अहमदनगर ः केंद्र सरकारने नुकतीच खरीप हंगामासाठी एकूण 14 पिकांच्या हमीभावात अर्थात एमएसपीमध्ये वाढ केली आहे. मात्र सरकारने शेतकर्यांच्या जखमेवर म
अहमदनगर ः केंद्र सरकारने नुकतीच खरीप हंगामासाठी एकूण 14 पिकांच्या हमीभावात अर्थात एमएसपीमध्ये वाढ केली आहे. मात्र सरकारने शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळले असून, एमएसपीमध्ये केलेली वाढ तुटपुंजी असल्याचा आरोप किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केला आहे.
लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देशभरातील शेतकर्यांच्या नाराजीचा फटका सत्ताधार्यांना बसला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता तरी आपल्या शेतकरी विरोधी धोरणांमध्ये बदल करेल व खरीप हंगामाचे एम.एस.पी.चे भाव रास्त उत्पादन खर्चावर आधारित शेतकर्यांना परवडतील अशा पातळीवर जाहीर करेल अशी अपेक्षा होती. मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेले आधार भाव पाहता ही अपेक्षा फलद्रूप झालेली नाही असे नवले म्हणाले. वाढता उत्पादन खर्च व केंद्र सरकारने शेती सेवा, औजारे, निविष्ठा व उत्पादनावर लावलेले जी.एस.टी.चे दर पाहता करण्यात आलेली वाढ ही अत्यंत तुटपुंजी आहे. एक प्रकारे याद्वारे शेतकर्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यात आल्याचे नवले म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्रात कृषी मूल्य आयोगाच्या झालेल्या बैठकीमध्ये सोयाबीनला किमान 5300 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याची मागणी केली होती. किसान सभेने परिषद घेऊन सोयाबीनचा उत्पादन खर्च पाहता किमान 7000 रुपये प्रति क्विंटल आधार भाव जाहीर करण्याची मागणी केलेली होती. प्रत्यक्षात मात्र अत्यंत तुटपुंजी वाढ करुन यावर्षी केंद्र सरकारने सोयाबीनसाठी 4892 रुपये इतकाच हमीभाव जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीच्या तुलनेत सुद्धा तो 408 रुपयाने कमी आहे. वाढता उत्पादन खर्च पाहता कापसाला किमान 10 हजार रुपये प्रति क्विंटल भाव शेतकर्यांना मिळावा असा ठराव किसान सभेने वर्धा येथे घेतलेल्या परिषदेमध्ये केलेला होता. केंद्र सरकारने या पार्श्वभूमीवर जाहीर केलेला हमीभाव हा खूप कमी असून केवळ 7121 रुपये हमीभाव कापसासाठी जाहीर करण्यात आलेला आहे. शेतकरी व किसान सभेची मागणी आणि जाहीर करण्यात आलेला हमीभाव याच्यामध्ये 2879 रुपयांचा फरक दिसतो आहे.
COMMENTS