लातूर प्रतिनिधी - वाढत्या जल संकटावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी भारतीय जैन संघटना, जलशक्ती मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या वतीने लातूर जिल्ह्या
लातूर प्रतिनिधी – वाढत्या जल संकटावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी भारतीय जैन संघटना, जलशक्ती मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या वतीने लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधील तलावांतील गाळ काढून तलावांचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे, असे भारतीय जैन संघटनेचे लातूर जिल्हा अध्यक्ष अभय शहा यांनी सांगितले.
भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथ्था यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगून अभय शहा पुढे म्हणाले की, देशभरात विविध प्रदेशात पाण्याचे संकट दिवसेंदिवस बिकट होत चालले आहे. प्रत्येक गावाला पिण्यासाठी, शेतीसाठी तसेच जनावरांसाठी नियमितपणे पाण्याची गरज असते. बदलत्या वातावरणात ऋतुचक्रात अमुलाग्र बदल झाल्याने पाऊस वेळेवर पडेलच असे नाही. त्यामुळे पाण्याचे संकट आणखी भीषण होण्याची शक्यता बळावली आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक शहर, गावाने पाण्यासाठी आत्मनिर्भर होण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गावांमधील तलावात सध्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर गाळ साठला गेला आहे. हा गाळ पावसाळा सुरु होण्यापूर्वी या उपक्रमाच्या माध्यमातून काढला गेल्यास पाण्याची साठवण क्षमता वाढणार आहे. लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी सर्वतोपरी नियोजन चालू आहे. या योजनेची माहिती जास्तीत जास्त गावे, लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते सोमवारी, दि. 8 में रोजी या योजनेच्या प्रचार रथाचे हिरवा झेंडा दाखवून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उद्घाटन करण्यात येणार असल्याचे अभय शहा यांनी सांगितले. यावेळी सीए सुनील कोचेटा, किशोर जैन, संतोष उमाटे, डॉ. पी. के. शहा , जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक ज्ञानेश्वर मस्के यांची उपस्थिती होती. या योजनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच साठवण तलावातील गाळ काढण्याबाबत ज्ञानेश्वर मस्के ( मोबा. 74472 77636 ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
COMMENTS