Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुळा धरणाकडे जाणार्‍या रस्त्याचे भाग्य उजळणार

सहा कोटी रुपयांची खर्चाची निविदा पाटबंधारे खात्याकडून जाहीर

राहुरी/प्रतिनिधी ः नगर जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ व जिल्ह्यातील सर्वाधिक क्षमतेच्या मुळा धरणाकडे जाणार्‍या रस्त्याच्या दुरुस्तीला मुहूर्त

दिलासादायक…यंदा पाणीटंचाई कमी, 3 गावांनाच टँकरने पाणी
..आणि, भिल्ल वस्तीत तब्बल 50 वर्षांनी आले हक्काचे पाणी
साईराज प्रतिष्ठानची दहीहंडी उत्साहात

राहुरी/प्रतिनिधी ः नगर जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ व जिल्ह्यातील सर्वाधिक क्षमतेच्या मुळा धरणाकडे जाणार्‍या रस्त्याच्या दुरुस्तीला मुहूर्त सापडला आहे. मोठ्या कालखंडानंतर हा रस्ता आता दुरुस्त होणार असून पाटबंधारे विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे सहा कोटी रुपयांची निविदा जाहीर केली आहे. 1973 सालापासून निर्मिती झालेल्या मुळा धरण व परिसराला अनन्य साधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आहे.

नगर जिल्ह्याची जलसंजीवनी असे मुळा धरण मानले जाते . राहुरी नगर मार्गावर मुळा डॅम फाट्यापासून धरणाकडे जाण्यासाठी आठ किलोमीटरचा रस्ता आहे. मुळा धरणावर अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी विश्रामगृहाबरोबरच चुमेरी नावाचे अतिथी गृह आहे . मुळा धरणावरील अनेक भागांमध्ये वर्षभर व पावसाळ्यामध्ये नगर, राहुरीसह अन्य ठिकाणाहून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मुळा धरणाचे गेस्ट हाऊस हे राजकीयदृष्ट्या देखील महत्त्वाचे मानले गेलेले आहे. आणि मुळा ड्याम फाट्यावरील याच रस्त्याने राज्यातील बहुतांश आजी माजी मंत्र्यांचा प्रवास झालेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मुळा धरणाकडे जाणार्‍या या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. रस्त्यावर मोठाले खड्डे पडलेले आहे. मुळा ड्याम कडे जाण्यासाठी हा नगर कडील बाजूने एकमेव रस्ता आहे. या रस्त्याचा वापरही अनेकांनी कमी केलेला आहे . एवढेच नव्हे तर कृषी विद्यापीठाकडच्या उजव्या कॅनॉल चा मार्गाचा वापर आज पर्यंत पर्यटकांसह सर्वांकडूनच होत आलेला आहे . कृषी विद्यापीठातील लोकही याच मार्गाचा वापर करतात . मात्र या रस्त्याचा वापर मुळा डॅम, वरवंडी, बाभुळगाव,  कोंबडवाडीसह अनेक वाड्यावत्यांवरील शेतकरी, मजूर, ग्रामस्थ, विद्यार्थी करतात. मुळा धरणासह अन्य पाणी योजनांचे कर्मचारी, अधिकारी, यांना पाणी योजनांच्या ठिकाणी जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करण्याचा प्रसंग येतो. असे असताना मोठ्या कालखंडापासून या रस्त्याची दुरुस्ती दुर्लक्षित राहिलेली होती. दोन दिवसांपूर्वीच जलसंपदा विभागाच्या मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाने मुळा प्रकल्पांतर्गत नगर मनमाड महामार्ग ते मुळा धरण या आठ किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी चार कोटी रुपयांचे निविदा जाहीर केली आहे. तसेच मुळा धरणावरील मुळा वसाहती पासून तीन किलोमीटर रस्ता दुरुस्तीसाठी पावणे दोन कोटी रुपयांची निविदा देखील जाहीर केली आहे. त्यामुळे या मुळा डॅमच्या रस्त्याचे भाग्य लवकरच उजळण्याची शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वी हा रस्ता होणार का ? याकडे ग्रामस्थ, अधिकारी वर्गासह सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

COMMENTS