बिनविरोधला ठेंगा…शिक्षक बँकेत चौरंगी लढत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिनविरोधला ठेंगा…शिक्षक बँकेत चौरंगी लढत

अहमदनगर/प्रतिनिधी : शिक्षकांची व बँकेची प्रतिष्ठा राखली जावी म्हणून यंदाची निवडणूक बिनविरोध करण्याची चर्चा घडवणारांना शिक्षक नेत्यांनीच ठेंगा दाखवला

नगर जिल्हा अध्यात्माची भूमी – पालकमंत्री विखे
शाळेतून विद्यार्थ्यांचा खरा व्यक्तिमत्व विकास : ना.आशुतोष काळे
लॉकडाऊन करण्यापूर्वी सर्वसामान्यांच्या पोटा-पाण्याचा प्रश्‍न सोडवा l Lockdown in Maharashtra

अहमदनगर/प्रतिनिधी : शिक्षकांची व बँकेची प्रतिष्ठा राखली जावी म्हणून यंदाची निवडणूक बिनविरोध करण्याची चर्चा घडवणारांना शिक्षक नेत्यांनीच ठेंगा दाखवला आहे. परिणामी, जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या 21 जागांसाठी आता चौरंगी लढत होणार आहे. दरम्यान,बँकेसाठी 800जणांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यापैकी तब्बल 707जणांनी सोमवारी माघार घेतली. त्यामुळे निवडणूक रिंगणात आता 93 उमेदवार उरले आहेत. या उमेदवारांना आज (मंगळवारी, 12 जुलै) चिन्ह वाटप होणार आहे. कोणत्या मंडळाला कोणते चिन्ह मिळते, याची उत्सुकता आहे.
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेसाठी येत्या 24 तारखेला मतदान होणार आहे. यासाठी सोमवारी (11 जुलै) उमेदवारी माघारीचा शेवटचा दिवस होता. यावेळी दुपारी तीनपर्यंत निवडणुकीतील सर्व मंडळांच्या उमेदवारांनी व त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करीत उमेदवारी अर्ज माघारी घेतले. यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला जत्रेचे स्वरुप आले होते. शिक्षक नेत्यांनी आपल्या उमेदवारांना उमेदवारीचे तिकीट देताना, त्याचवेळी त्यांचा माघारीचाही अर्ज भरून घेतला होता. परिणामी, अवघ्या चार तासात तब्बल 707 उमेदवारांचे अर्ज माघारी घेतले गेले. त्यामुळे आता 93 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.

सदिच्छाने घेतली उडी
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आधी तीन मंडळांमध्ये लढतीची अपेक्षा होती. पण, ऐनवेळी सदिच्छा मंडळाने इब्टा, प्राथमिक शिक्षक संघ (संभाजीराव थोरात गट) आणि साजीर या तीन मंडळांना एकत्र आणत बँकेच्या निवडणुकीत चौथे मंडळ उभे केले. यामुळे शिक्षक बँकेच्या निवडणुकीतील रंगत वाढलीआहे. बँकेच्या निवडणुकीत आता सत्ताधारी गुरूमाऊली मंडळ (बापूसाहेब तांबे गट), गुरूमाऊली (रावसाहेब रोहकले गट), गुरूकुल आणि स्वराज मंडळ तसेच सदिच्छा मंडळासह अन्य तिघे अशी चार मंडळे निवडणुकीच्या रिंगाणात राहणार आहेत. मागील सत्ताधारी गुरूमाऊली गटाचे दोन गट झाले असून यंदा सत्ताधारी तांबे गटाने सोबत ऐक्य मंडळ आणि शिक्षक भारती यांना घेतले असून डॉ. संजय कळमकर यांच्या गुरूकुल मंडळाने ऐनवेळी स्वराज्य मंडळाच्या हातात हात घालत निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. रोहकले यांच्या गटाने स्वबळाचा नारा दिला आहे व सदिच्छा मंडळाने अन्य तीन मंडळांना सोबत घेतले आहे. जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेसाठी येत्या 24 जुलैला मतदानाची प्रक्रिया होणार आहे. बँकेचे 10 हजार 400 हून अधिक सभासद असून त्यांनी आपले मताचे दान कोणाच्या पारड्यात टाकले हे 25 जुलैला मतमोजणीनंतर समजणार आहे.

रिंगणात उमेदवार आणि कंसात माघार घेतलेले
सर्वसाधारण मतदारसंघ संगमनेर 4 (37), नगर 5 (32), पारनेर 5 (32), कोपरगाव 4 (21), राहाता 4 (24), श्रीरामपूर 6 (30), जामखेड 4 (31), पाथर्डी 5 (34), राहुरी 5 (20), शेवगाव 4 (21), श्रीगोंदा 4 (34), अकोले 4 (22), नेवासा 4 (34), कर्जत 4 (25), भिंगार 9 (22), अनुसूचित जाती जमाती 5 (59), महिला राखीव 8 (90), ओबीसी 5 (78), एनटी 4 (61), एकूण 93 (707). यात 9 तालुक्यात चार मंडळांचे चौघे निवडणूक रिंगाणात असल्याने या ठिकाणी अटीतटीची सरळ लढत होणार आहे.

विकास मंडळातही चौरंगी लढत
शिक्षक बँकेसोबत होणार्‍या जिल्हा विकास मंडळाच्या निवडणुकीतही चार मंडळे उभी ठाकली आहेत. याठिकाणी सत्ता मिळविण्यासाठी शिक्षक मंडळे कामाला लागली आहे. विकास मंडळ ही पूर्वी शिक्षक बँकेची मालमत्ता होती. मात्र, बँकिंग नियमामुळे तिचे विश्‍वस्त संस्थेत रुपांतर करण्यात आले असून बँकेचे सभासद हे विकास मंडळाचे सभासद असल्याने या संस्थेची निवडणूक बँकेसोबत होणार आहे.

COMMENTS