Homeताज्या बातम्यादेश

अमेरिकेच्या व्हेनेझुएला कारवाईवर संयुक्त राष्ट्रांची चिंता

निकोलस मादुरो यांच्या अटकेवर घेतला आक्षेपन्यूयॉर्क : वेनेझुएलामध्ये अमेरिकेने केलेल्या लष्करी हस्तक्षेपामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात तीव्र प्रतिक्

प्रा. तुषार एकनाथ ढोणे यांना पीएच.डी.पदवी
डीजेच्या दणदणाटाने घेतला दाेघांचा जीव; मिरवणुकीत नाचताना जागीच काेसळले
10 वर्षाच्या आरवने केली धरमतर खाडी पार

निकोलस मादुरो यांच्या अटकेवर घेतला आक्षेप
न्यूयॉर्क : वेनेझुएलामध्ये अमेरिकेने केलेल्या लष्करी हस्तक्षेपामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाने या घडामोडींवर गंभीर चिंता व्यक्त केली असून, हा प्रकार आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतो, असा इशारा दिला आहे.
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी वेनेझुएलातील अलीकडील घटनांमुळे अस्वस्थता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या प्रवक्त्यामार्फत जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेच्या लष्करी कारवाईमुळे केवळ वेनेझुएलाच नव्हे, तर संपूर्ण लॅटिन अमेरिकन परिसरातील स्थैर्य धोक्यात येऊ शकते. अशा प्रकारचे हस्तक्षेप आंतरराष्ट्रीय नियमांना छेद देणारे असल्याचे महासचिवांनी अधोरेखित केले. व्हेनेझुएलातील अंतर्गत परिस्थिती कितीही गंभीर असली, तरी कोणत्याही सार्वभौम राष्ट्रात थेट लष्करी हस्तक्षेप करणे संयुक्त राष्ट्रांच्या सनदेला धरून नाही, असे गुटेरेस यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कायदे आणि संयुक्त राष्ट्रांच्या तत्वांना अपेक्षित तो मान दिला गेला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. महासचिवांनी सर्व संबंधित देशांना संयम बाळगण्याचे आवाहन करत, संवाद आणि चर्चेच्या मार्गाने तोडगा काढण्यावर भर दिला. कोणतीही पुढील प्रक्रिया ही सर्वसमावेशक असावी आणि त्यामध्ये मानवी हक्कांचे तसेच कायद्याच्या शासनाचे पूर्ण पालन झाले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार प्रमुख वोल्कर तुर्क यांनीही अमेरिकेच्या कारवाईबाबत चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडिया मंचावर दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी सर्व देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचा आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांचा सन्मान राखावा, असे म्हटले आहे. वेनेझुएलातील सामान्य नागरिकांचे संरक्षण हे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि वेनेझुएला यांच्यात वाढत चाललेला तणाव शुक्रवारी उशिरा अधिक तीव्र झाला. स्थानिक वेळेनुसार रात्री उशिरा कराकासमध्ये अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यांमुळे खळबळ उडाली. या कारवाईत वेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पुढे आली. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत वेनेझुएलामध्ये शांतता प्रस्थापित होईपर्यंत तेथे अमेरिकेचे नियंत्रण राहील, अशी भूमिका मांडली. या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता अधिकच वाढली असून, संयुक्त राष्ट्रसंघ संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहे, हे स्पष्ट झाले आहे.

COMMENTS