अमरावती/प्रतिनिधी ः देशातील मतदार हा कुणाला निवडणूक द्यायचे आणि कुणाचा पराभव करायचा ते ठरवतो. याअगोदर सरकार मतपेटीतून जन्माला यायचे, मात्र आताचे
अमरावती/प्रतिनिधी ः देशातील मतदार हा कुणाला निवडणूक द्यायचे आणि कुणाचा पराभव करायचा ते ठरवतो. याअगोदर सरकार मतपेटीतून जन्माला यायचे, मात्र आताचे सरकार खोक्यातून जन्माला येत असल्याची टीका ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे सध्या विदर्भ दौर्यावर असून सोमवारी ते खासदार नवनीत राणा यांचा मतदारसंघ असलेल्या अमरावतीमध्ये कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करतांना बोलत होते.
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्यावर आरोप केला जातो की मी घरी बसून होतो. पण, मी घरी बसून कोणाची घरे फोडली नाहीत. तसेच, मला घरी बसून जे काम करता आले ते काम तुला घरे फोडूनही जमत नाहीये. सत्तेत नसूनही जनता माझ्यावर अफाट प्रेम करत आहे. मात्र, तुम्हाला गर्दी जमवण्यासाठी दारोदारी फिरण्याची वेळ आली आहे. भाजपला सत्तेची मस्ती आली आहे. मात्र, त्या शक्तीचा आत्मविश्वास त्यांच्याकडे नाही. मर्दाची औलाद असाल तर सरकारी यंत्रणा सोडून समोर या. तुम्ही राजकारणातील नामर्द आहात. फक्त अमरावतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. तुम्हाला महाराष्ट्रात कुणी विचारत नव्हते तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला खांद्यावर बसवून पुढे आणले असा घणाघात ठाकरे यांनी यावेळी केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप म्हणतो आमच्याकडे विश्वातील सर्वात लोकप्रिय, सर्वात शक्तिशाली पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. तरीही भाजपला, पंतप्रधान नरेंद्र मोदींना दुसर्यांची घरे फोडण्याची गरज का पडत आहे? आतात चाय पे चर्चा नव्हे तर टपरीवर चर्चा व्हायला हवी. जिकडे जा तिकडे केवळ मोदींच्याच जाहीरातींचे फोटो दिसतात. मात्र, सर्वसामान्यांना या योजनांचा फायदा झालाच नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जनतेसमोर वास्तव समोर आणणे गरजेचे आहे. भाजपचे निष्ठावंत आता कुणाचे ओझे उचलत आहेत. ज्या भाजपच्या निष्ठावंतांनी प्रसंगी मार खाऊन पक्ष वाढवला, त्यांच्यावरच आता विरोधकांसाठी सतरंज्या उचलण्याचे काम करावे लागत आहे. छगन भुजबळांमुळे बाळासाहेब ठाकरेंना तुरुंगात जावे लागले, त्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही, असे सांगत गद्दारांनी शिवसेना फोडली. मात्र, आता त्याच छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून ते बसले आहेत. आता काय सांगणार?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला केला.
केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून पक्ष फोडण्याचे पाप – पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पक्षच चोरला जात आहे. हे एक नवे राजकारण भाजपने सुरू केले आहे. त्यासाठी अगदी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आमच्या पक्षाचे नाव शिवसेना आहे आणि ते नाव मी कुठेही जाऊ देणार नाही. कारण माझ्या वडिलांनी, आजोबांनीच हे नाव पक्षाला दिले आहे. माझ्या पक्षाचे नाव इतरांना देण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाही नाही. जे काही राजकीय पक्ष आहेत त्या निवडणुकीत काही गैरव्यवहार तर करत नाही ना? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
नवनीत राणांना बजरंगबलीच धडा शिकवेल – संजय राऊतांनी खा. नवनीत राणांचा अमरावतीमध्ये चांगलाच समाचार घेतला. हनुमान चालीसाचे पठण त्यांनी राष्ट्रवादीच्या फुटलेल्या गटासमोर करावे. बॅनर फाडल्याची किंमत त्यांना चुकवावीच लागेल. अमरावतीत परत त्यांना निवडणुका लढायच्या आहेत. पण 100 टक्के सांगतो या बाई परत लोकसभेत जातील याची खात्री नाही, अजिबात जाणार नाहीत त्या लोकसभेत. कारण त्यांना बजरंगबली आणि हनुमानच धडा शिकवणार आहे. कर्नाटकात त्यांना चांगलाच धडा मिळाला आता महाराष्ट्रात त्यांना धडा मिळणार आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी नवनीत राणा यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
’राइट टू रिकॉल’ची योग्य वेळ आली – सध्याचे प्रकार असेच सुरू राहिले तर उद्या कुणीही दमदाटी आणि पैशाच्या जोरावर पंतप्रधान व मुख्यमंत्री होईल. हे थांबवण्यासाठी लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याचा अधिकार मतदारांना देण्याची वेळ आली आहे, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. जनता पाच वर्षांसाठी सरकार निवडून देते. मात्र मधल्या काही अनेक तडजोडी होतात. त्यामुळे लोकांना निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडाला आहे. तो परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी ’राइट टू रिकॉल’ची योग्य वेळ आली असल्याचे म्हटले आहे.
COMMENTS