श्रीगोदा : लिंपणगाव येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर यात्रा यंदा उत्साहात व सुरळीत पार पडली. मात्र यात्रेदरम्यान काही मद्यपी तरुणांकडून प्
श्रीगोदा : लिंपणगाव येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर यात्रा यंदा उत्साहात व सुरळीत पार पडली. मात्र यात्रेदरम्यान काही मद्यपी तरुणांकडून प्रेक्षकांना मारहाण झाल्याची घटना घडल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंगळवारी सायंकाळी सुमारे सहा वाजता जंगी आखाडा सुरू असताना तीन तरुणांनी दारू व गांजाच्या नशेत एका तरुणाला लोखंडी साहित्य व बेल्टच्या पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत काही अन्य प्रेक्षकांनाही मार लागल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित तरुणांविरुद्ध पोलिसांकडून कारवाईचे संकेत मिळत आहेत.
दरवर्षी महाशिवरात्री निमित्ताने येथे भव्य यात्रा भरते. पंचक्रोशीतील भाविक पहाटेपासून महाभिषेक करून वर्षपूर्तीचा संकल्प करतात. सायंकाळी हरिभाऊ गीते महाराज यांचे शिवचरित्रावर कीर्तन झाले. दुसऱ्या दिवशी शेरणी वाटप व भजनी मंडळाच्या तालावर पालखी सोहळा उत्साहात पार पडला. रात्री लोकनाट्य कार्यक्रमाने वातावरण रंगले. तिसऱ्या दिवशी आयोजित जंगी आखाड्यात ११ हजार रुपयांची अंतिम कुस्ती पार पडली.
यात्रेनिमित्त श्रीगोंदा पोलीस ठाणे यांच्या वतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र आखाड्याच्या ठिकाणी बंदोबस्त व्यस्त असताना काही तरुणांनी गर्दीचा अंदाज घेऊन धुमाकूळ घातल्याचे सांगितले जाते.
घटनेनंतर पोलिसांनी जखमी तरुणाची भेट घेऊन माहिती घेतली. गावातील काही प्रतिष्ठितांनी मध्यस्थी केल्याने अद्याप गुन्हा दाखल झालेला नसला, तरी संबंधितांनी माफी न मागितल्यास गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या प्रकारामुळे यात्रेच्या शांततेला गालबोट लागले असून गावात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. ग्रामस्थांनी पोलिसांनी तातडीने कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी केली आहे.

COMMENTS