देशाच्या राजकारणाचा दर्जा अतिशय खालच्या स्तरावर आणल्याचा जाहीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी
देशाच्या राजकारणाचा दर्जा अतिशय खालच्या स्तरावर आणल्याचा जाहीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत घेतलेल्या जाहीर सभेत केला होता. राज्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने उद्भवलेली परिस्थिती आणि त्यायोग्य सत्ताधारी आणि विरोधक यांची सुरू असलेली अवास्तव जुगलबंदी, या सगळ्याच घटना क्लेशकारक आहेत. राजकारण लोकशाहीमध्ये सत्ताकारणाचा भाग असते; आणि सत्ता कारण हे लोकहिताच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे असते. परंतु; अलीकडच्या काळात सत्ताकारण हे सत्ताकेंद्री होत चालले असून, लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवणे किंवा लोकाभिमुख असणे किंवा लोककेंद्रीत असणे, ही भूमिका सत्ताकारणाने केव्हाच त्यागून दिल्याचे दिसते. जगातल्या अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सत्ता पद्धती आहेत. मात्र, या सत्तापद्धतीमध्ये लोकांचे हित जपणे, ही मुख्य बाब जर साध्य झाली नाही; तर, लोकांमध्ये असंतोष निर्माण होतो. जनतेतला असंतोष हा भल्याभल्यांच्या हुकूमशाहीलाही तोडून टाकतो. अशा वेळी लोकशाही व्यवस्थेमध्ये असणाऱ्या लोकांची विचार करण्याची क्षमता, त्यावर व्यक्त होण्याची सवय आणि एकंदरीत राज्यकर्त्यांकडून असलेल्या अपेक्षा, या सर्वच बाबींचा समन्वय सत्ताधाऱ्यांनी किंवा सत्ताकारण करणाऱ्यांनी कायम राखायला हवा. जनता ही नेहमीच भयमुक्त असली पाहिजे. याची जबाबदारी राज्यकर्त्यांवर जशी असते, तशीच ती विरोधकांवर देखील असते. पण, हल्लीच्या काळात सत्ताधारी आणि विरोधक यांची जुगलबंदी केवळ एकमेकांच्या विरोधात चिखलफेक करण्यात आहे. प्रत्यक्षात जनहितासाठी काही मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधक यांचा समन्वय होणे देखील अपेक्षित असते. मात्र, अशी पद्धत जेव्हा अवलंबली जात नाही, तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक हे एकाच माळेचे मणी बनतात. याचा अर्थ लोकांविषयीची अनास्था ही अधिक प्रकटपणे दिसून येते. महाराष्ट्राचे राजकारण हे डावपेचांनी भरलेले राहिले असले तरी, लोकांच्या विषयी उद्वेग व्यक्त करणारे ते कधीही नव्हते; परंतु, गेल्या काही वर्षातील राजकारण तरुणांच्या माथ्यांना भडकवणारे होऊ पाहत आहे! यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी असा कोणताही भेदभाव करता येणार नाही. महाराष्ट्रातल्या युवाशक्तीच्या ऊर्जेचा उपयोग करणारे, त्यास वळण देणारे राजकारण करण्याची गरज असताना, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे सातत्याने तरुणांची ऊर्जा विधायक कार्याकडे लावण्याऐवजी बेबनावाचे राजकारण करविण्यात त्यांना गुंतवले जात आहे; ही गोष्ट राजकीय पक्षांना तात्कालिक फायद्याची वाटत असली तरी, ती एकंदरीत, राज्याचे दीर्घकालीन नुकसान करणारी आहे. कारण, एवढ्या मोठ्या प्रमाणातील ऊर्जा असणारी शक्ती जर विधायक कार्यात गुंतवली गेली नाही, तर, त्याचे दुष्परिणाम आगामी काळात राज्याच्या अर्थकारणाबरोबरच एकूणच सामाजिक पटलावर उमटतील. ही बाब राजकीय पक्षांनी अधिक गंभीरपणे समजून घ्यायला हवी. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील वर्तमान राजकारणाविषयी मत व्यक्त करताना म्हटले की, यशवंतराव चव्हाण यांच्या काळात राजकारणाची पातळी अतिशय सुसंस्कृत होती. राजकारणात उद्वेग निर्माण होणार नाही, याची दक्षता त्यांच्या संस्कारक्षम राजकारणाने घेतली. त्यांचा प्रभाव राज्यातील विरोधी राजकीय नेत्यांना देखील आपल्या राजकारणाचा दर्जा सांभाळण्यासाठी बाध्य करित होते.
COMMENTS