सातारा ः सातारा येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शनिवारी एका अनपेक्षित घटनेमुळे वादाची किनार लाभली. संमेलनाचे कार्याध्यक्ष व

सातारा ः सातारा येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शनिवारी एका अनपेक्षित घटनेमुळे वादाची किनार लाभली. संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला एका व्यक्तीने काळे फासल्याने साहित्यविश्वात खळबळ उडाली असून, संमेलनाच्या प्रतिष्ठेलाच गालबोट लागल्याची भावना व्यक्त होत आहे.
शुक्रवारी सकाळी साहित्यिक डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या संमेलनाचे उद्घाटन झाले होते. दुसर्या दिवशी विविध सत्रे आणि कार्यक्रम सुरू असतानाच, व्यासपीठाकडे जाणार्या पायर्यांजवळ ही धक्कादायक घटना घडली. संदीप जाधव असे आंदोलकाचे नाव असून तो रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा प्राथमिक दावा केला जात आहे. अचानक झालेल्या या कृत्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्वतः विनोद कुलकर्णी यांनाही क्षणभर नेमके काय घडले हे कळले नाही. आयोजकांनी तातडीने हस्तक्षेप करत त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले. घटनेनंतर शाहूपुरी पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये गळ्यात निळा रुमाल घातलेला आंदोलक घोषणाबाजी करत काळे फासत असल्याचे तसेच त्यानंतर राष्ट्रगीत म्हणत असल्याचे दिसते. या प्रकारामुळे संमेलनात सहभागी साहित्यिक, अभ्यासक आणि रसिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वापरण्यात आलेल्या द्रव्यामुळे विनोद कुलकर्णी यांना श्वास घेण्यास त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. मात्र, वैचारिक संवादाचे व्यासपीठ असलेल्या साहित्य संमेलनात अशा स्वरूपाचा निषेध योग्य आहे का, यावर तीव्र चर्चा सुरू झाली आहे. साहित्य हे विचार मांडण्याचे, संवाद साधण्याचे माध्यम असताना अशा प्रकारच्या कृतीमुळे लोकशाही मूल्यांना तडा जात असल्याची भावना अनेक साहित्यिकांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे संमेलनाच्या उर्वरित कार्यक्रमांवर सावली पडली असली, तरी संयम आणि संवादाचाच मार्ग स्वीकारावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

COMMENTS