कायम पुरोगामी आणि शेतकरी चळवळीशी बांधून घेतलेले व्यक्तीमत्व, आणि वयाची नव्वदी ओलांडल्यानंतर देखील प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर आंदोलन करणारे व्यक्तीमत
कायम पुरोगामी आणि शेतकरी चळवळीशी बांधून घेतलेले व्यक्तीमत्व, आणि वयाची नव्वदी ओलांडल्यानंतर देखील प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर आंदोलन करणारे व्यक्तीमत्व एनडी पाटील. एनडी पाटील यांचे पूर्ण नाव नारायण पाटील. सांगली जिल्ह्यातील ढवळी हे वाळवा तालुक्यातील त्याचं गाव. शाळेत असतांनाच सत्यशोधक विचार त्यांना ऐकायला मिळाले. आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांची भेट झाली, आणि रयत संस्थेशी त्यांचा जवळून संबंध आला. तो कायमचाच राहिला. पुढे नोकरीला रामराम ठोकत त्यांनी आपले पूर्ण जीवन शेतकरी कामगार पक्षासाठी पूर्ण वेळ दिला. जिवंत कार्यकर्ता कसा असतो, ते एनडी पाटील यांच्याकडे बघितल्यानंतर दिसून येते. ऊर्जेचा अखंड स्त्रोत, शेतकर्यांच्या प्रश्नांची प्रभावीपणे मांडणी आणि त्यातून होणारी तळमळ नेहमीच अधोरेखित होत असे. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने ते विधानपरिषदेवर गेले. विधानपरिषदेवर संधी मिळाल्यानंतर त्यांनी केलेली भाषणे अभ्यासपूर्ण असायची. त्यांच्या भाषणांनी सभागृह दणाणून जायचे. उपेक्षित, शोषित-पीडितांचा त्यांना नेहमीच कळवळा होता. त्यामुळे त्यांनी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्यासाठी देखील ते तयार असायचे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एनडींनी अर्थशास्त्रात एमए केल्यानंतर पुणे विद्यापीठातून एलएलबीची पदवी घेतली. त्यानंतर ते अध्यापन क्षेत्रात कार्यरत होते. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ व रयत शिक्षण संस्थेत त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली होती. राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. 1948 साली शेतकरी कामगार पक्षात त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर पक्षाच्या सरचिटणीस पदापर्यंत मजल मारली. तब्बल 18 वर्षे ते महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सदस्य होते. 1978 साली त्यांना पुलोद सरकारमध्ये सहकारमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामकाजाची आजही चर्चा होते. कापूस उत्पादक शेतकर्यांना फायद्याची ठरलेली कापूस एकाधिकार योजना त्यांनीच सुरू केली. मंत्री असताना कोणत्याही भूमिपूजन कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि अंमलात आणला. एन डी पाटील यांच्यासमोर महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श होता, त्याच आदर्शाने ते आयुष्यभर वागले. सत्तेत जायची संधी मिळाली, पण तेव्हाही त्यांच्या जगण्यात आणि साधेपणात काहीही फरक पडला नाही. त्यांच्या साधेपणानं जगण्याचा एक किस्सा नेहमीच सांगितला जातो. एन डी पाटील महाराष्ट्राचे सहकार मंत्री होते तेव्हाची गोष्ट.एका सकाळी त्यांच्याकडे एक माणूस भेटायला आला.बंगल्यावर कोणीही कर्मचारी नव्हता. तो माणूस सरळ आत गेला. बैठकीच्या खोलीत बसला. बराच वेळ कोणी बाहेर येईना, म्हटल्यावर तो ज्या दिशेने कपडे धुण्याचा आवाज ऐकू येत होता, तिकडे चौकशी करायला गेला. तेव्हा एन डी पाटील त्याला तिथे कपडे धूत बसलेले दिसले. त्या माणसाची चाहूल लागल्यावर त्यांनी वळून बघितलं आणि म्हणाले, तुम्ही माझ्याकडे आलाय का? जरा थांबा. आलोच मी. आज सुट्टी होती म्हणून कपडे धूत होतो,’’ तो माणूस ते दृश्य पाहून बघतच राहिला. कारण महाराष्ट्राचे सहकारमंत्री स्वतःचे कपडे धूत, आहेत हे त्याच्या दृष्टीने धक्कादायक होतं. मात्र एनडी पाटील यांची आपल्या जीवनात कधीही बडेजाव मिरवला नाही. ते कायम आपल्या अंगी नम्रता बाळगून होते. मात्र जेव्हा सर्वसामान्यांचे प्रश्न यायचे, त्यावेळेस मात्र त्यांचा आक्रमकपणा जाणवत असे. मात्र त्यांनी त्यात देखील कधीही आक्रस्ताळेपणा येऊ दिला नाही. ते सहकारमंत्री असतांना दुसरी त्यांच्याबदद्लची एक आठवण सांगायची म्हणजे, त्यांच्या मुलाला सुहास यांना मेडिकलला प्रवेश घ्यायचा होता. एक दोन गुण कमी होते. त्यांनी त्यांचे नातेवाईक शरद पवार मुख्यमंत्री होते. वडील एन डी पाटील सहकारमंत्री होते. पण त्यांचा वशिला न लावता रांगेत उभा राहून इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. वडिलांचा व्यवसाय या रकान्यात त्यांनी शेती असे लिहिले. पण मामा किंवा वडील यांची ओळख सांगितली नाही.’ अशी आठवण एन डी यांच्या पत्नी सरोजमाई सांगतात. या अनेक बाबीतून एनडी पाटील यांचा साधेपणा अधोरेखित होतो. अलीकडच्या काही वर्षांत तब्बेत खालावल्यामुळे ते बेडवर पडून होते. घरात असले तरी, त्यांचे वाचन आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरूच होत्या. त्यांना नेहमीच तळा-गाळातील सर्वसामान्य व्यक्तींचे प्रश्न सुटले पाहिजे, याची कणव होती. असा हा लढवय्या नेता म्हणण्यापेक्षा कार्यकर्त्या आज आपल्यातून निघून गेला आहे.
COMMENTS