नागपूर : राज्यघटना अधिक बळकट करण्यासाठी आरक्षणाची 50 टक्के मर्यादेची भिंत पडणारच आहे. जातवार जनगणना मंजूर होणारच,’ अशी घोषणा लोकसभेतील विरोधी पक्
नागपूर : राज्यघटना अधिक बळकट करण्यासाठी आरक्षणाची 50 टक्के मर्यादेची भिंत पडणारच आहे. जातवार जनगणना मंजूर होणारच,’ अशी घोषणा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी नागपुरात केली. ‘आरएसएस, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे रोखून दाखवावेच,’ असे आव्हानही त्यांनी दिले. येथे आयोजित संविधान सन्मान संमेलनात ते बोलत होते.
यावेळी बोलतांना राहुल गांधी म्हणाले की, भाजप व संघाच्या लोकांना संविधानावर समोरून टीका करता येत नाही. त्यामुळे ते त्याच्यावर लपून हल्ला करतात. हे लोक विकास, प्रगती व अर्थव्यवस्था आदी शब्दांमागे लपून येतात. पण त्यांचे उद्दीष्ट संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणे हेच आहे, असे ते म्हणाले. राहुल गांधी पुढे म्हणाले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत होते तेव्हा त्यांच्या तोंडातून कोट्यवधी लोकांचा आवाज निघत होता. ते स्वतःच्या नव्हे तर समाजातील दीनदुबळ्यांच्या वेदना मांडत होते. त्यांची पुस्तके वाचल्यानंतर आपल्याला त्याची प्रचिती येते. मी स्वतः त्यांचा अभ्यास केला. त्यातून मला हे प्रकर्षाने जाणवले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने बाबासाहेबांना संविधान तयार करण्याची विनंती केली. त्यात या देशातील कोट्यवधी दलितांच्या वेदना मांडण्याची सूचना केली. त्यानुसार बाबासाहेबांनी हे काम अगदी चपखलपणे केले. पण आता काही लोक म्हणतात की, हे संविधान स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच तयार करण्यात आले. त्यामुळे त्यात काही दोष आहेत. पण आता मला सांगा, या संविधानात महात्मा फुले यांचा आवाज नाही का? त्यात गौतम बुद्धांचा आवाज नाही का? त्यात बसवण्णा यांचा आवाज नाही का? सावित्रीबाई फुले यांचा आवाज नाही का? त्यात या सर्वांचा आवाज आहे. त्यामुळेच काँग्रेस या संविधानाचे संरक्षण करत आहे. राहुल गांधी म्हणाले, भारतीय संविधान 21 व्या शतकातील आहे. पण त्यातील विचार हजारो वर्षांपूर्वींचा आहे. हे विचार गौतम बुद्ध, महात्मा फुले वा आपल्या पूर्वजांचा आहे. या पुस्तकात देशाचे व्हिजन आहे. हे केवळ पुस्तक नाही, ते जगण्याची एक पद्धत आहे. या संविधानात समानतेची भाषा आहे. त्यात सर्वांचा मानसन्मान व आदर करण्याचा उल्लेख आहे. पण भाजपचे लोक यावर आक्रमण करतात. संविधानावर हल्ला करतात, तेव्हा ते या पुस्तकावरच हल्ला करत नाहीत, तर ते हिंदुस्तानच्या आवाजावर आक्रमण करतात. संविधानातूनच भारताच्या संस्था अस्तित्वात आल्यात. त्यामुळे संविधान नसते, तर निवडणूक आयोगासारख्या संस्थाही अस्तित्वात आल्या नसत्या याकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.
जातगणनेचा खरा अर्थ न्याय
जातगणनेचा खरा अर्थ न्याय हा आहे. या देशात 90 टक्के लोकांकडे अधिकारच नसतील, पैसा व धन नसेल, तर त्याला काहीच अर्थ नाही. सध्या अशा लोकांना आदर देण्याची भाषा करत आहे. पण अधिकार, पैसा, धन याशिवाय आदराला काहीच अर्थ नाही. एखादा व्यक्ती उपाशी मरत असेल आणि 24 तास वेदनांत जगत असेल आणि मी त्याला मी तुमचा आदर करतो असे म्हणालो तर त्याला काय अर्थ आहे. या ऐवजी त्याला अधिकार द्या. संधी द्या. असे झाले तर त्याला तुमच्या आदराची गरजच भासणार नाही. तो स्वतःच स्वतःचा मानसन्मान निर्माण करेल, असे राहुल गांधी म्हणाले.
COMMENTS