पाहण्यासाठी सन्नाटा, प्रतिसादाभावी योजनेचा वाजला बाजा नांदेड ः पारंपरिक कारागिरांना हक्काची बाजारपेठ मिळावी, त्यांच्या हाताला काम आणि कामाला भाव म

पाहण्यासाठी सन्नाटा, प्रतिसादाभावी योजनेचा वाजला बाजा
नांदेड ः पारंपरिक कारागिरांना हक्काची बाजारपेठ मिळावी, त्यांच्या हाताला काम आणि कामाला भाव मिळावा, या उदात्त हेतूने आयोजित करण्यात आलेली पीएम विश्वकर्मा योजनेची प्रदर्शनी नांदेडमध्ये मात्र दिसते काही, विकते काहीच नाही अशा अवस्थेत सापडली आहे. तीन दिवस चालणारी ही प्रदर्शनी प्रत्यक्षात पाहता, नियोजनापेक्षा गोंधळाचे आणि व्यवस्थेपेक्षा अव्यवस्थेचे जिवंत संग्रहालय ठरत आहे.
प्रदर्शनस्थळी प्रवेश करताच सर्वप्रथम स्वागत होते ते रिकाम्या स्टॉलचे! काही ठिकाणी स्टॉल आहेत, पण वस्तू नाहीत; काही ठिकाणी वस्तू आहेत, पण कारागीर नाहीत; आणि काही ठिकाणी दोन्ही नाहीत! नागरिकांनी गर्दी करावी म्हणून आयोजित केलेल्या कार्यक्रमात गर्दीचा पत्ता नाही, मात्र मोकळ्या खुर्च्यांना मात्र भरघोस दर्शन घडत आहे. संयुक्त आयोजनाचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात अनेक संस्था ‘दृश्य-अदृश्य’ पद्धतीने सहभागी झाल्याचे जाणवते. ज्या संस्थांची नावे फलकावर झळकत आहेत, त्यांचे स्टॉल मात्र शोधूनही सापडत नाहीत. त्यामुळे आम्ही आहोत, पण दिसत नाही अशीच अवस्था सध्या दिसून येते.
या योजनेचा उद्देश सुतार, लोहार, कुंभार, सोनार, मोची, न्हावी, विणकर, शिंपी, चांभार, गवंडी, टोपली व झाडू तयार करणारे, दगड कोरीव काम करणारे अशा कारागिरांना थेट ग्राहकांशी जोडण्याचा असताना, येथे मात्र कारागिर थेट निराशेशी जोडले गेले आहेत. दोन दिवस झाले तरी काही कारागिरांच्या हातात एक रुपयाही न पडल्याने आम्ही इथे प्रदर्शनासाठी आलो की अनुभवासाठी? असा प्रश्न त्यांच्या चेहर्यावर उमटत आहे. लाखोंचा खर्च करून उभारलेल्या या कार्यक्रमात पाहुणचार, निवास आणि खानपानाची व्यवस्था मात्र अगदी राजेशाही असल्याचे सांगितले जाते. पण ग्राहक आणण्यासाठी जाहिरात, बॅनर, उद्घोषणा, शहरभर प्रचार यांसारख्या गोष्टी मात्र बहुधा योजनेच्या पुढील टप्प्यात ठेवल्या असाव्यात! एका कोपर्यात अधिकारी लॅपटॉप उघडून आकडे जुळवत बसलेले दिसतात. स्टॉल रिकामे असले तरी एक्सेल शीट मात्र भरलेली असावी, असा नागरिकांचा अंदाज आहे. प्रत्यक्षात विक्री शून्य, पण कागदोपत्री यश शंभर टक्के, अशी ही सरकारी किमया असल्याचे उपहासाने बोलले जात आहे. एकंदरीत, चांगली योजना आणि ढिसाळ अंमलबजावणी यांचा हा सुंदर नमुना नांदेडकरांना अनुभवायला मिळत आहे. प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, दोषींवर कारवाई करावी आणि पुढील वेळी किमान स्टॉलमध्ये कारागिर आणि प्रदर्शनात ग्राहक तरी असतील, इतके तरी नियोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS