गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये बेताल वक्तव्याने उंच टोक गाठले आहे. बेताल वक्तव्ये करून तशी वातावरणनिर्मिती केली जात आहे, यातून दोन समाज

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये बेताल वक्तव्याने उंच टोक गाठले आहे. बेताल वक्तव्ये करून तशी वातावरणनिर्मिती केली जात आहे, यातून दोन समाजामध्ये वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काही जणांकडून करण्यात येत आहे. राहुल सोलापूरकर असेल किंवा कमाल खान असेल किंवा रणवीर अलाहाबादिया असेल, त्यांचे वक्तव्य आणि त्यानंतर उमटलेली संतापाची लाट यावरून काही जणांकडून बेताल वक्तव्य करून सामाजिक अशांतता पसरवणयचा मुद्दाम प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. अलाहाबादिया याने इंडियाज गॉट लेटंट या यूट्यूब चॅनेलच्या कार्यक्रमात असभ्य टिप्पणी केल्यानंतर नवे वादंग निर्माण झाले आहे. त्याने या कार्यक्रमात केलेले शेरेबाजी त्याच्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडवित आहे. खरंतर याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्याचे वाभाडे काढले आहे. महाराष्ट्रासह आसाममध्ये त्याच्याविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहे. त्याच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले असले तरी न्यायालयाने त्याला चांगलेच खडसावले आहे. मुळातच काही दिवसांपूर्वी अभिनेता राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर राज्यभर संताप व्यक्त होत असतांनाच त्यांनी माफी मागून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. खरंतर हा प्रकार इथे संपला असे वाटत असतांनाच राहुल सोलापूरकर यांचे पुन्हा डॉ. बाबासाहेेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे विधान समोर आले. खरंतर राहुल सोलापूरकरची विचारसरणी कोणती, त्याची वैचारिक भूमिका कोणती हा भाग अलाहिदा, मात्र त्याला इतिहासाचे भान आहे. त्यामुळे त्याचे वक्तव्य नजरेआड करता येणार नाही. अनेक मराठी चित्रपटात, मालिकांमध्ये राहुल सोलापूर या अभिनेत्याने छत्रपती शाहू महाराजांची भूमिका निभावली आहे. नुसतीच निभावली नाही तर, त्याने कसदार अभिनय करून या भूमिकेला न्याय दिला आहे. खरंतर छत्रपती शाहू महाराजांची भूमिका निभावतांना छत्रपती शाहू महाराजांसंबंधित वेदोक्त प्रकरण असेल, किंवा इतर बाबी या संपूर्ण बाबींचा अभ्यास अभिनेत्याला करावा लागतो आणि त्या भूमिकेला समरस असा अभिनय करावा लागतो. त्यामुळे साहजिकच राहुल सोेलापूरकर याला इतिहासाचे ज्ञान असेल असे ग्रहित धरले तर, त्याने केलेले वक्तव्य कोणत्या विचारसरणीच्या छावणीतून आले, याचा शोध घेणे क्रमप्राप्त ठरते. यासोबतच नुकताच छावा चित्रपट प्रसिद्ध झाल्यानंतर अभिनेता कमाल खान याने विकीपीडियावरील काही आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करून आपल्या अकलेचे तारे तोडले. खरंतर विकीपीडियावर जी माहिती प्रकाशित केली जाते, ती स्वतःविकीपीडिया करत नाही, तर काही लेखक त्यासंदर्भातील माहिती प्रकाशित करत असते. मात्र ती माहिती सत्य आहे की नाही, त्याची शहानिशा विकीपीडियाने करूनच प्रकाशित करण्याची खरी गरज आहे. मात्र असे होत नाही. खरंतर महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल देखील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भोवती फिरतो. महाराष्ट्राची अस्मिता या महामानवाभोवती एकवटलेली आहे. असे असतांना या महामानवाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे निश्चितच अशोभणीय आहे. खरंतर राहुल सोलापुरकर एकदा नव्हे दोनदा चुका करतो आणि दोनदा माफी मागतो, यावरून त्याची विचारसरणी दिसून येते. खरंतर अभिनेता हा स्वतंत्र विचारसरणीचा प्राणी असतांना त्याने सत्तेभोवती किंवा सत्तेत असलेल्यासाठी काही वक्तव्ये करून त्यांच्याकडून पाठ थोपटून आपणही तुमच्याच छावणीतील आहोत, याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चालवलेला खटाटोप असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता राहुल सोलापूरकर हा वादग्रस्त असा अभिनेता नव्हताच, मात्र अलीकडच्या काही दिवसांपासून त्याचे सातत्याने होणारे वादग्रस्त वक्तव्य त्याच्या व्यक्तीमत्वाची साक्ष देत आहे. तसेच असे अभिनेत्याच्या मनात जे आहे, तेच तोंडावर येत असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी त्याच्यावर अजूनही कोणताही गुन्हा नोंद झाला नाही, हेच एकमेव आश्चर्य म्हणावे लागेल.
COMMENTS