Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उन्हाची तीव्रता वाढली ; उष्णतेमुळे कामकाजावर परिणाम

कुकडी लाभक्षेत्रातील श्रीगोंदा तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा

श्रीगोंदा शहर ः श्रीगोंदा शहर आणि तालुक्यात उन्हाची तीव्रता अत्यंत वेगाने वाढत असतानाच अतिउष्णतेमुळे दैनंदिन कामावर मोठा विपरीत परिणाम झाल्याचे द

शासकीय, खासगी कार्यालयात तंबाखूजन्य पदार्थ वापरावर बंदी
महामंडळाच्या थकीत कर्ज व्याजावर ५० टक्के सवलत
एकनाथ शिंदेंचा राजकीय भूकंप… वैचारिक कि आर्थिक ! | LOK News24

श्रीगोंदा शहर ः श्रीगोंदा शहर आणि तालुक्यात उन्हाची तीव्रता अत्यंत वेगाने वाढत असतानाच अतिउष्णतेमुळे दैनंदिन कामावर मोठा विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. होळी सणानंतर उन्हाची तीव्रता अत्यंत वेगाने सुरू झालेली असून, आता चैत्र महिन्यामध्ये उष्णतेचा मोठा कहर जाणवणार आहे. सद्यस्थितीला 35 ते 36 अंश सेल्सिअस दररोज चे तापमान दिसून येत आहे त्यामुळे चैत्र महिन्यामध्ये तर हा पारा उच्चांकी वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान सन 2023- 24 या वर्षांमध्ये पाऊस अत्यल्प पडल्याने यंदाचा उन्हाळी हंगाम लाहीलाही करणारा राहणार आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, कुशल कामगार, सर्वसामान्य व्यक्ती, वृद्ध व्यक्ती इत्यादींना वाढत्या उष्णतेमुळे शरीरावर मोठा दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. या उन्हाळी हंगामात बाहेर पडताना प्रत्येकाला काळजी घ्यावी लागेल, अशी स्थिती चालू वर्षी जाणवणार आहे. आता यापुढे जवळपास दोन ते अडीच महिने उन्हाची तीव्रता वाढवून कायम राहणार आहे. या वाढत्या उष्णतेमुळे जमिनीतील पाणीसाठा देखील संपुष्टात आल्याचे शेतकरी सांगतात. सद्यस्थितीला श्रीगोंदा तालुक्यात घोड व कुकडीचे आवर्तने सुटली मात्र त्या शेती पाण्याचे देखील मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन वेगाने वाढत असल्याचे शेतकरी सांगतात.
       दरम्यान या उन्हाच्या तीव्रतेमुळे गावोगावी पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चारा व पाण्याचा देखील प्रश्‍न तितकाच गंभीर होताना दिसतो त्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण गटामध्ये पाटपाण्याची सोय नसल्याने या गटातील अनेक गावे आतापासूनच तहानलेले दिसतात. अनेकांना हंडाभर पाण्यासाठी भटकंतीची वेळ येऊन ठेपलेली आहे. तालुका प्रशासनाने चालू वर्षी उन्हाळी हंगामात ज्या गावांमध्ये पाटपाण्याची सोय नाही त्यासाठी तात्काळ पिण्याचे पाण्याचे टँकर चालू करण्याची आवश्यकता आहे. कारण पाणी आहे तरच जीवन आहे, अशी स्थिती सध्या सर्वांचीच दिसून येते. त्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यात अनेक गावांमध्ये गावच्या नळ योजना सार्वजनिक विहित पाणीच नसल्याने पाणीपुरवठा बंद असल्याचे समजते. त्यामुळे तालुका प्रशासनाने तालुक्यातील प्रत्येक खेडोपाडी पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्याची आवश्यकता असून, जेथे पाण्याची कमतरता तिथे टँकर सुरू व्हावेत ,अशी अपेक्षा देखील ग्रामस्थ व महिलांमधून मोठ्या प्रमाणात होत आहे. सद्यस्थितीला श्रीगोंदा तालुक्यात 132 मायनर मधून कुकडीचे आवर्तन सोडण्यात आले. परंतु शंभर ते सव्वाशे क्युसेसने या 132 मायनर मधून पाणी सोडल्यामुळे अनेक शेतकरी या उन्हाळी हंगामातील हक्काचे आवर्तनापासून वंचित आहेत. तशा भावना शेतकर्‍यांनी व्यक्त केले आहेत. यासाठी संबंधित जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. कारण उन्हाळी हंगामातील हे कुकडीचे महत्त्वाचे आवर्तन आहे. या आवर्तनामधून शेती पिकांबरोबरच गावतळी देखील भरून द्यावेत किमान जनावरांच्या पिण्याचा पाणी प्रश्‍न मार्गी लागू शकतो. त्यातून प्रत्येक गावच्या कुपनलिका व पाणीपुरवठाच्या विहीरतील पाणीसाठ्यात वाढ होऊ शकते, असे देखील ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.

उन्हाळी हंगामात शेतकर्‍यांसमोर पाणीटंचाई – श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रात 132 मायनर खालील मोठे क्षेत्र ओलिताखाली येते. या लाभ क्षेत्रात उन्हाळी हंगामात पाणीटंचाईला शेतकरी व ग्रामस्थांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत कमी दाबाने या मायनर मधून पाणी सोडले तर निश्‍चितपणे शेतकर्‍यांची आपापसात भांडणे तर होतीलच परंतु उभी पिके देखील भुईसपाट होणार आहेत. त्यातून शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. यासाठी संबंधित जलसंपदा विभागाचे अधिकार्‍यांनी या चालू उन्हाळी आवर्तनात एकही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शेतकरी उग्ररूप धारण केल्याशिवाय राहणार नाही. अशी देखील शेतकर्‍यांमधून बोलले जात आहे. त्यामुळे अधिकार्‍यांनी कर्तव्य भावनेतून आपापले कर्तव्य बजावावेत कारण शेतकरी मोठ्या आसमानी संकटातून मार्गक्रम करत आहे. याची जाणीव संबंधित जलसंपदा विभागाचे अधिकार्‍यांनी ठेवावी असे देखील शेतकर्‍यांमधून बोलले जात आहे.

COMMENTS