Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा आखाडा सज्ज

37 सरपंचपदाच्या जागांसाठी 93 तर, 367 सदस्य पदाच्या जागेसाठी 666 उमेदवार रिंगणात

संगमनेर प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा आखाडा सज्ज झाला असून, तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी बुधवार दिनांक 7 ड

शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादीची मुसंडी
ग्रामपंचायतीचे मतदान जवळ येत असल्याने उमेदवार मतदारांच्या गाठीभेटीला वेग  
जामखेडमधील तीन ग्रामपंचायतमध्ये निवडणूक रणधुमाळी सुरू

संगमनेर प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा आखाडा सज्ज झाला असून, तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी बुधवार दिनांक 7 डिसेंबरच्या अर्ज माघारीच्या दिवशी सरपंचपदाच्या 140 तर सदस्य पदाच्या 542 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने  सरपंचपदाच्या जागेसाठी 93 तर सदस्य पदासाठीच्या जागांसाठी 666 उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात राहिले आहेत. सरपंचपदासाठी सर्वाधिक पाच उमेदवार घुलेवाडी ग्रामपंचायतीसाठी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. होणार्‍या या 37 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जोरदार होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.


उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारच्या शेवटच्या दिवसा अखेर सरपंचपदासाठी 251 तर सदस्य पदासाठी 1325 अर्ज दाखल करण्यात आले होते. सरपंचपदासाठी सर्वाधिक निमोण येथून 19 तर जोर्वे येथून 17 अर्ज दाखल करण्यात आले होते. तर सदस्य पदासाठी कोल्हेवाडी आणि जोर्वे येथून प्रत्येकी 86 अर्ज आले होते मात्र माघारीच्या दिवशी बहुसंख्य इच्छुक उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे.तालुक्यातील मुदत संपलेल्या 37 ग्रामपंचायतीसाठी रविवार दिनांक 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 133 प्रभाग संख्या असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत 367 सदस्य निवडून द्यायचे होते यापैकी काही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काही उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत तशी औपचारिकता फक्त बाकी आहे. या निवडणुकीत सरपंचाची थेट संपूर्ण गावाच्या मतदानातून निवड होणार आहे. तब्बल 27 ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी महिलांना संधी उपलब्ध झाली असून केवळ दहा ग्रामपंचायतीत पुरुष वर्गाला संधी या निवडणुकीच्या माध्यमातून मिळणार आहे. निवडणुका होणार असणार्‍या  ग्रामपंचायतीमध्ये रहिमपूर, जोर्वे, कोल्हेवाडी, ओझर खुर्द, उंबरी बाळापुर, निंबाळे, मालुंजे, कनकापूर, सादतपूर, निमगाव जाळी, हंगेवाडी, साकुर, जांभूळवाडी, जांबुत बुद्रुक, रणखांब, दरेवाडी, डोळासणे, कर्जुले पठार, सायखिंडी, कोळवाडे, निमोण, निमगाव भोजापूर, चिकणी, धांदळफळ बुद्रुक, धांदळफळ खुर्द, पोखरी हवेली, निळवंडे, करुले, वडझरी बुद्रुक, वडझरी खुर्द, चिंचोली गुरव, तळेगाव दिघे, पिंपरणे, घुलेवाडी, वाघापूर, खराडी, अंभोरे या 37 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तब्बल 99 हजार 386 मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ग्रामपंचायतच्या निवडणुका ह्या येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबरोबरच विधानसभा, लोकसभा आणि इतर निवडणुकांची रंगीत तालीम असल्याने या निवडणुकांकडे काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि त्यांचे पारंपारिक विरोधक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जातीने लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे 18 डिसेंबरला होणार्‍या या निवडणुकात कोण कोणाला चितपट करणार हे मतमोजणीच्या दिवशी म्हणजे मंगळवार दिनांक 20 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.सत्ताधारी आणि विरोधक या निवडणुकीत एकमेकाची जिरवण्यासाठी सज्ज झाले असून डाव प्रति डाव टाकण्यासाठी रणनीती आखली जात आहे. एकूणच या निवडणुकांकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS