राजकारणात अनेकजण मुखवटे घेऊन वावरत असतात. कुणाचाच खरा चेहरा समोर येत नाही, तर ते आपला बाह्य चेहरा घेऊन राजकारण करून मोकळे होतात. मात्र या राजकारण
राजकारणात अनेकजण मुखवटे घेऊन वावरत असतात. कुणाचाच खरा चेहरा समोर येत नाही, तर ते आपला बाह्य चेहरा घेऊन राजकारण करून मोकळे होतात. मात्र या राजकारण्यांचा आतला चेहरा कधीच बाहेर येत नाही. खरंतर राजकारणाचा पोत बदलतांना दिसून येत आहे. आतल्या गोटातले राजकारण बाहेर येण्यासाठी अनेक दशके, वर्ष लोटतात, तेव्हा ते सत्य बाहेर येते. खरंतर सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणून अधिकार क्षेत्राच्या वटवृक्षाखाली गर्दीचे मोहळ दाटण्याची प्रथा जुनी आहे. माञ अधिकार प्राप्तीला पोहचण्यासाठी कष्ट उपसणार्यांचे श्रम जर अधिकारी मंडळींनी दुर्लक्षित केले तर वटवृक्षाच्या सावलीत राहूनही वाढ खुरटण्याची शक्यता बळावते.यालाच आपल्या कृषी भाषेत वसवा असे म्हटले जाते.सध्याच्या राजकारणात असा वसवा निष्ठावंतांच्या सहनशीलतेची परी क्षा पाहू लागला असे म्हटले तर वावगे ठरू नये. सध्याच्या राजकारणात राजकीय फळ असलेल्या वृक्षालाच सगळे चिकटण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहे. राजकारणात संघर्ष हा करावा लागतो. तेव्हाच कुठे नेतृत्व प्रस्थापित होते. मात्र आजकाल सर्व काही आयते मिळाले की, किंवा कुणाच्या तरी आडोशाला लपून, त्यांची सहायता घेऊन राजकारणात स्थिरस्थावर होतांना दिसून येत आहे. रानावनात हिंडतांना अनेक खुरटी झाड जगण्याचा संघर्ष करतांना दिसतात, तशी एखाद्या मोठ्या झाडाचा आधार घेऊन वेल पसरणारे बांडगुळही दिसतात.राजकारणाच्या रानातही या दोन जाती हमखास पहायला मिळतात.खुरटी वाढ असलेले निष्ठावान म्हणविणारे सत्तेच्या दाबाखाली एव्हढे चेपले जातात की त्यांना सत्तेच्या स्पर्धेत कुठेच स्थान दिसत नाही.केवळ निष्ठा आहे म्हणून वाढ खुटली तरी झाडाची सावली ते सोडत नाहीत. दुसर्या बाजूला असतात ती बांडगुळ. कधीतरी संधी मिळेल तेंव्हा मोठे भरगच्च लगडलेले, पोसलेले झाड पाहून वाढणार्या या वेल वर्गीय वनस्पती प्रमाणे राजकारणातील ही बांडगुळ सत्तेत असलेल्या अधिकारप्राप्त नेत्याचा आधार मिळवून सारी राजकीय सुख उपभोगतांना दिसतात. खुरट्या झुडपांचे पीक जसे अमाप येते, कितीही प्रतिकुल परिस्थिती आली तरी हिम्मत सोडत नाहीत, तसेच राजकारणातील हे निष्ठावंत सत्ता असो नसो,पक्ष वाढीसाठी सतत झटत असतात,खुरट्या झुडपांच्या वेडा सारखे या निष्ठावंतांना ध्येयाचे वेड असते. तर बांडगुळांचे लक्ष केवळ मोठ्या झाडाच्या आधारे उदर भरण करणे एव्हढेच लक्ष्य असते. केंद्र आणि राज्य पातळीवर सत्तेवर आल्यानंतर भारतीय जनता पक्षात याच पध्दतीचे सरळ दोन गट स्पष्ट दिसत आहे. पक्षाच्या पडत्या काळात किंबहूना भारताच्या राजकारणात गल्ली ते दिल्ली र्यंत साधा उल्लेखही नसलेल्या भाजपला सत्तेच्या बोहल्यावर बसवण्यासाठी ज्या निष्ठावंतांनी खस्ता खाल्या ते कार्यकर्ते आज सत्तेवर आल्यानंतर पक्षाच्या किंवा सत्तेच्या मुख्य प्रवाहात कुठेही दिसत नाहीत. घरच्या भाकरी खाऊन या मंडळींनी वेड्यासारखा प्रदेश पिंजून काढत पक्षाला अच्छे दिन मिळवून दिले. जेंव्हा सत्तेची खिरापत वाटण्याची वेळ आली तेंव्हा या निष्ठावंतांना वेडे ठरवून अलगद बाजूला काढून उपर्यांसमोर सत्तेचे ताट वाढून ठेवले. ध्येयाने प्रेरीत असलेली माणसे वेडी असतात आणि अशी वेडी माणसं इतिहास निर्माण करतात. भाजपचे हे निष्ठावान वेडे होते म्हणून त्यांनी प्रदीर्घ संघर्षातून भाजपाला सत्तेवर बसविण्याचे दिव्य करून दाखवले. नाही म्हटले तरी या वेड्यांनी हा इतिहास निर्माण केला. पण ते वेडे ठरले म्हणून सत्तेच्या बाजारात राजकीय दलालांनी त्यांच्या हातावर तुरी देऊन त्यांच्या वेडेपणावर मोहोर उमटवली. आणि इतर पक्षातून आयात करून त्यांना सत्ता पदे देण्याचा शहाणपणा सुरू आहे, आणि तो आजच्या राजकारणाचा खरा चेहरा आहे.
COMMENTS