Homeताज्या बातम्यादेश

बिबट्याचा संघर्ष

राज्यात गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर आणि अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याचा वावर शहरी भागात वाढल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनग

वायूप्रदूषण चिंताजनक  
आत्महत्याचे वाढते प्रमाण चिंताजनक
एसटी संपाचा बागुलबुवा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर आणि अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याचा वावर शहरी भागात वाढल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले तर, चंद्रपूर जिल्ह्यात देखील तीन बिबट्याने सहा जणांना जखमी केल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात काही दिवसांपूर्वी एका चिमुरडीला उचलून नेत बिबट्याने तिला ठार केल्याचे समोर आले होते. वास्तविक पाहता बिबट्या हा मानवी वस्तीत का घुसला, त्यासाठी काय प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अपेक्षित आहे, यावर विचारमंथन करणे अपेक्षित आहे.
आजमितीस भारताची लोकसंख्या 143 कोटींच्या वर पोहोचली आहे, मात्र भारताचे क्षेत्रफळ होते, तितकेच राहिलेले आहे. मानवाकडून आपले हातपाय पसरवणे सुरूच असून, तो जंगले तोडून घरे बनवतांना दिसून येत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना सुरक्षित असे जंगल राहिलेले नाही. त्यामुळे बिबट्या असो वा वाघ असो वा इतर प्राणी असो ते आपल्या अन्नाच्या शोधात बाहेर पडतांना दिसून येत आहे. त्यातून बिबट्या मानवी वस्तीत शिरतांना दिसून येत आहे. महाराष्ट्रात देखील बिबट्यांची संख्या मोठी आहे. मध्यप्रदेशनंतर बिबट्या महाराष्ट्रात सर्वाधिक असतांना, त्यांना सुरक्षित अधिवास प्रदान करण्याची जबाबदारी आपली आहे. गेल्या काही दशकांपूर्वी बिबट्याने किंवा वाघाने मानवी वस्तीवर हल्ले केल्याचे प्रमाण क्वचितच पाहायला मिळत होते. मात्र अलीकडच्या काही महिन्यांपासून मानवी वस्तीवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण बिबट्या जंगलात जरी राहत असला तरी, त्याला अन्न मिळत नाही, ही शोकांतिका आहे. कारण जंगले पूर्वीसारखी राहिलेली नाही. पूर्वी जंगलात अनेक वन्यप्राणी असल्यामुळे बिबट्या, वाघ आपली शिकार करून आपले भक्ष्य मिळवत असे. मात्र आजमितीस जंगलंच ओसाड बनतांना दिसून येत आहे. त्यामुळे जंगलाच वन्यप्राण्यांचा वावर तसा राहिलाच नाही. असे असतांना, बिबट्याला आपले भक्ष्य कोठून मिळेल. त्यामुळे बिबट्या असो वा वाघ अनेक दिवसांपासून उपाशी असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच त्यांनी भक्ष्याच्या शोधात आपला मोर्चा मानवी वस्त्यांकडे वळवल्याचे दिसून येत आहे. मग बकर्‍या, कोंबड्यासह मिळेल त्या प्राण्यांवर ताव मारतांना बिबट्या दिसून येत आहे. त्यातूनच तो मानवावर हल्ले देखील करतांना दिसून येत आहे. त्यामुळे वन्यक्षेत्र वाढवण्यासाठी पुरेसे प्रयत्न करावे लागणार आहे. निसर्गाचे चक्र मानवाने समजून घेण्याचे गरज आहे. जर मोठ्या प्रमाणात वृक्ष आच्छादन असेल, तर तिथे अनेक वन्यप्राण्यांचे वास्तव राहू शकते. शिवाय बिबट्या देखील जंगलाच्या बाहेर पडणार नाही, कारण त्याच्या गरजा तिथे भागतात. त्यासोबतच वनांचे क्षेत्र वाढल्यास तापमानवाढ कमी होईल, पृथ्वीवर पुरेसा पाऊस पडेल, निसर्गाचे अवकाळी चक्र थांबेल. त्यामुळे सर्वप्रथम वृक्षलागवड मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवाव्या लागणार आहेत. नुसत्या वृक्षलागवड मोहीमच नव्हे तर त्या वृक्षांचे संवर्धन देखील करण्याची गरज आहे. तरच पृथ्वीचे तापमान कमी होईल. आजमितीस घनदाट अरण्य कुठेही आढळतांना दिसून येत नाही. महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि गडचिरोलीचा काही पट्टा सोडला तर, अनेक जिल्ह्यात घनदाट असे जंगलच नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांचा वावर कमी झाला. मुळातच वन्यप्राणी काळाच्या ओेघात नष्ट होतांना दिसून येत आहे. गिधाडांची संख्या कमी झाल्यामुळे गिधाड संवर्धन प्रकल्प आपल्याला राबवावा लागतो, यासारखी नामुष्की नाही. त्यामुळे निसर्गाचे संतुलन कायम राहण्यासाठी वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणावर करावी लागणार आहे, तरच मानवी वस्त्या सुरक्षित राहू शकतील अन्यथा, आगामी काही वर्षांत बिबट्यांचे हल्ले वाढल्यास नवल वाटायला नको. मात्र तरीही या हल्ल्यांकडे सरकार गांभीर्याने बघत नाही. मृत्यू झाल्यास 25 लाखाची मदत आणि जखमी झाल्यास 50 हजाराची मदत जाहीर करून सरकारचे कर्तव्य संपते, असेच दिसून येते. मात्र यापलीकडे जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे, तरच बिबट्याचा संघर्ष थांबेल.

COMMENTS