सत्ता स्थापनेचे चित्र आज होणार स्पष्ट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्ता स्थापनेचे चित्र आज होणार स्पष्ट

शिंदे गटाचे आमदार सरकारचा पाठिंबा काढणारे पत्र राज्यपालांना देणार ;

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात सुरु असलेले सत्तास्थापनेचे नाटय आज संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. मंगळवारी महाविकास आघाडी सरकारने कॅबिनेटची बैठक घेण्यात आ

सत्ताधार्‍यांना शेतकर्‍यांच्या प्रश्नांशी कांही देणे घेणे नाही-अमरसिंह पंडित
ब्रिजभूषण सिंह यांचा पाय खोलात
स्वातंत्र्यदिनी मुळा धरण तिरंगा छटांनी भिजले

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात सुरु असलेले सत्तास्थापनेचे नाटय आज संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. मंगळवारी महाविकास आघाडी सरकारने कॅबिनेटची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व मंत्र्यांनी पुढे काय करायचे, याचे अधिकार मुख्यमत्री उद्धव ठाकरेंना दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि सोनिया गांधी या तिघांत चर्चा झाली असून, मुख्यमंत्री राजीनामा देण्याची किंवा विधानसभा बरखास्तीचा निर्णय घेऊ शकतात. किंवा विरोधकांच्या विश्‍वासदर्शक ठरावाला सामौरे जावू शकतात.
शिंदे गट आणि फडणवीस गटात मंत्रिपदाची बोलणी झाली असून, त्याला शेवटची परवानगी मिळवण्यासाठी फडणवीस दिल्लीला पोहचल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे देखील अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे समजते. त्यामुळे शिंदे गट राज्यपालांना पत्र देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पाठिंबा काढणार असून, राज्यपाल लवकरच ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाने भाजपसह सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा केली आहे. यानुसार जर शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली. तर शिंदे गटातील 8 जण कॅबिनेट मंत्री आणि 5 जण राज्यमंत्री बनण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, उपमुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव समोर ठेवण्यात आले आहे. तर गुलाबराव पाटील, शंभुराजे देसाई, संजय शिरसाट, दीपक केसरकर, संजय शिरसाट, उदय सामंत यांना ही मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाने ठाकरे सरकारचा पाठिंबा काढलेला आहे. यामुळे हे सरकार अल्पमतात आले आहे. त्यांनी बहुमत चाचणी घ्यावी, आम्ही लगेच गुवाहाटीतून महाराष्ट्रात यायला तयार आहोत. दुसरीकडे, मुख्यमंत्री ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची चर्चा होती. मात्र, शिवसेना जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी स्पष्ट केले की, अशा बातम्या या निव्वळ भूलथापा आहेत. उद्धव ठाकरे जे बोलायचे ते खुलेआम बोलतात, कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी प्रतोद आणि गटनेत्यांची नियुक्ती केली आहे. मग, कोणत्या गटाच्या प्रतोदांना पक्षादेश जारी करण्याचा अधिकार आहे. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या गटाला अद्याप स्वतंत्र गट स्थापन करण्याची मान्यताच मिळाली नाही. विधानसभेचे उपाध्यक्ष किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ते अद्याप गेलेच नाहीत. त्यामुळे त्यांनी पक्षादेश काढला तर तो बेकायदा ठरेल. त्याउलट नवे गटनेते अजय चौधरी यांना विधानसभा उपाध्यक्षांनी मान्यता दिली असल्याने त्यांचा व्हीप वैध ठरेल.विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात उद्धव ठाकरे यांना अपयश आले अन् राज्यात सत्तांतर झाले तर नवीन विधानसभा अध्यक्ष निवडला जाईल. हा अध्यक्ष शिंदेसेनेला अनुकूलच असेल. त्यामुळे तो या 16 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याची शक्यता कमीच असेल. दुसरा पर्याय म्हणजे, बहुमत चाचणीच्या निकालानंतर सत्तेवरून पायउतार झालेला ठाकरेंचा गट अपात्र आमदारांच्या मतावर आक्षेप घेऊन कोर्टात जाऊ शकतो, तर 16 आमदारही अपात्रतेच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देऊ शकतात. मात्र, बहुमत चाचणीत त्यांनी केलेल्या मतदानाच्या निकालावर काही परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे.

सर्वोच्च न्यायालयात जरी सत्ताधारी आणि बंडखोरांकडून याचिका दाखल करण्यात आल्या असल्या तरी कोर्ट फक्त आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय देईल. बहुमत चाचणीचे आदेश विधानसभा अध्यक्ष किंवा राज्यपाल देऊ शकतात. सध्याच्या परिस्थितीत विश्‍वास किंवा अविश्‍वास प्रस्ताव दाखल झाला तर मतदान घेण्यात काहीही अडचणी नाहीत. सरकारच्या बहुमताचा निर्णय फक्त फ्लोअर टेस्टद्वारेच होऊ शकतो. अल्पमतातील सरकार लोकशाहीसाठी घातक आहे, म्हणून राज्यपाल त्वरित बहुमत चाचणीचे आदेश देऊ शकतात.
डॉ. अनंत कळसे माजी विधीमंडळ सचिव

बंडखोर आमदार आज मुंबईत येणार
राज्यात सत्तास्थापनेला वेग आला असून, शिंदे गटाचे 10 बंडखोर आमदार आज मुंबईत येऊन राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यपालांना पत्र देऊन शिंदे गट ठाकरे सरकारचा पाठिंबा काढतील. तसेच 48 तासांत बहुमत चाचणीला सामौरे जाण्याची मागणी करतील. त्यामुळे ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला लागले असून, पुढील काही तासांत सरकारचे भवितव्य स्पष्ट होणार आहे. तर दुसरीकडे बंडखोर आमदार बहुमत चाचणीला अनुपस्थित राहिले, तरी संख्याबळाच्या आधारे भाजप महाविकास आघाडीचा बहुमत चाचणीच्या आधारे पराभव करू शकते. जर असे झाल्यास भाजप शिंदे गटाच्या जोरावर सत्ता स्थापनेचा दावा करू शकते.

COMMENTS