चेन्नई प्रतिनिधी - प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ, भारताच्या हरितक्रांतीचे प्रणेते आणि माजी राज्यसभा खासदार डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचं निधन झालं.
चेन्नई प्रतिनिधी – प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ, भारताच्या हरितक्रांतीचे प्रणेते आणि माजी राज्यसभा खासदार डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचं निधन झालं. वयाच्या 98 व्या वर्षी चेन्नईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तांदळाच्या वाढीव उत्पादन देणाऱ्या जाती शोधण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. शेतकऱ्याच्या उत्पन्नवाढीसाठी त्यांनी अमाप कष्ट घेतले. त्यांना देशातील हरित क्रांतीचे जनकही म्हटले जाते. परदेशी धान्यांसह देशी वाणांचे संकरन करून त्यांनी नवीन वाण निर्माण केले, ज्यामुळे कमी वेळेत चांगली उत्पादकता मिळते. डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी तामिळनाडूतील कुंभकोणम, येथे झाला. त्यांचे वडील एमके सांबशिवन हे सर्जन होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण कुंभकोणममध्येच झाले. त्यांच्या वडिलांचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा प्रभाव हे त्यांना शेतीत रस असण्याचे प्रमुख कारण होते. या दोघांमुळेच त्यांनी कृषी क्षेत्रात उच्च शिक्षण घेतले. कृषी शास्त्रज्ञ डॉ. स्वामीनाथन यांनी ‘हरितक्रांती’ यशस्वी करण्यासाठी दोन केंद्रीय कृषी मंत्री सी. सुब्रमण्यम (1964-67) आणि जगजीवन राम (1967-70 आणि 1974-77) यांच्यासोबत जवळून काम केले. याकाळात रासायनिक-जैविक तंत्रज्ञानाद्वारे गहू आणि तांदळाची उत्पादकता वाढवली गेली. हरित क्रांतीमुळे भारताला धान्य क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या मार्गावर वाटचाल करता आली. हरित क्रांतीमुळे भारताचे चित्र बदलले.
COMMENTS