विद्यार्थी आत्महत्येचा संख्या विचारात घेतल्यास यात महाराष्ट्र अव्वल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रासाठी हा कलंक असून, निकोप
विद्यार्थी आत्महत्येचा संख्या विचारात घेतल्यास यात महाराष्ट्र अव्वल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रासाठी हा कलंक असून, निकोप शिक्षणपद्धती विकसित करण्यासाठी आपण कमी पडल्याचे दिसून येत आहे. आजकाल सर्वच पालक आपला पाल्य आघाडीवर कसा राहिल यासाठी त्याच्यावर सातत्याने दडपण टाकतांना दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थी आपल्या पालकांच्या आशा-अपेक्षा पूर्ण करण्यात कमी पडल्यानंतर खोट्या प्रतिष्ठेपायी आत्महत्येकडे वळतांना दिसून येत आहे.
नुकताच जाहीर झालेल्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालातील आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत वाढ झाल्यावरून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या आत्महत्या लोकसंख्या आणि शेतकर्यांच्या आत्महत्येच्या संख्येपेक्षाही अधिक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशभरात विद्यार्थ्यांवर असलेले दडपण यातून स्पष्ट दिसून येते. खरंतर आपल्याला शिक्षणपद्धती बदलण्याची खरी गरज आहे. हसत-खेळत आणि साध्या-सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत शिक्षण देणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे पालक दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे. आजकाल ओढा इंग्रजी शिक्षणाकडे मोठ्या प्रमाणावर वळतांना दिसून येत आहे. ती आजची गरज देखील आहे. मात्र घरी वातावरण मराठी माध्यमांचे असल्यास आणि शाळेत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण असल्यामुळे विद्यार्थ्यांची दुहेरी कोंडी होती. त्यामुळे त्याचा स्वविकास होत नाही. त्यामुळे घरी जे वातावरण असेल तेच वातावरण शाळेत असल्यास विद्यार्थ्यांची या कोंडीतून सुटका होवून त्याचा स्वविकास होण्यास मदत होते, शिवाय तो दडपणमुक्त वातावरणात अभ्यास करतो. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार भारतात एकूण आत्महत्या करण्याचा वार्षिक दर दोन टक्क्यांनी वाढला आहे. तर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा दर चार टक्क्यांनी वाढला आहे. तसेच बर्याच घटनांची नोंद होत नसल्यामुळे प्रत्यक्ष आत्महत्येची संख्या यापेक्षा जास्त असू शकते, असेही या अहवालात म्हटले गेले आहे. त्यामुळे या सर्व बाबी चिंताजनक आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सकस आणि दर्जेदार शिक्षण देण्याच्या कोंडीत आपण त्यांना दबावाखाली आणतांना दिसून येत आहे. अहवालात 2022 च्या आकडेवारीची माहिती देण्यात आली आहे. 2021 च्या तुलनेत (13,089) 2022 साली 13,044 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. दोन्ही वर्षांच्या आकडेवारीत अतिशय किंचितसा फरक आहे. एकूण आत्महत्येची आकडेवारी (विद्यार्थी आणि इतर घटक) यापेक्षा भयानक आहे. 2021 साली 1 लाख 64 हजार 033 आत्महत्या झाल्या होत्या. तर 2022 साली 1 लाख 70 हजार 924 आत्महत्यांची नोंद झाली आहे. 2021 च्या तुलनेत आत्महत्येच्या संख्येत 4.2 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर मागच्या दोन दशकांची तुलना केल्यास विद्यार्थ्यांच्या आत्महत्या चार टक्क्यांनी वाढल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होण्यात महाराष्ट्र आघाडीवर असून एकूण आत्महत्येच्या 14 टक्के आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. त्यानंतर तमिळनाडू आणि इतर राज्यांचा क्रमांक लागतो. आजकाल लहान मुलांमध्ये हॉर्ट अॅटकच्या घटना देखील समोर आल्या आहेत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये असलेला तणाव. हा तणाव कमी करण्यात आपण अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. आजकाल तर मुल तीन वर्षांचे होत नाही तर, त्याला नर्सरी, ज्युनिअर केजी, सीनिअर केजीपासून त्याची सुरूवात होते. त्याचे बालपण आपण हिरावून घेतांना दिसून येत आहे. तोच दबाव तो मुलगा आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये वागवत असतो, आणि त्याचा स्फोट होवून तो आत्महत्या करतांना दिूसन येतो. राजस्थानमधील कोटा याठिकाणी कोचिंग लावणार्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शिक्षणाची व्याख्या बदलण्याची खरी गरज आहे. प्रत्येक मुलांमध्ये काही तरी सुप्त गुण असतात. त्या सुप्त गुणांचा विकास करण्यास पालक आणि शाळा देखील कमी पडते. परिणामी ज्या क्षेत्रात त्या मुलाला आवड नाही, त्या क्षेत्रात त्या मुलाला करिअर करावे लागते. आणि त्याचा तणाव त्याला असह्य होतो. त्यामुळे यातून बाहेर पडण्याची खरी गरज आहे. वास्तविक पाहता विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती लहानपणापासून विकसित करण्याची गरज आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळेलच असे नाही. त्यामुळे त्यावर नाराज होता कामा नये. तर यश-अपयश खिलाडूवृत्तीने घेण्याची गरज आहे.
COMMENTS