“ईडी”चा फास

Homeताज्या बातम्यासंपादकीय

“ईडी”चा फास

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा विरोधकांकडून सातत्याने आरोप होत असला तरी, इंदिरा गांधींच्या काळात देखील सीबीआयचा गैरवापर होत असल्याचा आ

लोकशाहीत सोशल माध्यमांची भूमिका
अजित पवारांची दुहेरी कोंडी
आता फुले- आंबेडकर येणार नाहीत

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा विरोधकांकडून सातत्याने आरोप होत असला तरी, इंदिरा गांधींच्या काळात देखील सीबीआयचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. सीबीआय पिंजर्‍यातील पोपट असल्याची संभावना त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केली होती. त्यानंतर केंद्र सरकार सीबीआयच्या स्वायत्ततेवर गंभीर बनत सर्वोच्च न्यायालयात सीबीआयच्या स्वायत्ततेबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यानंतर देशभरात सीबीआयचे छापे आणि त्यांचा बोलबाला कमी झाला. मात्र अलीकडच्या काही वर्षांत अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीचा बोलबाला वाढला आहे. अनेक राज्यांत छापे टाकत ईडीने अनेक राजकारण्यांना रडकुंडीस आणले आहे. तर अनेक नेते तुरुंगांची हवा खात आहे. त्यामुळे ईडीने अनेक राजकारण्याभोवती ईडीचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. मात्र ज्याने काही केलेच नाही, त्याला घाबरण्याचे काही कारण नाही. मात्र काल उशीरा रात्री शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक केल्यानंतर विरोधक ईडीविरोधात आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. मात्र ईडी पुराव्याअभावी कुणालाही ताब्यात घेण्यात येणार नाही. शिवाय संजय राऊत राज्यसभेचे विद्यमान खासदार असून, शिवसेनेचे नेते आहे. अशावेळी त्यांची अटक ही चुकीची आहे, असे म्हणता येणार नाही. संजय राऊत यांची ती कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाली. यात संजय राऊत एका महिलेला असभ्य भाषेत शिवीगाळ करतांना दिसत आहे. या ऑडिओ क्लीपची सत्यता काय, याची अजून तपासणी झालेली नसली, तरी याप्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर रविवारी सकाळीच संजय राऊत यांच्या घरी ईडीचे छापे पडले. तब्बल 9 तासांच्या चौकशीनंतर राऊत यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले. तिथे त्यांची बराच वेळ चौकशी केल्यानंतर रात्री तब्बल पाऊण वाजता त्यांना अटक केल्याची माहिती ईडी कार्यालयाने दिली आहे. काल ज्या पद्धतीने ईडीने छापेमारी केली, त्याचवेळी संजय राऊत यांना अटक होणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. आणि ती खरी ठरली. ईडीने जेव्हा प्रवीण राऊत यांना अटक केली, तेव्हाच संजय राऊत यांना अटक होईल अशी शक्यता गृहीत धरण्यात आली होती. मात्र ईडीने योग्य वेळ येताच राऊत यांना अटक करत अचूक वेळ साधली. राज्यात झालेले सत्तांतर आणि त्यानंतर शिवसेनेला लागलेली गळती, शिवसेनेचे 12 खासदार देखील शिंदे गटाच्या गळाला लागल्यानंतर शिवसेना सैरभैर झाली आहे. अशा परिस्थितीत न्यायालयाकडून दिलासा मिळले ही शिवसेनेला शेवटची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणूका येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत इतरत्र पराभव झाला तर चालेल, मात्र मुंबई महानगरपालिका ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असेल. मात्र शिवसेनेचे संजय राऊत ईडीच्या कोठडीत असल्यामुळे शिवसेनेला नेत्यांची कमकरता भासणार आहे. अशावेळी शिवसेनेला पुन्हा एकदा नवसंजीवणी देण्यात उद्धव ठाकरे यशस्वी ठरण्याची शक्यता तशी कमीच आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर शिवसेनेमध्ये आक्रमकपणे शिवसेनेची बाजू मांडणारे आता कुणी राहिलेले नाही. भाजप नेते किरीट सोमय्या तर खुलेआम आता पुढील नंबर अनिल परब यांच्या असल्याचे सांगत आहेत. जशी काही ईडी आपल्याच इशार्‍यावर काम करते, अशा अविभार्वात सोमय्या बोलत आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढून शिवसेनेला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न सुरु केला असतांनाच, शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण खात्यातील हजारो कोटीं रुपयांच्या कामांना स्थगिती दिली आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारने पर्यावरण विभागाच्या अनेक निर्णयांची झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही दिवसांनी आदित्य ठाकरे देखील या चौकशीच्या ससेमिर्‍यात अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना पुन्हा आक्रमकपणे वर येते की, या चौकशीच्या फेर्‍यात गुदमरून जाते, हे आगामी काळच ठरवेल.

COMMENTS