कडा । प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली

कडा । प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. या घटनेच्या निषेधार्थ व दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कडा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.
सकाळपासूनच कडा शहरातील दुकाने व व्यावसायिक आस्थापना बंद ठेवण्यात आली होती. ग्रामस्थांनी सामूहिकरीत्या शोक व्यक्त करत दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेला सरपंच युवराज पाटील, माजी सभापती अनिल ढोबळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, उपसरपंच दीपक कर्डिले, माजी सभापती संजय ढोबळे, सरपंच संदीप खाकाळ, युवानेते राजू शिंदे, सागर ढोबळे, नागेश कर्डिले, जय शिंदे, मुस्ताक पानसरे, अशोक साळवे, पत्रकार विनोद ढोबळे, संदीप जाधव, सुनील अस्टेकर यांच्यासह व्यापारी, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोकसभेत वक्त्यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव केला. पहाटेपासून कामाला लागणारा, दिलेला शब्द पाळणारा आणि प्रशासनावर प्रभावी पकड असलेला नेता अशी त्यांची ओळख होती. बारामती तालुक्यासारखे मॉडेल बीड जिल्ह्यात राबविण्याचे त्यांचे स्वप्न होते; मात्र ते अपूर्ण राहिले. इतर नेते कामाला लागण्यापूर्वीच अजित पवारांनी अनेक कामे पूर्ण केलेली असत. जनतेच्या कामासाठी ते सदैव तत्पर असत. प्रत्येक निवेदनावर बारकाईने नजर ठेवणारा आणि लोकांच्या प्रश्नांसाठी सतत झटणारा असा कार्यक्षम, रोखठोक आणि दिलदार नेता पुन्हा होणे कठीण असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. अजित पवार यांचे अकाली निधन महाराष्ट्रासाठी मोठी हानी असल्याचे मत व्यक्त करत, अशा प्रसंगी गावाने एकत्र येणे हीच खरी श्रद्धांजली असल्याचे वक्त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी दोन मिनिटांचे मौन पाळून दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या शोकसभेमुळे गावात एकात्मतेचे दर्शन घडले.

COMMENTS