दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाईचेन्नई : राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहितीनंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तमिळनाडूत धाडसी का

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई
चेन्नई : राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहितीनंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तमिळनाडूत धाडसी कारवाई करत सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे संभाव्य कटकारस्थान उधळल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी एक जण बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.
या संशयितांवर पाकिस्तानची गुप्तचर संस्था तसेच बांगलादेशातील काही दहशतवादी संघटनांच्या सूचनेवरून भारतात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण करण्याचा कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीतून काही धक्कादायक बाबी समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतातील शांतता भंग करणे आणि मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचवणे हा त्यांच्या हालचालींचा उद्देश असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या विशिष्ट माहितीनंतर विशेष पथकाने तमिळनाडूतील विविध ठिकाणी समन्वित छापे टाकले. उथुकुली, पल्लडम आणि तिरुमुरुगनपूंडी या भागांतून संशयितांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्यांची नावे मिजानूर रहमान, मोहम्मद शबात, उमर, मोहम्मद लितान, मोहम्मद शाहिद आणि मोहम्मद उज्जल अशी आहेत. हे सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास होते आणि काही जण वस्त्रउद्योगाशी संबंधित आस्थापनांत काम करत असल्याचे समोर आले आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, संशयितांकडून आठ दूरध्वनी संच आणि सोळा चलदूरध्वनी जोडणी क्रमांक जप्त करण्यात आले आहेत. या उपकरणांच्या माध्यमातून परदेशातील कथित सूत्रधारांशी संपर्क साधला जात होता, असा प्राथमिक अंदाज आहे. जप्त साहित्याची सखोल तपासणी सुरू असून त्यातून संपर्कजाळे, आर्थिक देवाणघेवाण आणि संभाव्य लक्ष्यांविषयी अधिक माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, काही संशयितांनी बनावट ओळखपत्रांच्या आधारे आपली ओळख लपवून वास्तव्यास राहण्याचा प्रयत्न केला. बनावट आधारकार्डचा वापर केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात कागदपत्रांची पडताळणी आणि संबंधित कागदपत्रे तयार करणार्या व्यक्ती किंवा जाळ्याचा शोध घेण्याचे कामही सुरू आहे. प्राथमिक चौकशीत आणखी एक महत्त्वाची बाब उघड झाली आहे. काही संशयितांनी देशातील विविध शहरांमध्ये जाऊन पाहणी केल्याची माहिती समोर आली आहे. या पाहणीचा उद्देश नेमका काय होता, याचा तपास सुरू आहे. तसेच दिल्लीमध्ये ‘फ्री काश्मीर’ अशी पत्रके लावल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कृत्यामागील हेतू आणि त्यासाठी वापरलेली साधने यांचा मागोवा घेतला जात आहे. सुरक्षा यंत्रणांनी सांगितले की, सामाजिक माध्यमांवरून काही आक्षेपार्ह संदेश प्रसारित करण्यात येत होते. या संदेशांतून परदेशातील दहशतवादी संघटनांच्या विचारांना पाठबळ देण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे. संबंधित संकेतस्थळे, संवाद नोंदी आणि आर्थिक व्यवहार यांचा मागोवा घेण्यासाठी तांत्रिक पथक कार्यरत आहे.
देशविरोधी कारवायांना मदत केल्याचा आरोप
अटक करण्यात आलेल्या सर्व संशयितांना पुढील चौकशीसाठी रेल्वेमार्गे दिल्लीला नेण्यात येत आहे. तेथे न्यायालयीन प्रक्रियेनुसार त्यांची चौकशी होणार आहे. या प्रकरणात देशविरोधी कारवायांना मदत, कट रचणे आणि बनावट कागदपत्रांचा वापर यांसारख्या गंभीर आरोपांखाली गुन्हा नोंदवण्याची शक्यता आहे. या कारवाईनंतर तमिळनाडू आणि दिल्लीसह इतर काही राज्यांमध्येही सतर्कता वाढवण्यात आली आहे.

COMMENTS