अजित पवार यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेली कृती आणि त्यानंतर नऊ जणांनी मंत्रीपदाचा घेतलेला शपथविधी, हा प्रकार महाराष्ट्राच्या वैचारिक
अजित पवार यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेली कृती आणि त्यानंतर नऊ जणांनी मंत्रीपदाचा घेतलेला शपथविधी, हा प्रकार महाराष्ट्राच्या वैचारिक भूमीत खुपसलेला खंजर आहे! वर्षानुवर्षे सत्ता भोगणाऱ्या या महाभागांना माणसांपेक्षा सत्ता अधिक महत्वाची वाटते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. राजकारण खरेतर, समाजाच्या उत्थानासाठी असणारा एक संवैधानिक मार्ग आहे. या मार्गाला पूर्णपणे उध्वस्त करण्याचा विळाच जणू सध्याच्या राजकीय शक्तींनी उचलला आहे, असे म्हणण्यास प्रत्यवाय राहिला नाही. महाराष्ट्र हा फुलें – शाहू – आंबेडकरांची भूमी असल्याची रट लावण्यात न थकणारी ही राजकीय मंडळी, प्रत्यक्षात प्रतिगामित्वाचे मेरूमणी आहेत, यात अतिशयोक्ती नाही. वास्तविक, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या विचार आणि कृतींने महाराष्ट्र घडविला त्यात प्रस्थापित समाज व्यवस्था अक्षरशः चारीमुंड्या चीत झाली. या महापुरुषांनी आपल्या कृतीने या राज्यातीलच नव्हे तर या संपूर्ण देशातील माणूस या संकल्पनेत येणाऱ्या प्रत्येक माणसाला एक समान संधी देण्याची नीती, कृती आणि उक्ती स्पष्टपणे जगले आणि त्यांनी सर्वंकष आदर्श समाजासमोर ठेवला. त्यांच्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय नेते अव्याहतपणे त्यांचं नाव घेत असले तरी, कृती मात्र त्यांच्या विचारांच्या विरोधात करतात. फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घेण्याची पात्रता ज्यांच्या अंगी नाही, ते मात्र त्यांचं नाव घेत राजकारण करित राहतात. ही नावे म्हणजे केवळ अक्षरं नसून तो कृती आणि विचारांचा संगम आहे. कृती आणि विचाराने देशात आणि राज्यात सर्वसामान्य माणूस, तो समाज व्यवस्थेतील अंतिम घटक म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते, त्याच्या उत्थानाचा विचार यात दडलेले आहेत. परंतु, गेली ७० वर्ष देशाला आणि महाराष्ट्राला सत्ताधारी जातवर्गाने अशा प्रकारे ग्रासले आहे की, या देशातील बहुजन आणि बहुसंख्य असणारा समाज हा सत्तेवर येऊ नये आणि त्याच्या उत्थानाचा कार्यक्रम होऊ नये, ही बाब या षड्यंत्रामध्ये आजपर्यंत चाललेली आहे! कालचा अजित पवार यांच्या नेतृत्वातील धोकेबाजीला बंडखोरी म्हणणे हे देखील बंडखोर या शब्दाचा अपमान आहे. अजित पवार यांनी केलेले कृत्य हे विचारांच्या पातळीवर अनैतिक – अनितीमान याच संकल्पनेत संबोधले जाईल! त्यामुळे अशी कृत्य करणाऱ्या समूहाला किंवा व्यक्तींना जेव्हा राज्याच्या सत्तेत सामावून घेतले जाते तेव्हा, त्या सत्तेवर देखील अनितीमानांचा वावर आहे, हे सिद्ध होते. देशाची आणि महाराष्ट्राची यापुढची सामाजिक आणि राजकीय लढाई ही समाजाच्या नीतिमत्तेला धरून किंवा नीती आणि तिच्या मूल्यांवर देखील होणार आहे. त्यांच्या मागे गेलेले अनितीमान लोक हे राज्याचे राज्यकर्ते कसे होवू शकतात? हे लोक आगामी काळात राजकीय परिघाच्या बाहेर जातील. सत्तेच्या परिघातून बाहेर जाणे तर अविभाज्य आहे. यापुढील काळ हा देशात आणि राज्यात नैतिक राजसत्तेचा काळ असेल. त्यामुळे या गेल्या दोन-तीन वर्षात राजकारणाची जी घसरण झाली आहे, ही एक प्रकारची घुसळण होत आहे. या घुसळणीतून आगामी काळात फुले -शाहू-आंबेडकर विचारांच्या परिपक्व राजकारण २०२४ नंतर देशात उभे राहिलेले दिसेल. सत्ताधारी जातवर्गाला हे स्पष्ट झाले आहे की, संविधानिक लोकशाही या शासन प्रकारतून आपली गच्छंती अटळ आहे; म्हणून हा सत्ताधारी जातवर्ग लोकशाही व्यवस्थेला जाणीवपूर्वक बदनाम करित आहे. परंतु, या सगळ्यांची सीमा आता संपली आहे, नव्या जडणघडणीकडे देशाची आणि राज्याची वाटचाल सुरू झाली आहे! ही वाटचाल आता कोणीही थांबवू शकत नाही!
COMMENTS