निकृष्ट व अर्धवट कामाची चौकशी करण्याची मागणीतामसा । प्रतिनिधी हदगाव तालुक्यातील आदिवासीबहुल गावे असलेल्या शेंदण ते डाक्याचीवाडी रस्त्याचे पुलमोर

निकृष्ट व अर्धवट कामाची चौकशी करण्याची मागणी
तामसा । प्रतिनिधी
हदगाव तालुक्यातील आदिवासीबहुल गावे असलेल्या शेंदण ते डाक्याचीवाडी रस्त्याचे पुलमोर्यासह सिमेंट काँक्रीटचे काम अत्यंत निकृष्ट व अर्धवट ठेवल्याच्या तक्रारी वाढल्या असून संबंधित विभागाने त्या कामाचा दर्जाची गुण नियंत्रण विभागाकडून तपासणी करून त्या अर्धवट व दर्जाहीन कामाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे.
आदिवासीबहुल गावांना पक्क्या रस्त्यांनी जोडण्याच्या दृष्टीने शासनाच्या आदिवासी विकास उप – योजनेअंतर्गत पुलमोर्यासह सिमेंट काँक्रीटचा मजबूत रस्ता बनविण्यासाठी शासनाने मोठा निधी मंजूर केला होता. सन 2024 मध्ये त्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन तत्कालीन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आले होते. मजबूत रस्ता मिळणार असल्याने डोंगर, दर्याखोर्यातील अतिदुर्गम भागात राहणार्या नागरिकांना दळणवळणाची सोय होत असल्याचा मोठा आनंद झाला होता. मात्र संबंधित ठेकेदारांने रस्त्याचे काम वेळेत आणि दर्जेदार न करता शासनाच्या निधीचा नुसता धुरळा उडवल्याचे चित्र आहे. बरेच दिवस काम ठप्प ठेऊन चार ते पाच महिन्यापूर्वी त्या रस्त्याचे काम उरकून घेतल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शेंदण ते डाक्याचीवाडी दोन ते साडेचार किलोमीटर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बंदिस्त नाल्याचे काम अर्धवट ठेवल्याचे दिसते. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी सिमेंट काँक्रिटीकरण करताना एक बाजू दर्जेदार तर दुसरी बाजू मात्र निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून दर्जाहीन केल्याचे निदर्शनात येते. विशेष म्हणजे केलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर संबंधित कामाची माहिती देणारा फलक लावण्यात आला मात्र त्यावर निधी किती? याचा उल्लेख नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. नव्याने केलेल्या रस्त्यावर तीन ते चार महिन्यातच अक्षरशः धुरळा उडाल्याचे चित्र पाहायला मिळते. रस्त्याच्या एका बाजूच्या नालीचे खोदकाम करून काँक्रिटीकरण केले नसल्याने बाजूच्या शेतकर्यांच्या शेतात पावसाचे पाणी जाऊन शेताची व पिकाचे प्रचंड नुकसान होत असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. काँक्रीटचा रस्ता आणि बंदिस्त नालीच्या मधोमध भर भरला नसल्याने साधारणतः दोन ते अडीच फूट खोलीच्या फटीत एखादे वाहन किंवा जनावरे माणसे पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी या गंभीर प्रकाराकडे संबंधित विभागाने कमालीचे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट आहे. सदर रस्त्याच्या कामाची तात्काळ चौकशी करून दोषीवर कारवाई करावी व त्या कामाची गुणनियंत्रण विभागाकडून तपासणी करावी अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.

COMMENTS