देवळाली प्रवरा ः राहुरी तालूक्यातील राहुरी खुर्द परिसरात रविवारी सायंकाळी एका जखमी झालेल्या बिबट्याला वन विभाग पथकाने भूलीचे इंजेक्शन देऊन जेरबंद
देवळाली प्रवरा ः राहुरी तालूक्यातील राहुरी खुर्द परिसरात रविवारी सायंकाळी एका जखमी झालेल्या बिबट्याला वन विभाग पथकाने भूलीचे इंजेक्शन देऊन जेरबंद केले होते. सदर बिबट्याला रात्रीच्या दरम्यान वन विभागाच्या राहुरी तालूक्यातील डिग्रस येथील नर्सरीमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र सदर बिबट्या मृत पावल्याची चर्चा परिसरात सुरु आहे.
राहुरी तालूक्यातील राहुरी खुर्द ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शनी शिंगणापूर फाट्याजवळ विद्यापीठाच्या प्रक्षेत्रामध्ये एक नर जातीचा बिबट्या रस्ता ओलांडताना वाहनाची धडक बसून जखमी झाला होता. तो बिबट्या शिंगणापूर फाटा परिसरात जखमी अवस्थेत दबा धरुन बसला होता. दि. 24 मार्च 2024 रोजी दुपारच्या दरम्यान राहुरी येथील वन विभाग व पोलीस पथकाने सुमारे तिन ते चार तास अथक परिश्रम घेऊन त्या बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन जेरबंद केले होते. या दरम्यान त्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वन विभागाचे संतोष परदेशी, ताराचंद गायकवाड, वैभव जाधव हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बिबट्याला जेरबंद केल्या नंतर तालूक्यातील डिग्रस येथील वन विभागाच्या नर्सरी विभागामध्ये उपचार करण्यासाठी ठेवले होते. परिसरातील काही नागरिक आज सकाळी त्या ठिकाणी बिबट्याला पाहण्यासाठी गेले असता ड्युटीवर असलेल्या वन कर्मचार्यांनी बिबट्याला रात्री सोडून दिल्याची माहिती दिली. अत्यंत गंभीर जखमी असलेल्या बिबट्याला उपचार न कराताच कसे काय सोडून देण्यात आले. असा प्रश्न नागरीकांना पडला. त्याच वेळेस नर्सरी परिसरात एक सरण जळत असल्याचे नागरिकिने पाहिले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्या सरनामध्ये बिबट्या सुदृश्य प्राणी जळत असल्याचे नागरिकांना दिसले. सदर बिबट्या कुठे गेला? तो मयत झाला असेल तर कोणाच्या चुकीमुळे मयत झाला. त्याला भूलीच्या इंजेक्शनचा ओव्हर ढोस झाला कि, उपचारा दरम्यान हलगर्जीपणा झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला का? मृत्यूनंतर त्याचे शवविच्छेदन करण्यात आले का? अखेर त्या जखमी बिबट्याचे काय झाले? मयत बिबट्याची परस्पर विल्हेवाट लावली काय? असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. वन विभाग कर्मचारी उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. या बाबत आमच्या प्रतीनिधीने वन क्षेत्रपाल युवराज पाचरणे यांच्याशी मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलण्याचे टाळले. या घटने बाबत वन विभाग अधिकार्यांनी खुलास करणे गरजेचे आहे. नर्सरी परिसरात जाळण्यात आलेले सरण कोणाचे होते. सदर बिबट्या आता सध्या कोठे आहे. या बाबत वरीष्ठ पातळीवरुन सखोल चौकशी झाली पाहीजे. तसेच दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
COMMENTS