Homeताज्या बातम्यासंपादकीय

स्थिर सरकार, पण पक्ष अस्थिर

महाराष्ट्रात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाची सत्ता असल्यामुळे स्थिर सरकार आहे. त्यामुळे सत्तेला कोणताही धोका नाही. मात्र या सत्तेत सहभागी झाले

रथयात्रा, पदयात्रांचे पेव
सीमावर्ती भागातील गावांच्या विकासाचा प्रश्‍न
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भूमिका आणि काही प्रश्‍न

महाराष्ट्रात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाची सत्ता असल्यामुळे स्थिर सरकार आहे. त्यामुळे सत्तेला कोणताही धोका नाही. मात्र या सत्तेत सहभागी झालेल्यांचे पक्ष मात्र अस्थिर दिसतांना दिसून येत आहे. यातून जो संघर्ष सुरू आहे तो, आगामी विधानसभा निवडणुकांनंतरच निवळेल असेच चित्र आहे. कारण शिवसेनेतून बाहेर पडत शिंदे गट भाजपसोबत आला, आणि त्यानंतर शिंदे गटाने शिवसेना पक्ष अणि पक्षचिन्हावर दावा केला. निवडणूक आयोगाने पक्षाची घटना, प्रतिज्ञापत्र बघून तो पक्ष शिंदे गटाला बहाल केला. त्यांनतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला असून, आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असा निर्णय दिला. परंतु यामध्ये उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्ष शिवसेना आणि पक्षचिन्ह धनुष्यबाणावर दावा करत, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी 31 जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे. अशावेळी हा निकाल लागण्यास किती अवधी लागेल, ते सांगणे अवघड आहे. मात्र धनुष्यबाण आणि पक्ष उद्धव ठाकरेंना मिळू शकतो, तशी शक्यता निर्माण होतांना दिसून येत आहे. कारण जर एखाद्याने पक्ष स्थापन केला असेल, तर त्या पक्षातून बेदखल करून, पक्ष ताब्यात घेता येत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणाचा वेगळा निकाल लागल्यास नवल नको. मात्र यानिमित्ताने शिवसेना पक्ष अस्थिर होतांना दिसून येत आहे. जर उद्या शिवसेना पक्ष पुन्हा ठाकरे गटाकडे आल्यास शिंदे गटाची मोठी कोंडी होवू शकते, आणि त्यांना आगामी निवडणुकीत विजयी होणे अवघड होवू शकते. मात्र उद्धव ठाकरेंनी जर नव्या चिन्हावर निवडणूक लढवली तरी, त्यांना फायदाच होणार आहे. कारण अशाप्रकारे पक्ष आणि चिन्ह हिरावून घेतल्यामुळे साहजिकच उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे. त्याचा मोठा फटका शिंदे गटासह भाजपला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी भाजपने अजित पवार गटाला सोबत घेतले आहे. मात्र अजित पवार गटाने देखील थेट शिंदेसारखीच खेळी करत पक्षावर आणि चिन्हावर दावा केला आहे. मात्र शरद पवार या पक्षाचे अध्यक्ष असतांना, आणि ते ह्यात असतांना त्यांच्या पक्षावर दावा करणे, आपणच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे सांगणे यातून हा पक्ष देखील अस्थिर असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष एकतर शरद पवार किंवा अजित पवार यांच्या हातात जाईल, मात्र त्यामुळे एका गटाचे भवितव्य अंधातरी जातांना दिसून येते. त्यामुळे त्याने लढायचे कोणत्या चिन्हावर, कोणता पक्ष स्थापन करायचा. त्यामुळे राज्यात खरंतर स्थिर सरकार असले तरी, पक्ष मात्र अस्थिर असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँगे्रस आणि शिवसेना दोन्ही प्रादेशिक पक्षांना सुरुंग लागल्याचे दिसून येत आहे. मात्र राष्ट्रीय पक्ष असलेले काँगे्रस आणि भाजप मात्र सेफ झोनमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळात कधीही निवडणूका झाल्यास या पक्षांना ना पक्ष आणि चिन्हाची धास्ती, भीती नाही. त्यामुळे रणनीती आखायची आणि शत्रुवर तुटून पडायचे, अशीच त्यांची रणनीती राहणार आहे. मात्र राष्ट्रवादी आणि अजित पवार गट आणि शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाचा निर्णय, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, या प्रकियेतून अग्नीदिव्यातून जावे लागणार आहे. त्यानंतरच त्यांना पुढील रणनीती आखून खेळावे लागणार आहे. आपण कोणत्या पक्षातून खेळणार आहे, आपले चिन्ह काय याबाबतीत या पक्षामध्ये संभ्रमता आहे, आणि ती सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतरच स्पष्ट होईल. 

COMMENTS