अहमदनगर/प्रतिनिधी - दोन-तीन महिने होऊनही अल्पवयीन मुलीस पळवणार्या आरोपीचा व बेपत्ता मुलीचा शोध न लावल्याने नगर तालुका पोलिस यंत्रणेचा निषेध करीत
अहमदनगर/प्रतिनिधी – दोन-तीन महिने होऊनही अल्पवयीन मुलीस पळवणार्या आरोपीचा व बेपत्ता मुलीचा शोध न लावल्याने नगर तालुका पोलिस यंत्रणेचा निषेध करीत मुलीच्या आईने पोलिस अधीक्षक कार्यालयात अंगावर ज्वलनशील द्रव पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. तेथे उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचार्यांनी तिला तत्काळ अडवत तिच्या हातातील ज्वलनशील द्रवाचा प्लॅस्टिकचा डबा काढून घेऊन तिला ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
नगर तालुक्यातील एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी मागील 2-3 महिन्यापूर्वी बेपत्ता झाली आहे. त्याबाबतची तक्रार मुलीच्या वडिलांनी नगर तालुका पोलिस स्टेशनमध्ये केलेली आहे. मागील महिन्यात मुलीच्या पालकांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित काही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. तसेच घटनेत वापरलेली गाडीही ताब्यात घेतली. पण नंतर पुढे तपास थांबवला व आरोपींसह मुलीलाही शोधले नाही. त्यामुळे नगर तालुक्याची पोलिस यंत्रणा जाणीवपूर्वक दिरंगाई करीत आहे का व तपास करणारे पोलिस अधिकारी आरोपींना मदत करीत आहेत का ? असा सवाल जनआधार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी केला होता. मागील महिन्यातच त्यांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर, अद्यापही बेपत्ता मुलीचा शोध न लागल्याने नगर तालुका पोलिसांचा निषेध करीत मुलीच्या आईने पोलिस अधीक्षक कार्यालयात अंगावर ज्वलनशील द्रव पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.
पोलिसांची उडाली धावपळ – पोलिस अधीक्षक कार्यालयात क्राईम बैठक सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने अधिकार्यांची चांगलीच धावपळ उडाली. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी या महिलेला ताब्यात घेतले. नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनीही बैठक अर्ध्यातच सोडली व तेही पोलिस ठाण्याकडे रवाना झाले. दरम्यान, मागील दोन वर्षात पोलिस अधीक्षक कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न झाल्याची ही चौथी घटना आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पदभार स्वीकारल्यानंतर चार दिवसांतच एका युवकाने नाजूक प्रकरणातून विषारी औषध सेवन करत ओला यांच्या दालनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.
COMMENTS