मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या नवनिर्वाचित सन्माननीय सदस्यांसाठी दिनांक 5 व 6 एप्रिल, 2022 रोजी संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन सं
मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या नवनिर्वाचित सन्माननीय सदस्यांसाठी दिनांक 5 व 6 एप्रिल, 2022 रोजी संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन संसद भवन, लोकसभा सचिवालय, नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. या संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन लोकसभा सचिवालयातील पार्लमेंटरी रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर डेमॉक्रसिस (PRIDE), राष्ट्रकुल संसदीय मंडळ आणि वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, विधान भवन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या दोन दिवसीय संसदीय अभ्यासवर्गात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभा उपसभापती हरिवंश नारायण सिंग यांच्यासह ज्येष्ठ संसदपटू आणि केंद्रीय मंत्री यांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनाचा लाभ सन्माननीय सदस्यांना प्राप्त होईल.
दिनांक 5 एप्रिल रोजी सकाळी 9.15 वा. संसद ग्रंथालय इमारतीतील (पीएलबी) मुख्य सभागृहात या अभ्यासवर्गाचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभा उपसभापती हरिवंश नारायण सिंग यांच्या मार्गदर्शनाने होईल. याप्रसंगी सन्माननीय सदस्यांसह विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, संसदीय कार्य मंत्री ॲड. अनिल परब, राजशिष्टाचार राज्यमंत्री कु. आदिती तटकरे तसेच लोकसभा सचिवालयाचे महासचिव उत्पल कुमार सिंग, अतिरिक्त सचिव प्रसेनजित सिंग, महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक श्री. निलेश मदाने उपस्थित राहणार आहेत.
कायदेमंडळातील विधिविषयक आणि वित्तीय कामकाज, सभागृहाचे विशेषाधिकार, प्रश्नोत्तराच्या तासाचे महत्त्व आणि सदस्यांचा सहभाग, समिती पध्दती – संसदीय कार्यप्रणालीचा आत्मा, सुशासन आणि विधानमंडळाचे कार्यकारी मंडळावरील नियंत्रण, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी लोकप्रतिनिधींचे योगदान इत्यादी विषयांवर ज्येष्ठ संसदपटू आणि केंद्रीय मंत्री विधिमंडळाच्या सन्माननीय सदस्यांना मार्गदर्शन करतील. त्याचप्रमाणे लोकसभा आणि राज्यसभा कामकाजाच्या अवलोकनाची संधी, संसदेतील मध्यवर्ती ग्रंथालय येथे अभ्यासभेट देखील प्रस्तावित आहे.
COMMENTS