बुलडाणा/प्रतिनिधी ः समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, अपघात टायर फुटल्यामुळे झाल्याचे बोलले जात आहेत. प्रव
बुलडाणा/प्रतिनिधी ः समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, अपघात टायर फुटल्यामुळे झाल्याचे बोलले जात आहेत. प्रवाशांनी देखील तीच माहिती दिली असली तरी, रस्त्यावर टायर फुटल्याचे, कोणतेही चिन्हे नाहीत, त्यामुळे अपघात चालकाला डुलकी लागल्यानंतर ट्रॅव्हल्स डिव्हायडरला धडकून गाडीची डिझेल टाकी फुटून आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या अपघाताची चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मात्र हा अपघात नेमका कसा झाला, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बस प्रथम खांबाला धडकून महामार्गावरील डिव्हायडरवर आदळल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर याच समृद्धी महामार्गावर 100 दिवसांत अंदाजे 900 अपघात झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये काही अपघात अत्यंत भीषण होते. मिळालेल्या आकडेवारीनुसार, 11डिसेंबर 2022 ते 20 मार्च 2023 पर्यंत, या महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामुळे तब्बल 31 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या महामार्गाच्या सदोष कामांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे या महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची बाब पुन्हा एकदा समोर येत आहे. त्यामुळे अपघाताची सरासरी काढली तरी, दिवसाला 9 अपघात या महामार्गावर होतांना दिसून येत आहे, तरी देखील राज्य सरकारकडून उपाययोजना गांभीर्याने घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागाने समृद्धी महामार्गावर वाहने आणण्यापूर्वी त्यांच्या चाकाची तपासणी करावी, अशा सूचना केल्या आहेत. झिजलेले टायर असल्यास वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. मात्र, हे काटेकोरपणे तपासणारी यंत्रणाच नसल्याने किंवा आहे ती यंत्रणा अपुरी पडत असल्याचे दिसत असल्यामुळे अपघात कमी होतांना दिसून येत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बसचे टायर फुटल्याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील बसचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे, असे सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चालकाची चौकशी सुरू असून अधिक तपास सुरू आहे. त्यानंतरच टायर फुटल्याने हा अपघात झाला आहे की नाही, हे स्पष्ट होईल, असे सांगितले आहे. समृद्धी महामार्गावर आतापर्यंत झालेले अपघात हे रात्री व पहाटेच्या दरम्यान झालेले आहेत. अनेकदा या वेळेत चालकाला डुलकी येते. त्यात ठरवून दिलेल्या मर्यादापेक्षा वाहनांचा वेग असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे होणारे अपघात हे अत्यंत भीषण असतात. समृद्धी महामार्गावर एवढ्या वेगाने जी वाहने चालवली जातात तीदेखील या वेगासाठी योग्य नसतात, असेही स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील यावर बोलतांना म्हटले आहे की, चालकांनी वाहनांचा वेग ठरवून दिलेल्या मर्यादेतच ठेवावा, यासाठी चालकांचे प्रबोधन करावे लागणार आहे. वाहनांच्या वेगावर लक्ष ठेवण्यासाठी समृद्धी महामार्गावर कॅमेरे लावण्यात येणार आहे. एखादे वाहन अधिक वेगाने धावत असल्याचे दिसून येताच त्या वाहनाला तशी सूचना देणारी स्मार्ट यंत्रणा समृद्धी महामार्गावर बसवावी लागणार आहे. ही यंत्रणा सुरू करण्यासाठी वेळ लागेल. तोपर्यंत हे सर्व मॅन्युअली करावे लागणार आहे. तसेच, वाहने टोलनाक्यावर येतात तेव्हा देखील चालकांचे प्रबोधन करण्याबाबत आता उपाययोजना आखल्या जातील.
रुग्णवाहिकेला पोहोचण्यास होतो उशीर – समृद्धी महामार्गावर आपत्कालीन मदतीसाठी बेस लोकेशन्स उभारण्यात आली आहेत. तेथे रुग्णवाहिकेची सोय आहे. मात्र, ही रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचून जखमींना पुन्हा नजीकच्या रुग्णालयात नेईपर्यंत हा गोल्डन अवर टळून गेल्याचे यातून सिद्ध होते.
अतिवेग, नादुरुस्त वाहने, झिजलेली टायरमुळे अपघात – समृद्धी महामार्गावर वाहनांचा वेग प्रचंड असतो, आणि या वेगाला कंट्रोल करणे शक्य होत नसल्यामुळे अपघात होत असल्याचे दिसून येत आह. त्याचबरोबर या महामार्गावर येणारे वाहने नादुरुस्त असल्याचे देखील समोर आले आहे. त्या वाहनांची सर्व्हिसिंग वेळेवर न केल्यामुळे अनेक वाहने अपघातांची बळी पडतांना दिसून येत आहे. तर या रस्त्यांवर धावण्यापूर्वी टायर चेक करण्यात येत नाही, झिजलेले टायर आणि अतिवेग अपघाताला कारणीभूत ठरतांना दिसून येत आहे. त्यामुळे समृद्धीवरील अपघातामागे अतिवेग, नादुरुस्त वाहने, झिजलेली टायर हीच अपघाताची तीन प्रमुख कारणे ठरतांना दिसून येत आहे.
’समृद्धी’मध्ये कोणताही दोष नाही ः उपमुख्यमंत्री फडणवीस – समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघातामुळे या महामार्गाच्या सदोष कामकाजावर शंका उपस्थित करण्यात येत आहे. यावर बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, समृद्धी महामार्ग चुकीच्या पद्धतीने बांधला आहे, म्हणून अपघात होत आहेत, असे नाही. आतापर्यंतच्या एकाही अपघातात असे आढळलेले नाही. मानवी चुकांमुळे दुर्दैवी अपघात होत आहेत. विशेष म्हणजे रात्री लांब प्रवास करणार्या वाहनांमध्ये दोन चालक असणे आवश्यक आहे. जेणेकरून थकल्यास एकाला विश्रांती घेता येईल, तोपर्यंत दुसरा चालक वाहन चालवेल. मात्र, आतापर्यंत अनेकजण याचे पालन करताना दिसत नाही. त्यामुळे या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी आता विशेष उपाययोजना राबवल्या जातील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
COMMENTS