विद्यार्थी दिवस साजरा करू शकत नसाल तर विद्यार्थी संघटना बरखास्त करालोणंद / वार्ताहर : विद्यार्थ्यांचे भले करायला निघालेल्या व त्यांच्या समस्यांना
विद्यार्थी दिवस साजरा करू शकत नसाल तर विद्यार्थी संघटना बरखास्त करा
लोणंद / वार्ताहर : विद्यार्थ्यांचे भले करायला निघालेल्या व त्यांच्या समस्यांना न्याय देण्यासाठी अगदी पोट तिडकीने (राजकीय ध्येय प्राप्त होईपर्यंत) झगडणार्या अनेक राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटना ह्या राज्यात कार्यरत आहोत. आम्हीच विद्यार्थ्यांचे हित जोपासणारे खरे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते आहोत. अशी टिमकी विद्यार्थी संघटनामधून वाजविली जाते. विद्यार्थ्यांचे किती प्रश्न सुटतात आणि किती सोडविले जातात. हा अनुत्तरित प्रश्न आहे. एखादा प्रश्न सुटला असेल तर त्याचाच गाजावाजा करत राहायचे आणि तोच मुद्दा राजकीय हिताच्या दृष्टीने सोशल मीडियातून मिरवत राहायचा.
विद्यार्थ्यांचे प्रश्न अनेक आहेत. मात्र, त्याचे निराकरण करणारे कमीच प्रमाणात आहेत. परंतू विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून राजकीय खेळ्या करण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळत महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच ढवळून काढले जाते. विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळणे म्हणजे राजकीय पक्षांना विद्यार्थ्यांची सहानुभूती मिळविणारा विषय बनला आहे. काही प्रमाणात विद्यार्थ्यांची तळमळ असणारे काही लोकं या विद्यार्थी संघटनातून काम करत असतील. त्यांच्या कार्याबद्दल कौतुक आहेच. पण आपण ज्या पक्षाच्या माध्यमातून विद्यार्थी संघटनेत कार्यरत आहोत. त्या विद्यार्थी संघटनेतील पदाधिकार्यांना मात्र महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाकडून घोषित केलेला 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस असतो, हे माहीत नसावे, हीच मोठी शोकांतिका असेल. कदाचित हे माहीत असेलही परंतू विद्यार्थी संघटनांनी याकडे कानाडोळा करत दुर्लक्ष केले असावे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली. राज्यघटनेच्या माध्यमातून जातीय विषमतेला मूठमाती देऊन समाजात समता प्रस्थापित केली. तुम्हा आम्हाला, सर्वच संघटनांना कायद्याच्या चौकटीत आणून ठेवले. त्याच बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा गौरव समस्त महाराष्ट्रात विद्यार्थी दिनाच्या माध्यमातून अगदी जल्लोषात व्हायला हवा. विद्यार्थी दिवसाला एक वेगळे महत्व प्राप्त व्हायला हवं. ही जबाबदारी खर्या अर्थाने अनेक राजकीय पक्षातील विद्यार्थी संघटनांची आहे. परंतु राजकीय ध्येय साध्य होईपर्यंत काम करणार्या ह्या संघटना तेवढंच गरजेपुरते काम करतात असा आरोप होतोच. तेच अगदी खरे आहे.असे म्हटले तरी काही चुकीचे नाही.
ज्या सातार्यातील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 7 नोव्हेंबर 1900 रोजी प्रवेश केला. तिथे हा दिवस शिक्षण विभागाकडून साजरा
विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. 27 ऑक्टोबर 2017 ला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थ्यांसाठी खूप मोठे रसायन आहे. हे संघटनांनी जाणून घ्यायला हवे. स्वतःच्या आयुष्यात शैक्षणिक क्रांती घडवून आणणारे व मी आजन्म विद्यार्थी आहे. अशी भूमिका मांडणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थ्यांसाठी खर्या अर्थाने प्रेरणादायी मार्गदर्शक आहेत. बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिन होत असताना विद्यार्थी संघटनांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखा शैक्षणिक क्रांती घडवून आणणारा शिक्षणतज्ञ का आठवत नाही. ज्या राजकीय पक्षातील विद्यार्थी संघटनांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विद्यार्थी दिवस साजरा करावासा वाटत नसेल अशा विद्यार्थी संघटनांनी आपल्या संघटना गुंडाळत बरखास्त कराव्यात. विद्यार्थी प्रिय बाबासाहेबांचे कार्य ज्या महाराष्ट्रात आहे. निदान त्या महाराष्ट्रातील संघटनांचा काहीच उपयोग नाही. राज्यात सर्वत्र विद्यार्थी दिवस साजरा होत असताना मात्र, ह्या राजकीय पक्षाच्या विद्यार्थी संघटनांना हा विद्यार्थी दिवस अजिबात लक्षात येणार नाही. ते त्यांच्या नेत्यात इतके गुंतून गेलेले असतात की, त्यांना त्यांच्या नेत्याशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. नेत्यांचाच आदेश मानून काम करणार्या विद्यार्थी संघटनांनी ह्या विद्यार्थी दिनाकडे तरी लक्ष द्यावे. विद्यार्थी दशेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आहे. परंतू इथल्या विद्यार्थी संघटनांना त्यांच्या कार्याचा विसरच पडला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक समस्या आणि प्रश्नाचे उत्तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे जर इथल्या राजकीय पक्षातील संघटनांना समजतच नसेल तर तुम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविणार तरी कसे? त्यामुळे तुम्ही तुमची विद्यार्थी संघटना बरखास्त करा. तुम्ही,तुमचा नेता किती कामाचा आणि श्रेष्ठ आहे. एवढंच सांगत बसा.
विद्यार्थ्यां प्रति जिव्हाळा जपणारे हे राजकीय विद्यार्थी संघटनावाले दररवर्षी या दिनाकडे दुर्लक्ष करतात.
तुम्हाला खरोखर विद्यार्थ्यांचे भले करायचे असेल त्यांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल आणि तुमची कार्य करणारी संघटना ही ओळख निर्माण करायची असेल तर तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा विद्यार्थी या जगात शोधून सापडणार नाही. विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असणार्या संघटनांनी विद्यार्थी दिवस साजरा न करणे ही शरमेची बाब आहे. अशा संघटनानी लाज बाळगली पाहिजे. ज्या संघटनेत विद्यार्थी हा शब्द आहे निदान ह्या संघटनांनी तरी या दिवसाचे महत्व ओळखून हा दिवस आपल्या अस्मितेचा आहे. हे समजून घ्यायला हवे.
(चौकट)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस बहुजन समाजाने 14 एप्रिल प्रमाणे उत्साहात साजरा करायला पाहिजे. या दिवशी वैचारिक कार्यक्रम घेऊन, बाबसाहेब आंबेडकर यांचा संघर्ष, सामाजिक बांधिलकी आणि बाबासाहेबांना कसा विद्यार्थी अपेक्षित होता. या विषयांवर प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन समाजातून सुशिक्षित आणि सामाजिक इमानदार विद्यार्थी घडवले पाहिजे.
योगेश थोरात (प्रदेशाध्यक्ष, भारतीय विद्यार्थी मोर्चा)
सातारा : प्रतापसिंह हायस्कूलमध्ये भारतीय विद्यार्थी मोर्चाकडून अभिवादन करताना नागरिक. (छाया : सुशिल गायकवाड)
COMMENTS