गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार चांगलाच कोसळतांना दिसून येत आहे. गेल्या 28 वर्षांतील सर्वात मोठी घसरण भारतात देखील दिसून येत आहे. त्याचे मुख्य

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार चांगलाच कोसळतांना दिसून येत आहे. गेल्या 28 वर्षांतील सर्वात मोठी घसरण भारतात देखील दिसून येत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे परकीय गुंतवणूकदार आपली गुंतवणूक शेअर बाजारातून काढून घेतांना दिसून येत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे सुत्रे डोनाल्ड ट्रम्प यांनी हाती घेताच गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतला आहे. त्यातच ट्रम्प यांनी चीन, मेक्सिको, कॅनडा आणि भारतावर आयातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. खरंतर ट्रम्प यांनी व्यापारयुद्ध छेडले आहे, मात्र व्यापारयुद्धाची नांदी ही जागतिक मंदीत परावर्तित होतांना दिसून येत आहे, असे झाल्यास त्याचा सर्वात मोठा फटका अमेरिकेला सुद्धा बसू शकतो. मंगळवारीच अमेरिकेच्या शेअर बाजारात आत्तापर्यंतची सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली. वास्तविक पाहता अमेरिकेने काही देशांसोबत व्यापारयुद्ध छेडले आहे. वास्तविक पाहता अमेरिका हा विकसित देश आहे. त्यामुळे इथल्या प्रत्येकाची क्रयशक्ती जास्त आहे. अशावेळी इतर देशांनी अमेरिकेवर आयातशुल्क लादले तरी त्याचा फरक अमेरिकेवर पडत नाही. कारण अमेरिका हा देश इतर देशांतील संसाधनाकडून सेवा घेत असतो. त्यामुळे अमेरिकेला असा अतिरिक्त भूर्दंड सहन करावा लागत नव्हता. मात्र क्षुल्लक बाबीपायी ट्रम्प यांनी अमेरिकेसह इतर देश आर्थिक मंदीच्या खाईत लोटण्यास सुरूवात केले आहे. खरंतर अमेरिका इतर देशातून आयात होणार्या वस्तूंवर कमी आयात कर लावायचे, परंतू अनेक देश मात्र अमेरिकेतून आयात करणार्या वस्तूंवर जास्त कर लावतात, याच बाबींकडे ट्रम्प यांनी अतिरिक्त लक्ष दिल्याचे दिसून आले. त्यामुळे ट्रम्प यांनी देखील परस्पर अमेरिका देखील परस्पर कर (रेसिप्रोकल टॅरिफ) लावेल, असे जाहीर करून व्यापारयुद्ध छेडले आहे.
अमेरिकेने रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर चीनने देखील अमेरिकेच्या उत्पादनावर रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जगात आयात-निर्यात होणार्या वस्तूंचे दर गगनाला भिडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या वस्तू खरेदी करण्यावर मोठा परिणाम होवू शकतो, कारण खरेदीदार अशा वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतात, परिणामी वस्तूंची विक्री कमी होते, आणि जागतिक मंदी निर्माण होते. पुन्हा अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आयातशुल्कांच्या घोषणा मागे घ्याव्या लागतात आणि अर्थव्यवस्थेला चालना द्यावी लागते. मात्र ट्रम्प यांच्या आतातायी स्वभावामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था संकटात सापडतांना दिसून येत आहे. भारतीय बाजारावर जरी आजमितीस काही परिणाम दिसून येत नसला तरी, त्याचे अप्रत्यक्ष परिणाम पुढील काही महिन्यात दिसून येवू शकतात. अशावेळी भारताने देखील सावधगिरीची भूमिका घेणे गरजेचे आहे. खरंत अमेरिका भारतावर आयातशुल्क लागू करणार आहे, 2 एप्रिलपासून अमेरिका भारतावर जेवढ्यास तेवढा कर आकारणार आहे. टॅरिफ हा दुसर्या देशातून येणार्या मालावर लादलेला कर असतो. भारतातील कृषी आणि अन्नधान्य निर्यातीवर टॅक्सचा सर्वाधिक परिणाम होईल. टेस्लाचा सायबर ट्रक अमेरिकेत जवळपास 90 लाख रुपयांना विकला जात असेल आणि टॅरिफ 100 टक्के असेल तर भारतात या ट्रकची किंमत जवळपास 2 कोटी असेल. म्हणजेच त्या वस्तूची किंमत ही दुप्पट होणार आहे, अशावेळी ती वस्तू भारतात खरेदी होईल याची शक्यता नाहीच. त्यामुळे याचा मोठा परिणाम खरेदी विक्रीवर होणार आहे. त्यामुळे जगभरात आर्थिक मंदीचे सावट तीव्र होतांना दिसून येत आहे. हा परिणाम देशातील सर्वाधिक लोकसंख्या असणार्या भारत, चीन, ब्राझील, कॅनडा, मेक्सिको, अमेरिकासह संपूर्ण जगभरात होणार आहेत. त्यामुळे यातून आर्थिक मंदींचे सावट तीव्र होईल यात शंका नाही, यातून जगभरातील अर्थव्यवस्था कशा सावरतात, त्यासाठी ट्रम्प माघार घेतात की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
COMMENTS