सुमन काळे मृत्यू प्रकरणी सक्षम वकील दिला जावा : काळे परिवाराचे राज्यपालांना साकडे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुमन काळे मृत्यू प्रकरणी सक्षम वकील दिला जावा : काळे परिवाराचे राज्यपालांना साकडे

अहमदनगर/प्रतिनिधी : येथील सुमन काळे या पारधी महिलेच्या 14 वर्षांपूर्वी झालेल्या पोलीस कोठडी मृत्यूच्या प्रकरणात सक्षम व निष्पक्ष सरकारी वकील नेमण्याच

सोमनाथ जंगम यांचा डॉक्टर ऑफ सोशल वर्क किताबाने सन्मान
खर्ड्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार
ग्रामस्थांनी रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात खासदारांची अडवली गाडी

अहमदनगर/प्रतिनिधी : येथील सुमन काळे या पारधी महिलेच्या 14 वर्षांपूर्वी झालेल्या पोलीस कोठडी मृत्यूच्या प्रकरणात सक्षम व निष्पक्ष सरकारी वकील नेमण्याची मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे काळे परिवाराने केली आहे. दरम्यान, या प्रकरणी जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात अहमदनगर येथील सरकारी वकील अ‍ॅड. केदार केसकर यांची नेमणूक करावी अशीही काळे कुटुंबाची मागणी असून, तसे निवेदन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पाठवण्यात आले आहे.
पारधी समाजावरील गुन्हेगारीचा शिक्का पुसला जावा म्हणून समाजसेविका सुमन काळे यांनी मोठे कार्य केले. मात्र मे 2007 मध्ये अहमदनगर पोलिसांच्या पथकाने त्यांना बेकायदेशीर पकडून कोठडीत मरेपर्यंत मारहाण केली. पुढे पोलिसांनी सुमनने नवर्‍याच्या त्रासाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचला. 1 सप्टेंबर 2007 रोजी प्राप्त केमिकल अ‍ॅनलायझर रिपोर्टनुसार सुमनच्या शरीरात विष नसल्याचे स्पष्ट झाले. 8 जानेवारी 2008 रोजी तत्कालीन उपविभागीय दंडाधिकारी पानसरे यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात सुमन काळेवर पोलिसांनी केलेल्या गंभीर अत्याचाराची सविस्तर माहिती दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हस्तक्षेप केल्यानंतर ’सीआयडी’ने सुमन काळेच्या मृत्यूसाठी सात पोलिस व एक खासगी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र ’सीआयडी’ने आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल न करता आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कलम लावले. 13 जानेवारी 2021 रोजी उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाला खून झाल्याबाबतचे पुरावे आरोप निश्‍चितीच्यावेळी गृहीत धरता येतील असे आदेश दिले तसेच सहा महिन्यात खटला संपवावा असेही उच्च न्यायालयाने आदेश दिले. तरीही हे प्रकरण अहमदनगर न्यायालयासमोर अद्याप प्रलंबित आहे. उच्च न्यायालयाने सुमन काळेच्या कुटुंबास 45 दिवसात 5 लाख रुपये भरपाई देण्यास सांगितले. मात्र, सरकारने दिरंगाई केली. अखेर भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्र वाघ यांनी आवाज उठवल्यावर ही भरपाई देण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर पारधी समाजातील समाजसेविका सुमन काळे पोलीस कोठडी मृत्यू प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांकडून उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार सक्षम व निष्पक्ष सरकारी वकिलाची नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात सुमन काळे यांचे बंधू गिरीश चव्हाण यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पुण्यात निवेदन दिले. तसेच चव्हाण यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना सुमन काळे प्रकरणात अहमदनगर येथील सरकारी वकील केदार केसकर यांची नेमणूक करण्याबाबतची पत्राद्वारे मागणी केली आहे. दरम्यान, 13 जानेवारी 2021 रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशात मुद्दा क्रमांक 16 मध्ये, सुमन काळे मृत्यू प्रकरणात ज्या पद्धतीने तपास झाला ते पाहता, सक्षम व निष्पक्ष सरकारी वकील हवा असल्याची सूचना केली आहे. त्यानुसार अहमदनगर येथील सरकारी वकील अ‍ॅड.केदार केसकर यांची नेमणूक होणेबाबत गिरीश चव्हाण यांनी सरकारकडे मागणी केली आहे. ही मागणी मंजूर होण्याबाबत प्रयत्न करावेत अशी विनंतीही चव्हाण यांनी राज्यपालांना केली. राज्यपालांना निवेदन देताना गिरीश चव्हाण, त्यांची पत्नी व मुलीसह उपस्थित होते. तसेच यावेळी विवेक विचार मंचचे कार्यवाह महेश पोहनेरकर, अ‍ॅड रिषभ परदेशी, निलेश धायरकर, रोहित धायरकर उपस्थित होते.

COMMENTS