाल देण्याचे तसेच कोण गेले वा कोण राहिले याचा विचार न करता गावा-गावांतून नव्या शाखा सुरू करण्याचे पदाधिकार्‍यांना सांगितले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिंदे साहेब नको…सुनीलजी म्हणा
नवे संपर्क प्रमुख आ. शिंदे यांचे स्वागत करताना जिल्हा प्रमुख प्रा. गाडे यांनी दोनदा त्यांचा शिंदेसाहेब म्हणून उल्लेख केला. पण सेनेतून बाहेर पडलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही शिंदेसाहेबच म्हटले जात असल्याने तुम्हाला सुनील शिंदेसाहेब म्हणतो, असे प्रा. गाडे म्हणताच…फक्त सुनीलजी म्हणा, असा मध्यम मार्ग खुद्द आ. शिंदे यांनीच काढला व त्यांना शिंदेसाहेब म्हणायचे कसे, या विवंचनेतील उपस्थित सगळेच रिलॅक्स झाले.

COMMENTS