कराड / प्रतिनिधी : एसटीच्या कर्मचार्यांचा संप मिटत नसल्याने सर्वसामान्य प्रवासी, नोकरदार, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्याचा विचार करून आता
कराड / प्रतिनिधी : एसटीच्या कर्मचार्यांचा संप मिटत नसल्याने सर्वसामान्य प्रवासी, नोकरदार, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्याचा विचार करून आता एसटी प्रशासनाने बस मार्गावर आणण्यासाठी महामंडळाच्या उपलब्ध अधिकारी, कर्मचार्यांपैकी काहींना चालक व वाहक करण्याची तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत चालकांमधून झालेले सहायक वाहतूक निरीक्षक, वाहन तपासनीस व प्रवासी वाहतुकीचा परवाना असणार्या मेकॅनिकना चालक म्हणून तर वाहतूक नियंत्रकांचा वापर वाहक म्हणून करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
एसटीच्या कर्मचार्यांचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी सुरू असलेला संप गेल्या अनेक दिवासांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री अनिल परब यांच्याबरोबर अनेक बैठका झाल्या. मध्यंतरी खासदार शरद पवार यांनीही तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी कर्मचार्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन केले. मात्र, तरीही त्यातून तोडगा निघाला नाही. कर्मचारी काम बंद आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बहुतांश बसची चाके एका जागेवर थांबली आहेत.
परिणामी एसटीला कोट्यवधींचा तोटा सोसावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी, नोकरदार, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यांच्यावर दररोज पायपीट करण्याची वेळ आली आहे. त्याचा विचार करून एसटीची चाके मार्गावर आणण्यासाठी एसटी प्रशासनाकडून वेगवेगळे मार्ग अवलंबण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता एसटीकडून जे चालक पदोन्नतीने सहायक वाहतूक निरीक्षक, वाहन तपासनीस झाले आहेत, ज्या मेकॅनिकांकडे प्रवासी वाहतुकीचा परवाना आहे अशा कर्मचार्यांना चालक म्हणून काम करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. त्याचबरोबर वाहकांमधून बढती झालेल्या वाहतूक नियंत्रकांचा वापर वाहक म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी चालक-वाहकांना प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाने तसा आदेश काढला आहे.
300 रुपये अतिरिक्त भत्ता मिळणार
ज्या सहायक वाहतूक निरीक्षक, वाहन तपासनीस व प्रवासी वाहतुकीचा परवाना असणार्या मेकॅनिक यांचा संप काळात चालक म्हणून काम करतील. त्याचबरोबर वाहतूक नियंत्रक वाहक म्हणून काम करतील अशा कर्मचार्यांना महामंडळाकडून 300 रुपये अतिरिक्त प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचारी चालक-वाहक म्हणून काम करण्यास तयार होतील, असाही एसटी प्रशासनाचा अंदाज आहे.
COMMENTS