महाराष्ट्रातील तरुणांच्या जीवनाला उध्वस्त करणारे ड्रग्स माफिया प्रकरणातील मुख्य सूत्रधार ललित पाटील याला पकडल्यानंतर, यातील नेमके प्रकरण बाहेर ये
महाराष्ट्रातील तरुणांच्या जीवनाला उध्वस्त करणारे ड्रग्स माफिया प्रकरणातील मुख्य सूत्रधार ललित पाटील याला पकडल्यानंतर, यातील नेमके प्रकरण बाहेर येईल, अशी अपेक्षा करणे म्हणजे वस्तुस्थितीकडे डोळे झाक करणे आहे! वस्तुतः सन २०१२ पासूनच महाराष्ट्रात ड्रग्स माफीया यांचा शिरकाव असल्याचे यापूर्वी अनेक प्रकरणांत दिसून आले आहे. महाराष्ट्रातील ड्रग्स प्रकरण हे देशातील इतर कोणत्याही शहरापेक्षा अधिक आहे, असे २०२१ मध्ये राज्यसभेत केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी ड्रग्स संदर्भात माहिती देताना समोर आले. देशभरात २०१९ ते २०२१ दरम्यान ज्या केसेस नोंदवल्या गेल्या, त्यामध्ये उत्तर प्रदेश सर्वात वरच्या क्रमांकावर असल्याची माहिती त्यांनी दिली आणि दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र तर, ड्रग्स प्रकरणात एकूणच देशात आणि जगभरात बदनाम झालेले पंजाब हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. एनडीपीएस म्हणजे नार्कोटिक ड्रग्स सायकोट्राफिक सबस्टन्स ऍक्ट १९८५ या कायद्यानुसार सन २०१९ ते २०२१ या सलग तीन वर्षात हे तिन्ही राज्य अग्रक्रमावर राहिले. त्यात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर, महाराष्ट्र दुसरा तर पंजाब तिसरा. एनडीपीएस या कायद्याप्रमाणे उत्तर प्रदेश मध्ये यादरम्यान ड्रग्स घेणाऱ्यांच्या विरोधातील एफआयआर झाले त्यांची संख्या ३१ हजार ४८२ एवढी होती; तर, हीच संख्या तेवढ्याच काळात महाराष्ट्रासाठी २८ हजार ९५६ एवढी होती; तर, पंजाब मध्ये ११ हजार ५४८ एवढी ही एफ आय आर नोंदविलेली संख्या होती, अशी माहिती काही काळापूर्वी राज्यसभेत केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी दिली होती. एकूणच महाराष्ट्राचा ड्रग्स च्या संदर्भातील माफिया आणि व्यसनाधीनता म्हणतात यांचा नेमका संख्यावार भाग जर पाहिला, तर महाराष्ट्रात मुंबईसह एकूणच काही शहरांमध्ये पालकांसाठी हा अतिशय चिंतेचा विषय आहे. कारण याच प्रकरणामुळे अगदी कोवळी असणारी महाविद्यालयीन मुले, व्यसना अधीन होतात. आयुष्य एक प्रकारे उध्वस्त करून घेतात. याची चिंता महाविद्यालयात शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांना आजही आहे. अशा पालकांच्या चिंतेत सारखी वाढ करणाऱ्या ललित पाटील या ड्रग्स माफिया चे आई-वडील मात्र, त्याला पकडल्यानंतर त्याला सहानुभूती देण्यासाठी पुढे येतात; तेव्हा, असंख्य पाल्यांचे भावी आयुष्य उध्वस्त होत असताना ललित पाटील च्या पैशावर मिळालेली भौतिक सुखे उपभोगणारे हे पालक, त्याच वेळी त्याच्या विरोधात समोर येऊन राज्यातील हजारो युवकांचे आयुष्य बरबाद करण्यापासून वाचविण्यासाठी का पुढे आले नाहीत? हा खरा आजचा चिंतेचा प्रश्न आहे. ललित पाटील ज्या पद्धतीने फरार झाला आणि पुन्हा त्याला अटक झाली तर ही बाब निश्चितपणे यामध्ये काही ना काही धागेदोरे असतील, असं खुद्द ललित पाटील याच्या म्हणण्यावरून आपण अंदाज करू शकतो. परंतु, एकंदरीत हे प्रकरण म्हणजे केवळ वरवरचे नाही. तर हा हिम नगाचा एक खडा दिसतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम यंत्रणेने या सर्व गुन्हेगारांना हुडकून काढून महाराष्ट्राचे भवितव्य सुस्थिर आणि अधिक बौद्धिक करावे, ही आजच्या पालकांची खरे तर अपेक्षा आहे. अप्रत्यक्ष शासन आणि प्रशासनाला विनंती देखील आहे. अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालयांच्या आजूबाजूला अशा प्रकारचे रॅकेट किंवा धंदे चालत असतात. नुकतंच, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर या संदर्भातली एक गंभीर कल्पना निश्चितपणे महाराष्ट्राला आली असावी, अशी अपेक्षा करणे गैर नाही! परंतु, ज्या पद्धतीने नाशिक मध्ये हा ड्रग्स कारखाना आणि त्याचा व्यवसाय उभारण्यात आला होता, त्यामध्ये सामील असणारे आश्रयदाते हे जनतेच्या समोर उघड झाले पाहिजेत. कारण, समाजातील भविष्य म्हणजेच राष्ट्राचे – देशाचे भविष्य उध्वस्त करणारी ही यंत्रणा नेमकी कोण आहे? कोणाच्या आश्रयाने चालते? कुठून चालते? आणि कशी चालते? हे सर्व आता महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आणायला हवे. पंजाब सारख्या राज्यातील तरूण काही काळापूर्वी ज्या पद्धतीने उध्वस्त करण्याचे रॅकेट वापरले गेले, तिथल्या तरुणांना जे मोठ्या प्रमाणात उध्वस्त केले गेले होते, त्याच्या तीनपटीचे रॅकेट हे महाराष्ट्रात आहे. त्यामुळे तरुणांच्या पिढीला उध्वस्त करण्याचा हेतू असलेले, हे ड्रग्स माफिया – मग ते कोणीही असो – त्यांना आता समाजासमोर केवळ उघडे नव्हे तर नागडे करण्याची वेळ झाली आहे. सध्याचा काळ सर्व समाजसाठी अत्यंत ताण-तणावाचा काळ आहे. रोजगाराला तरुण मुकलेला आहे. मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. त्यातून निराशा येणारा तरुण वर्ग आणि त्याचबरोबर महाविद्यालयात शिकणारा आणि अनुकरण करणारा तरुण वर्ग, हे अशा ड्रग्स माफियांच्या साखळीमध्ये अडकतात. त्यांच्याविरुद्ध कुणी आवाज उठवला तर त्यांचे काय हसे केले जाते, हे हेरंब कुलकर्णी प्रकरणावरून महाराष्ट्राच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आज महाराष्ट्राच्या प्रत्येक पालकाने आणि त्याचबरोबर काही वर्षांमध्ये जे महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करतील, अशा पाल्यांच्या पालकांनी देखील आता पुढे येऊन, या प्रकरणाची सोक्षमोक्ष सरकारने लावावी याचा आग्रह धरावा! अन्यथा, अनेक पिढ्या अशा ड्रग्स प्रकरणातून बरबाद करण्यासाठी टपलेले आहेत!
COMMENTS