नागपूर/प्रतिनिधी : विधानसभेत पुन्हा एकदा विकासकामांच्या स्थगितीवरुन संघर्ष झाल्याचे पहायला मिळाले असून, यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर/प्रतिनिधी : विधानसभेत पुन्हा एकदा विकासकामांच्या स्थगितीवरुन संघर्ष झाल्याचे पहायला मिळाले असून, यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे दिसून आले. सरकार जाणीवपूर्वक विकासकामांना स्थगिती देत असल्याचा आरोप अजित पवारांनी केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
विधानसभेत कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विकासकामांच्या स्थगितीचा मुद्दा उपस्थित करताना म्हटले की, राज्यात सत्तांतर होऊन सहा महिने झाली आहेत. यापूर्वीच्या सरकारने अर्थसंकल्पात जी विकासकामे मंजुर केली होती ती सर्व व्हाईट बुकमध्ये आली होती. परंतु तरीही त्याला शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली. आतापर्यंत राज्यात अनेक सरकारे बदलली आहेत. परंतु व्हाईट बुकमध्ये आलेली विकासकामांना कधीही स्थगिती देण्यात आलेली नाही, ही विकासकामे गुजरात किंवा तेलंगणातली नाहीत, महाराष्ट्रातली आहे. तरीही सरकारने त्याला स्थगिती कशी काय दिली?, असा सवाल करत अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला त्याबाबत जाब विचारला. त्यानंतर अजित पवारांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले त्यावेळी त्यापूर्वीच्या सरकारने मंजूर केलेली विकासकामे रोखण्यात आली होती. माझ्या नागपूर विधानसभा मतदारसंघातल्या विकासकामांना स्थगिती देण्यात आली होती. मविआचे सरकार असताना भाजपच्या आमदारांना एक नवा पैसा विकासकामांसाठी दिला नसल्याचा आरोप उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केला. सरकार सूडभावनेने काम करत नसून 70 टक्के विकासकामांची स्थगिती रद्द करण्यात आली आहे. निधीवाटप करताना कोणताही नियम पाळण्यात आलेला नव्हता, त्यामुळं आम्ही स्थगिती दिल्याचेही स्पष्टीकरण फडणवीसांनी दिले. याशिवाय तुम्ही सात-सात वेळा निवडून आलेला आहात. आम्ही कमी वेळा निवडून आलो आहोत. परंतु काही गोष्टी आम्ही तुमच्याकडूनच शिकल्याचे सांगत फडणवीसांनी अजित पवार आणि बाळासाहेब थोरातांवर चिमटा काढला.
COMMENTS