दत्त देवस्थान सावेडीचे विश्वस्थ मंडळ बेकायदेशीरच 

Homeताज्या बातम्या

दत्त देवस्थान सावेडीचे विश्वस्थ मंडळ बेकायदेशीरच 

नगर - संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या अहिल्यानगर मध्ये सावेडी येथील प. पू. रामकृष्ण क्षीरसागर महाराज स्थापित श्री दत्त देवस्थान या ट्रस्टचे विश्वस्त म

ख्रिसमसचा देशभरात जल्लोष
स्व.गोपीनाथ मुंडे यांनी सतत म.फुले समता परिषदेला साथ दिली!
मंत्री बच्चू कडू यांची जिल्हा स्त्री रुग्णालयात आकस्मिक भेट

नगर – संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या अहिल्यानगर मध्ये सावेडी येथील प. पू. रामकृष्ण क्षीरसागर महाराज स्थापित श्री दत्त देवस्थान या ट्रस्टचे विश्वस्त मंडळ बेकायदेशीर असल्याचा निर्णय पुणे येथील सह धर्मादाय आयुक्त क्र. २ श्री राहुल मामू यांनी दिला आहे.

ट्रस्टचे तथाकथित सचिव अ‍ॅड. संजय शिवाजी क्षीरसागर व विश्वस्त म्हणवून घेणाऱ्या देवराज काशीकर, तुषार कर्णिक, प्रदीप जोशी यांनी दाखल केलेली एकूण सात अपिले नुकतीच फेटाळण्यात आली आहेत. क्षीरसागर महाराज यांनी त्यांच्या घराण्यातील कायम विश्वस्त प्रतिनिधी म्हणून नेमलेले मिलिंद गोविंद क्षीरसागर यांचीच नेमणूक कायदेशीर आहे असा स्पष्ट निर्वाळा सह धर्मादाय आयुक्तांनी दिला आहे. 

 प. पू. रामकृष्ण क्षीरसागर महाराज हे दत्तसंप्रदायातील अधिकारी गुरु होते. अहिल्यानगर येथील सावेडी भागात सुमारे पन्नास वर्षांपूर्वी गुरुकुल पद्धतीने प्राचीन वेद शास्त्रांचे प्रशिक्षण तसेच यज्ञ संस्कृतीचे शास्त्रीय ज्ञान देण्याचे कार्य सुरू केले होते. शंकराचार्यांचे आध्यात्मिक प्रतिनिधी अशी त्यांची ख्याती होती. वेदांतनगर मध्ये आज उभे असलेले भगवान दत्तात्रयांचे भारतातील सर्वात मंदिर अशी त्याची ख्याती आहे.

गेली सुमारे वीस वर्ष या देवस्थानच्या विश्वस्त निवडीच्या वैधते बाबत न्यायालयीन लढाई सुरू होती. संजय क्षीरसागर यांच्या गटाने आपली प्रस्थापित सत्ता राखण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. कायम विश्वस्त प्रतिनिधी मिलिंद गोविंद क्षीरसागर यांना मनमानी पद्धतीने काढून बेकायदेशीर विश्वस्त नेमणुका स्वतःच्या मर्जीने करून तसे खोटे बदल अहवाल संजय क्षीरसागर यांनी अहिल्यानगर येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे दाखल केले होते. वेळोवेळी ते फेटाळण्यात आले. मात्र त्यावर अपिले दाखल करून न्यायालयीन लढाईत गुंतवून  आपली सत्ता अबाधित राहील हे त्यांनी पाहिले.

महाराजांचे पुतणे मिलिंद क्षीरसागर यांनी अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार यांचे मार्फत या सर्व न्यायालयीन प्रक्रियेत वीस वर्ष जिद्दीने लढा दिला. २००५ साली मिलिंद यांना कायम विश्वस्त पदावरून काढून कालांतराने संजय क्षीरसागर यांनी स्वतःकडे ट्रस्टचा कारभार घेतला. देवस्थानच्या विविध न्यायालयीन कामात मदत होईल या हेतूने मुंबई उच्च न्यायालयात वकील असलेले संजय क्षीरसागर यांना मार्गदर्शक म्हणून ट्रस्टच्या कामात चंचू प्रवेश केला.

तेथील भाविकांकडून येणाऱ्या देणगी व नवीन बांधकामाच्या आर्थिक व्यवहाराची व्याप्ती पाहून त्यांनी इतर विश्वस्तांना हाताशी धरून स्वतःची विश्वस्त म्हणून नेमणूक करून घेतली. त्यानंतर अहिल्यानगर येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे दाखल केलेले विश्वस्त निवडीचे बदल अर्ज तब्बल तेरा वर्ष येनकेन प्रकारे प्रलंबित ठेवून ट्रस्टचा अधिकार स्वतःकडे राहील यासाठी वेगवेगळे डावपेच सुरू ठेवले. अखेरीस २०२० साली हे बदल अर्ज फेटाळल्यावर पुण्याच्या सह धर्मादाय आयुक्तांकडे अपिले दाखल करून वेळकाढूपणा केला. 

 सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्याच्या मुदतीत ही सर्व अपिले निर्णीत करावीत असा स्पष्ट आदेश दिल्यानंतर सुद्धा युक्तिवादाच्या अखेरच्या टप्प्यात सह धर्मादाय आयुक्तांविरुद्ध खोट्या तक्रारी करून दबाव तंत्राचा अवलंब केला. तसेच त्यांचे समोर कामकाज करू नका असे लेखी आदेश ट्रस्टच्या वकिलांना दिले. ज्या वकिलांनी मुदतीत कामकाज संपवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाळला त्यांचे वकीलपत्र रद्द करून नवीन वकील नेमले.

अखेरीस विश्वस्त मिलिंद क्षीरसागर यांनी पेशाने वकील असलेल्या संजय क्षीरसागर यांच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. त्यावर अवमान प्रकरणी कारवाई का करू नये आशो कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. 

 या सर्व अपिलांमध्ये मिलिंद क्षीरसागर यांच्या वतीने युक्तिवाद करताना अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी विश्वस्त निवडीच्या प्रक्रियेतील गंभीर त्रुटी आणि नियमबाह्य कार्यप्रणाली ट्रस्टने दाखल केलेल्या कागदपत्रांमधूनच न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. ट्रस्टच्या एका माजी विश्वस्ताने प्रतिज्ञापत्र दाखल करून संजय क्षीरसागर कशा प्रकारे धाकधपाटशा दाखवून, कोऱ्या कागदांवर सह्या घेवून, मीटिंग ना घेताच परस्पर एका हॉटेल मध्ये विश्वस्त बैठकीचा सभा वृतांत त्यांना हवा त्या पद्धतीने लिहून घेत असे याचे शपथेवर वर्णन केले आहे या कडे न्यायालयाचे लक्ष वेधले.अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी अपिलांना विरोध करून ट्रस्टने दाखल केलेले न्यायनिवाडे कसे गैरलागू आहेत याचे खंडन केले. दुसरे एक अपिलकर्ते मुरलीधर ऋषीपाठक यांचे वतीने अ‍ॅड. रोहिणी पवार यांनी तर अभय ब्रम्हे यांनी व्यक्तीश: बाजू मांडली.

गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला वीस वर्षांची अन्यायकारक सत्ता बरखास्त करण्याचा न्यायदेवतेचा निर्णय येणे हा पूज्य महाराजांचा आशिर्वाद असल्याचे भावविभोर प्रतिपादन महाराजांचे घराण्यातील कायम विश्वस्त प्रतिनिधी *मिलिंद गोविंद क्षीरसागर* यांनी केले. या वर्षीची गुरुपौर्णिमा समस्त भक्तांच्या दृष्टीने अविस्मरणीय असेल आणि प. पू. रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या तत्वाने यापुढे मार्गक्रमण करण्याचे विनम्रपणे प्रतिपादन केले.

COMMENTS