मुंबई/प्रतिनिधी ः शेतकर्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई असा पायी लाँग मार्च काढला असून, शेतकर्यांचा लाँग मार्च इगतपुरीहून पुढे र
मुंबई/प्रतिनिधी ः शेतकर्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई असा पायी लाँग मार्च काढला असून, शेतकर्यांचा लाँग मार्च इगतपुरीहून पुढे रवाना झाला आहे. लाल वादळाच्या लॉन्ग मार्चचा मंगळवारी तिसरा दिवस होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे नाशिक ते मुंबई असा शेतकर्यांचा पायी लाँग मार्च काढला आहे.
या लाँग मार्च मध्ये शेतकर्यांच्या समस्यांसोबत इतरही मागण्या करण्यात आलेल्या आहेत. या लाँग मार्चचे नेतृत्व शेतकरी नेते अजित नवले हे करत असून आज किंवा उद्या हा मोर्चा मुंबईत पोहचणार आहे. शेतकर्यांच्या शिष्टमंडळासोबत राज्य सरकारची होणारी बैठकही पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शेतकर्यांच्या प्रश्नांशी संबंधित खात्याचे मंत्री आणि सचिव यांच्यासोबत शेतकरी शिष्टमंडळाची बैठक होणार होती. मात्र, राज्य सरकारच्या कर्मचार्यांनी संप पुकारल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी नेते संतप्त झाले आहेत.
दरम्यान शेतकर्यांनी कांद्याला 600 रूपये प्रतिक्विंटल अनुदान द्या, किमान 2000 रूपये दराने कांद्याची नाफेड मार्फत खरेदी करा, गायरान, बेनामी, देवस्थान, इनाम, वक्फ बोर्ड, वरकस व आकारीपड जमिनी कसणार्यांच्या नावे करा, शेतीसाठी दिवसा सलग 12 तास वीज उपलब्ध करून शेतकर्यांची थकीत वीजबिले माफ करावीत, शेतीविषयक संपूर्ण कर्ज माफ करून शेतकर्यांचा सात-बारा कोरा करावा, अवकाळी पावसाने व वर्षभर सुरू असलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीची ‘एनडीआरएफ’मधून तत्काळ भरपाई द्यावी, पीकविमा कंपन्यांच्या लुटमारीला लगाम लावून पीक विमाधारकांना नुकसानभरपाई देण्यास कंपन्यांना भाग पाडावे, बाळ हिरडाला किलोला किमान 250 रुपये हमीभाव देऊन हिरड्याची सरकारी खरेदी योजना सुरू ठेवावी, गायीच्या दुधाला 47 आणि म्हशीच्या दुधाला 67 रुपये लिटर भाव मिळावा. मिल्कोमीटर निरीक्षकांची नियुक्ती करावी आदी मागण्या शेतकर्यांनी केल्या आहेत.
COMMENTS