संप चिरडणेच’बेस्ट’!

Homeसंपादकीयदखल

संप चिरडणेच’बेस्ट’!

लाल-पिवळ्या रंगाने ल्यालेली राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस ही महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तिच्या मनावर आपला ठसा उमटवून आहे. विद्यार्थी जीवनात गावा

शरद पवारांचे संशयास्पद राजकारण!
निवडून आल्या महिला अन् शपथ घेताहेत पुरूष !
विरोधकांनाही प्रभावित करणाऱ्या कार्यनिष्ठा!

लाल-पिवळ्या रंगाने ल्यालेली राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस ही महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तिच्या मनावर आपला ठसा उमटवून आहे. विद्यार्थी जीवनात गावातून थेट तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी अत्यल्प मासिक पासावर घेऊन जाणारी बस, सुटीच्या दिवसांत अर्ध्या दरात मामाच्या गावाला घेऊन जाणारी बस. शेताच्या बांधाबांध यावर वळणे घेऊन गाव तिथे एसटीचा घोष देणारी बस एकही प्रवासी नसला तरी मुक्कामाच्या गावी जाणारी बस, गावी पाहुणे येणार म्हणून दिवसांत दोन अथवा तीन वेळा येणाऱ्या बसकडे डोळे लावून बसणारी गावाकडची माणसं अशा कितीतरी आठवणींनी मनामनात आपुलकीचे स्थान निर्माण करणारी एसटी बस आपल्या रूबाब आणि सेवेशी कायम इमानी राहीली. अशा इमानी एसटी चे महामंडळ मात्र सोन्याची अंडे देणारी कोंबडी म्हणून महामंडळावर नियुक्त झालेल्या राजकारणी आणि व्यवस्थापनावर नियुक्त झालेल्या लोकांनी ओरबाडून घेत तिला कायम तोट्यात ठेवून राज्याच्या जनतेच्या मनात एसटी बसची छबी बिघडवण्याचा प्रयत्न केला! परंतु, जनता म्हणजे ‘ ये पब्लिक है, सब जानती है! या थाटात आजही आपल्या या लालपरीवर जीव लावून आहे. पण आज गेली काही दिवस एसटी बसचे गावाच्या शेतबांध्यावरून दर्शन दुर्लभ झाले! एसटी ला गाव, दुर्गम पाड्यापर्यंत पोहचविणारे कर्मचारी संपावर उतरल्याने ही अवकळा झाल्याचं कळतंय! तसा आजच्या या संपकऱ्याच उत्पन्न वाढवून मिळावं, यात काही गैर आहे, असे नाही. परंतु, उत्पन्न वाढवून मागणारा हा एसटीचा संरक्षक असणारा कर्मचारी आज नको एवढा संप ताणतोय. त्यातून सामान्य लोकांच्या मनात असणारी सहानुभूती ते गमावत आहेत! एसटी कर्मचारी आणि सौजन्य हे नाते फारशी स्मरणारे नाही. प्रवासी हा आपला जणू सालगडीच असावा इतका खाक्या यांचा प्रवाशांशी वर्तनाचा! गावी जाणारी एसटी रस्त्यावर भेटली तर हात दाखवून ती थांबेल आणि मला गावापर्यंत सोडेल अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी कधी मनी बाळगूच दिली नाही, इतकी उर्मटता पाहूनही महाराष्ट्रातील जनता या लालपरीवर प्रेम करते. एसटी ने दिलेली सेवा मनात इतकी ठसली की, कर्मचाऱ्यांनी उर्मटता दाखवूनही एसटीवरचे प्रेम कमी होऊ दिले नाही!       एसटीचा संप आज मिटेल, उद्या मिटेल या अपेक्षेने लोक टक लावून आहेत. पण एसटी संपात घुसलेले अतिवादी राजकारण्यांनी संपाचा ताबा घेतल्याचे दिसते. राजकीय सत्ता मिळत नसल्याने एसटीचे विलिनीकरण करण्याची अतिवादी मागणी देशाच्या सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण करणाऱ्या पक्षाने या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या माध्यमातून रेटली आहे. या संपकऱ्यांच्या विधीविषयक बाजू मांडणारे काही लोक तर एवढ्या स्तराला पुढे गेलेत की, या संपात नक्षलवादी घुसले म्हणून बोंब ठोकताहेत. उच्चजातीय-भांडवलवादी शक्तिंचा नंगानाच चालला नाही किंवा खपवून घेतला नाही, तर ही ऊरबडवे मंडळी असा आरोप करतेय! ज्यांची प्रतिमा केवळ दलाल म्हणून उभी राहिली ते प्रचंड मोठ्या घोषणा देऊन आपण आंदोलकांचे कसे मसिहा आहोत, असा भास चिरक्या आवाजात करित आहेत. खरेतर, एसटी संपाने आता जनसामान्यांची सहानुभूती गमावली आहे. कारण कर्मचाऱ्यांची आतापर्यंत ची आंदोलने ही पगार वाढ किंवा आर्थिक हितसंबंधाची असत. पहिल्यांदाच आश्चर्य वाटावे, अशी मागणी म्हणजे एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाची मागणी जी येतेय ती कर्मचाऱ्यांची नसून यामागे विरोधी पक्षाचा एक डाव सूडाचा आहे! पण त्याचवेळी आम्ही एक निक्षून सांगतो की, एसटी संप चिरडण्याची वेळ येऊन ठेपली आहे. संपाला चिरडून टाकण्याचे ‘बेस्ट’ प्रशासन करण्याची गरज आहे. उत्तम खोब्रागडे सारख्या सार्वजनिक संस्थांचे हित जपणाऱ्या कठोर प्रशासकाचे प्रसंगी मार्गदर्शन घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, यासाठी सत्ताधाऱ्यांनी देखील लुटूपुटूचा खेळ खेळू नये. शिवशाही या काहीशा खाजगी स्वरूपाच्या बसेस चालू आहेत. सत्ताधारी पक्षांनी विरोधी पक्षाशी हातमिळवणी करून एसटी महामंडळाच्या खासगीकरणाच्या डाव खेळू नये. यातच त्यांचीही भलाई आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी देखील लक्षात घ्यावे की, ज्या शक्ती त्यांना दीर्घकाळ संपासाठी उकसवित आहेत त्या शक्तीच त्यांच्या उध्वस्तीचा पाया रचत आहेत!

COMMENTS