Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवछत्रपतींचे विचार देशभर रुजविणे हेच आद्य कर्तव्य : देसाई

शिंगणवाडीत शिवसमर्थ प्रेरणादिन उत्साहात साजराचाफळ / प्रतिनिधी : शिवसमर्थांच्या ऐतिहासिक भेटीचे महत्त्वाचे ठिकाण शिंगणवाडी हेच असल्याने, याच चाफळ

भुजबळानंतर मंत्री देसाई कोरोनाबाधित
२४ वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार ; चौघांवर गुन्हा नोंद
टीसीएस लंडन मॅरेथॉनमध्ये प्राची पवारने फडकविला तिरंगा

शिंगणवाडीत शिवसमर्थ प्रेरणादिन उत्साहात साजरा
चाफळ / प्रतिनिधी : शिवसमर्थांच्या ऐतिहासिक भेटीचे महत्त्वाचे ठिकाण शिंगणवाडी हेच असल्याने, याच चाफळ खोर्‍यातून शिवाजी महाराजांचे विचार देशभर पोहोचविले जाण्याचा व मनामनात रुजविण्यासाठी कार्य करण्याचा आग्रह गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला. वैशाख शुध्द नवमीला शिंगणवाडीत शिवसमर्थ प्रेरणादिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. त्या प्रसंगी देसाई बोलत होते. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करुन, सर्वांच्या सहकार्याने शिवसमर्थ प्रेरणादिनाचा कार्यक्रम शासकीय सहकार्याने साजरा करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही मंत्री महोदयांनी याप्रसंगी दिली.
तत्पूर्वी तीर्थक्षेत्र चाफळच्या राममंदिरातून भगव्या ध्वजाच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराजांची सजवलेली पालखी शिवगीते म्हणत, नामस्मरणात वाजतगाजत शिवभक्तांनी खांद्यावरुन मोठ्या उत्साहात शिंगणवाडीच्या शिवेवर आणली. शिंगणवाडी ग्रामस्थांनी टाळगजराच्या नामघोषात समर्थांची पालखी शिवेवरील शिवसमर्थ स्फूर्ती स्मारकापर्यंत आणली. टाळ-मृदंगाच्या गजरात झालेली शिवसमर्थांची भेट 373 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक घटनेस उजाळा देवून गेली.
या कार्यक्रमाला खास उपस्थित राहण्यासाठी मध्य प्रदेशमधील इंदूरहून आलेल्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे स्मृती समिती, रावेरखेडीचे सचिव श्रीपादभैय्या कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिंगणवाडी गाव देशभर पोहोचल्याने त्यांच्यासह अनेकजण वैशाख शुध्द नवमीला चाफळ खोर्‍यात येत असल्याचे सांगत असताना समर्थलिखित दासबोधाने सर्वच युवकांचे मानसशास्त्र विकसित झाल्याचे आग्रही प्रतिपादन केले.
प्रास्ताविकात दीपक प्रभावळकर म्हणाले, महाराष्ट्रभर बरीच उलथापालथ होऊनही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जातीय सलोख्याची साधी ठिणगीही पडू दिली नाही. अगदी त्याच धर्तीवर चाफळच्या भूमीवर हा सोहळा राज्य शासनाने साजरा करावा, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
आशीर्वादीय भाषणात देहूच्या तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे सोहळाप्रमुख हभप माणिकबुवा मोरे म्हणाले, शिवसमर्थांच्या भेटीने व वास्तव्याने पावन झालेले शिंगणवाडी गाव जगाच्या नकाशावर ठळकपणे उठून दिसणे गरजेचे आहे. छ. शिवरायांच्या आध्यात्मिक बैठकीस तुकोबाराय व रामदास अशी दोन भक्ती व शक्तीची अधिष्ठाने आहेत. शिवसमर्थ प्रेरणा दिन हा महाराष्ट्रासाठी महत्वाचा दिवस असून प्रत्येकाने वैशाख शुध्द नवमीस शिंगणवाडीत या सोहळ्यात नतमस्तक होण्यासाठी आलेच पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले.
यावेळी कोरोना महामारीच्या काळातही या सोहळ्याचे सातत्य राखण्याचे कार्य करणार्‍या सौरभ तोडकर, विक्रम जोशी, अद्वैत प्रभावळकर यांचा सन्मान करण्यात आला. सानिका बाबर हिने मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शिरीष मोरे, पुरुषोत्तम मोरे, भूषण स्वामी, सोन्नाबुवा रामदासी, विठ्ठलबुवा वडगावकर, सुधीर थोरात, रुपेश मोरे, डॉ. गोसावी, सोमनाथ भंडारे, शांताराम भंडारे, लक्ष्मण भंडारे, राहुल कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सरपंच शंकरराव पवार यांनी स्वागत केले. शिवसमर्थ प्रेरणादिन सोहळ्याचे जनक डॉ. संदीपराज महिंद गुरुजी यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद एकबोटे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपसरपंच लक्ष्मण पवार फौजी, पोलीस पाटील उमेश पवार, बापूसाहेब पवार, सागर पवार व ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.

COMMENTS