अहमदनगर/प्रतिनिधी : नगरच्या कापड बाजारासह चितळे रोड, घासगल्ली व दाळमंडई परिसरातील रस्त्यांवर खड्डे आणि धुळीमुळे दुरावस्था झाली आहे. त्यामुळे शहर काँग
अहमदनगर/प्रतिनिधी : नगरच्या कापड बाजारासह चितळे रोड, घासगल्ली व दाळमंडई परिसरातील रस्त्यांवर खड्डे आणि धुळीमुळे दुरावस्था झाली आहे. त्यामुळे शहर काँग्रेसने गुरुवारी धुळमुक्त व खड्डेमुक्त बाजारपेठेच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबविली. यामध्ये एक हजाराहून अधिक व्यापार्यांनी स्वाक्षरी करीत या मोहिमेला प्रतिसाद दिला. दरम्यान, मनपा पदाधिकारी, अधिकारी, लोकप्रतिनिधींनो… झोपा काय काढताय, बाजारपेठेसाठी रस्ते द्या, अशी मागणी या मोहिमेदरम्यान शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली.
दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री मुश्रीफ यांच्यासमोर बोलताना मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी नगर शहरात 100 रस्ते केल्याचे जाहीर केले होते. त्यांची यादी शहर काँग्रेसने मागितली होती. या पार्श्वभूमीवर, आयुक्तांनी जाहीर केलेल्या 100 रस्त्यांमध्ये बाजारपेठेतील एकाही रस्त्याचा समावेश नसल्याने काँग्रेसच्यावतीने हे रस्ते धूळ व खड्डे मुक्त करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. तिची सुरुवात गुरुवारी झाली. यात शहर जिल्हाध्यक्ष काळे यांच्यासह मनोज गुंदेचा, खलील सय्यद, दशरथ शिंदे, अनंतराव गारदे, प्रविण गीते, अनिस चुडीवाल, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, जितेंद्र तोरणे, विशाल घोलप, ओम नर्हे, उषा भगत, जरीना पठाण, राणी पंडित, जुबेर सय्यद, शारदाताई वाघमारे, हेमलता घाडगे, अमृता कानडे, बिबीशन चव्हाण, अरूण धामणे, प्रशांत जाधव, संजय भिंगारदिवे, प्रमोद डांगे, गणेश आपरे, गौरव घोरपडे, सागर चाबुकस्वार, मोहम्मद हनीफ जहागीरदार, मोहनराव वाखुरे, सागर ईरमल, विनोद दिवटे आदी सहभागी झाले होते. मनपा आयुक्त हे खोटारडे असून नगरकरांची फसवणूक करत असल्याचा आरोप काळे यांनी यावेळी केला.
व्यापार्यांनी मांडल्या व्यथा
यावेळी व्यापार्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. महापालिका आमच्याकडून कर संकलन करते. मात्र संपूर्ण बाजारपेठ खोदून ठेवली आहे. त्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. आमचा व्यवसाय निम्म्याहून कमी झाला आहे. त्यामुळे आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. महागाईचा फटका आम्हालासुद्धा बसला आहे. आधीच कोरोनामुळे मागचे दोन वर्ष व्यवसायासाठी अडचणीचे गेले आहेत. ग्राहक खड्डे आणि धुळीमुळे बाजारात यायला तयार नाहीत. महापालिकेच्या अधिकारी व ठेकेदारांना काही बोलायला गेले तर ते उडवाउडवीची उत्तरे देतात, असे म्हणत व्यापार्यांनी महापालिकेसंदर्भात असलेला रोष काळे व्यक्त केला. यावेळी व्यापार्यांशी संवाद साधताना काळे यांनी मनपावर टीका केली. काँग्रेस पक्ष जरी आज महापालिकेमध्ये व शहरात सत्तेत नसला तरी व्यापार्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे कर्तव्य जबाबदार पक्ष करीत आहे. बाजारपेठ धूळ व खड्डे मुक्त झाली पाहिजे व बाजारपेठेत चांगले रस्ते मिळाले पाहिजेत, यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवली आहे. मनपा अधिकारी, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी झोपेचे सोंग घेतलेले आहे. कामांमध्ये टक्केवारी खाण्यामध्ये यांचे हात, पाय आणि स्वाभिमान बरबटलेला आहे, त्यांच्याकडून चांगल्या कामाची काय अपेक्षा करायची? असा सवाल यावेळी काळे यांनी केला. दरम्यान, व्यापार्यांच्या सह्यांच्या निवेदनासह काँग्रेस पदाधिकारी व्यापार्यांसमवेत मनपा आयुक्तांची भेट घेणार आहेत व भावना आणि मागण्या आयुक्तांसमोर मांडणार आहेत. यातून तातडीने महापालिकेने तोडगा न काढल्यास पुढील भूमिका ठरवणार असल्याचे सांगण्यात आले.
बाजारपेठेवर कोणाचा हल्ला?
यावेळी काँग्रेसने बाजारपेठेमध्ये पत्रके वाटली. यामध्ये म्हटले आहे की, चितळे रोड, तेलीखुंट, दाळमंडईसह संपूर्ण बाजारपेठ रस्ते मुक्त व खड्डे युक्त झाली आहे. कुठेही रस्ता दिसेनासा झाला आहे. रशियाने यूक्रेनवर बॉम्ब हल्ले केल्याचे आपण पाहत आहोत. मात्र, नगर शहरातील बाजारपेठेवर नेमका कुणी हल्ला केल्यामुळे येथील रस्ते उदध्वस्त झाले आहेत, याचा व्यापार्यांनी अंतर्मुख होऊन शोध घेण्याची गरज आहे. बाजारपेठेची आजची ही भयानक स्थिती मनपा निर्मित असून मनपानेच ती सोडविणे आवश्यक आहे, असे यात म्हटले आहे.
COMMENTS