अमोलक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये परदेशात कार्यरत अभियंत्यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन शिबिरकडा । प्रतिनिधीतालुक्यातील कडा येथील श्री अमोलक जैन विद्या प

अमोलक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये परदेशात कार्यरत अभियंत्यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन शिबिर
कडा । प्रतिनिधी
तालुक्यातील कडा येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित अमोलक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे परदेशात कार्यरत असलेले अनुभवी अभियंता व संस्थेचे माजी विद्यार्थी मा. तुषार घुले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील इंजिनिअरिंग क्षेत्रातील संधी, बदलते तंत्रज्ञान, करिअर नियोजन तसेच परदेशातील उच्च शिक्षण व नोकरीच्या संधींबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. मा. तुषार घुले यांनी आपल्या प्रत्यक्ष जागतिक कार्यानुभवाच्या आधारे उद्योगविश्वातील वास्तव मांडत विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेसाठी सज्ज राहण्याचे महत्त्व पटवून दिले. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (-ीींळषळलळरश्र खपींशश्रश्रळसशपलश), संगणक क्षेत्रातील भविष्यातील संधी, कौशल्य विकास, प्रभावी संवाद कौशल्य, नवकल्पना तसेच सातत्यपूर्ण शिक्षण या विषयांवर त्यांनी विशेष भर दिला. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देत योग्य दिशा व आत्मविश्वास प्रदान केला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रमोद खंदारे, प्राध्यापक वर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य खंदारे म्हणाले की, अशा मार्गदर्शन शिबिरांमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून करिअरविषयी स्पष्ट दिशा मिळते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. महेश एन. वाघुले यांनी केले. शिबिराच्या शेवटी महाविद्यालय प्रशासनातर्फे मा. तुषार घुले यांचा सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी असल्याने त्यांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील आठवणींना उजाळा देत यशाचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. हे मार्गदर्शन शिबिर आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी, दिशादर्शक व आत्मविश्वास वाढवणारे असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

COMMENTS