कमी तेथे आम्ही', असं आयुष्यभर हमीयुक्त म्हणजे वरिष्ठांची मर्जी सांभाळणारे राजकारण करणारे नेते, आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिं

कमी तेथे आम्ही’, असं आयुष्यभर हमीयुक्त म्हणजे वरिष्ठांची मर्जी सांभाळणारे राजकारण करणारे नेते, आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी अचानकपणे भारतीय जनता पक्षाची आपल्याला ऑफर असल्याचे सांगून राजकीय खळखळ करण्याचा अट्टाहास केला. सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांना स्वतःला आणि त्यांच्या आमदार असणाऱ्या मुलीला भाजपच्या मोठ्या नेत्याने ऑफर दिल्याचे ते सांगितले. काॅंग्रेस या पक्षाने राजकीयदृष्ट्या शून्यातून देशाच्या गृहमंत्री पदापर्यंत नेलेल्या या गृहस्थाने अचानक अशी पक्षांतराची ऑफर विषयक गुगली टाकली. त्यांनी टाकलेल्या या गुगलीचा थेट अर्थ असा होतो की, काॅंग्रेस पक्ष अडचणीत असताना नव्या वाटा धुंडाळण्याचा प्रयत्न करतो आहे. राहुल गांधी यांनी काॅंग्रेस पक्षात आता प्रयोग करण्याची ठाम भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांना जुन्या काॅंग्रेसींचा विरोध असल्याने त्यांनी नव्या काॅंग्रेस नेत्यांची मोट बांधायला सुरुवात केली आहे. ही मोट बांधत असताना पक्षांतर्गत फेरबदल करण्यासही राहुल गांधी यांनी प्राधान्य दिले आहे. जुन्या काॅंग्रेस नेत्यांना घरी बसवणे आणि नवनेतृत्वाला पुढे आणणे, महाराष्ट्रात काॅंग्रेस ला नव्या दमाने उभे राहताना नवे प्रयोग आवश्यक वाटतात. त्या प्रयोगांना प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी राहुल गांधी यांनी कंबर कसली आहे; परंतु, यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रिय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना कोणतेही स्थान मिळण्याची शक्यता दिसत नाही. शिवाय, आमदार प्रणिती शिंदे या गेल्या दोन पंचवार्षिक आमदार असूनही महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना आपला प्रभाव पाडता आलेला नाही. राज्यातील तरुण नेतृत्वामध्ये देखील त्या गणल्या जात नाहीत. राहुल गांधी यांच्या यादीमध्ये नेतृत्व स्थानी प्रणिती शिंदे यांचे नाव असण्याची शक्यता नाही! सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे या दोघांचेही राजकीय वर्चस्व सध्याच्या काळात कमी झाले. त्यामुळे राहुल गांधी यांनी चालवलेल्या राजकारणात सुशील कुमार शिंदे यांच्यासह त्यांच्या मुलीचेही राजकीय भवितव्य डळमळीत झाले आहे. त्यामुळेच या प्रश्नावरून इतरत्र लक्ष वेधून घेण्यासाठी सुशील कुमार शिंदे यांनी आपल्याला भारतीय जनता पक्षात प्रवेशासाठी ऑफर आल्याचे सांगितले. याचाच अर्थ आपल्याकडे पक्ष नेतृत्वाचे जराही दुर्लक्ष झाले, अथवा पक्षाच्या हितासाठी नवीन प्रयोग करायचे पक्षश्रेष्ठींनी ठरवले, तर, शिंदे यांच्यासारख्या प्रवृत्ती पक्षावर उपकार केल्यासारखे आपण तिथेच राहणार, अशा भावना व्यक्त करून आपल्याकडे लक्ष आकर्षित करून घेतात. तसा सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे. या मतदारसंघातून सलग दोन वेळा सुशील कुमार शिंदे यांचा पराभव झाला आहे. सन २०१९ च्या निवडणुकीत सुशील कुमार शिंदे यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे मुख्य कारण ठरले, वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांची उमेदवारी. सुशील कुमार शिंदे यांच्या पराभवाला जितकी मते कमी पडली, तेवढी, किंबहुना त्यापेक्षा थोडी अधिक मते ऍड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांना मिळाली. दहा वर्षात राजकारणाची दिशा आता पुरती बदलली आहे. त्यामुळे सुशील कुमार शिंदे यांचे मतदारसंघातील राजकारण आता विस्मरणात गेले. पक्षाने आपली दखल घ्यावी, आपला प्रभाव मानावा, अशी तृप्ती करण्यासाठीच त्यांनी पक्षांतराची आपल्याला ऑफर असल्याची कंडी पिकवली आहे. अर्थात, सध्याच्या काळात भारतीय जनता पक्षात प्रवेश मिळू शकतो! परंतु राजकारण हे इतक्या अध:पताला चालले आहे, तर राजकीय पक्षाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हा संस्कार आता राहिला नाही. त्याबरोबरच राजकीय दृष्ट्या ज्या पक्षाने आपल्याला शून्यातून सत्तेपर्यंत नेले आणि आपली प्रतिमा किंवा व्यक्तिमत्व अखिल भारतीय केले; त्याच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची भाषा, पक्षाच्या गरजेच्या काळात करणे, म्हणजे पक्षाशी कृतघ्नता व्यक्त करण्यासारखेच आहे! सुशील कुमार शिंदे यांनी पिकवलेली पक्षांतराची कंडी काँग्रेसमध्ये त्यांचे दुय्यम्स्वरूप अभिव्यक्त करीत आहे, हे मात्र नक्की!
COMMENTS